सुटीचा दिवस असला की, माझं सगळं काम आरामात सुरू असतं. झोपेतूनही उशिराच उठतो. तसा आजही उशिराच उठलो. ब्रश केला. मग निवांत कॉफी बनवून घेतली. कॉफी घेत घेत पेपर चाळत बसलो. नंतर नाश्ता घेऊन परत काय करायचे? म्हणून मोबाईल हातात घेतला. मोबाईलवर नेहमीप्रमाणे अर्धा तास फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर पाहिले. नंतर बोअर झाल्यामुळे मोबाईल बाजूला ठेवून दिला.
मग डॉ. राजेंद्रमोहन भटनागर यांचे संत मीराबाई यांच्यावरचे 'मीरा' पुस्तक वाचत बसलो. पुस्तक जबरदस्त आहे. हल्ली माझे वाचन कमी झाले आहे, म्हणून मग आज दिवसभर जसा वेळ मिळेल, तसे पुस्तक वाचायचे असाच बेत ठरविला. मग काय सायंकाळी 6.20 पर्यंत पुस्तक हातातून सोडलेच नाही. पुस्तकाची 142 पाने वाचून संपवली. दुपारी थोडी वामकुक्षीही घेतली. सायंकाळ होताच लक्षात आले, अरे उद्या दादा येणार आहेत. केस कापले नाहीतर नक्की शिव्या खाव्या लागणार. म्हणून मग लगेचच आवरून बाहेर पडलो. नांदेड सिटीमधील डीमार्ट चौकात गेले की, शेजारच्या बोळामध्ये चिक्कार सलून आहेत. पण मी आपले नेहमी ठरलेल्या दुकानातच जातो.
आता तसेही लॉकडाउन संपल्यामुळे सगळीच दुकाने सुरू झाली होती. पण आजचा माझा योगायोग काही ठीक नव्हता. मी नेहमी ज्या सलूनवर जायचो, ते नेमकेच बंद होते. आता काय करायचे? असा विचार करत सरळ गाडी घेऊन पुढे गेलो. पाच मिनिटांच्या अंतरावर एक दुकान दिसले. मी गाडीवरून पाहिले तर दुकानात फक्त एकच व्यक्ती, म्हणजे दुकानदारच होता. मी म्हटले बरे झाले कोणीच नाही. चला आपले काम झाले. नाहीतर पूर्वी जेव्हा जाईल, तेव्हा चार-पाच तरी नंबर असायचेच. मी तिथेच बाहेर गाडी पार्क करून दुकानात प्रवेश केला. दुकानात कोणीच नव्हते, पण काहीतरी विचारायचे म्हणून म्हटलं दादा, नंबर नाहीत ना? ती व्यक्ती लगेच म्हटली नाही नाही. साहेब बसा ना. काय करायचे आहे? माझी दाढी पण वाढली होती, पण मी फक्त कटींग करायचेच ठरवून आलो होतो. त्याप्रमाणे म्हटले फक्त कटींग करायची आहे. त्या व्यक्तीने लगेच खूर्ची मागे घेत मला बसायला सांगितले. मी नेहमीप्रमाणे आपला मोबाईल खिशातून काढून वरती ठेवला आणि खुर्चीवर बसलो. त्या व्यक्तीने लगेच त्याचे काम सुरू केले. माझा आपला गप्पा मारणारा स्वभाव असल्यामुळे मी लगेच गप्पा सुरू केल्या.
कोरोनामुळे सगळंच बदलले होते. त्यामुळे त्या व्यक्तीने हात, कैची सगळे सॅनिटाईज करून घेतले. त्यांचे ते सुरू असताना आपल्यातला पत्रकार थोडाच गप्प बसून देतो. मी त्या व्यक्तीला लगेच विचारले दादा, तुमच्या व्यवसायावर कोरोना, लॉकडाउनचा काही परिणाम झालाय का हो? असे विचारताच त्या व्यक्तीचा आवाज जरा खालीच गेला. ते म्हणाले, ''काय सांगायचं साहेब, खूप वाईट स्थिती आहे. आज सकाळपासून तुम्ही तिसरे कस्टमर आहात. या कोरोनाने आयुष्याचीच नाहीतर संसाराची पण वाट लावली आहे.'' मी लगेच त्या व्यक्तीला दुसरा प्रश्न केला की, हे दुकान तुमचे आहे की भाड्याने घेतले आहे. ती व्यक्ती म्हणाली, नाही साहेब भाड्याचे आहे. मी म्हटले मग भाडे किती याला? ती व्यक्ती म्हणाली 16 हजार. मी म्हटले बाप रे, एवढे? ती व्यक्ती म्हटली होय साहेब, एववढेच आहे. मी लगेच पुढचा प्रश्न केला तुम्ही इथलेच आहात का? ती व्यक्ती म्हटली नाही नाही. मी मुळचा बार्शी (सोलापूरचा) आहे. आता पुण्यात स्थायिक झालेल्या गोष्टीला 9 वर्षे होत आली. मी पुढे तुमचे शिक्षण किती झाले विचारले, तर ते म्हणाले कसले आलंय शिक्षण, बाप रोजनदारी करून जगत होता, त्यात आम्ही 5 जण 3 बहिणी आणि 2 भाऊ. मी शिकलो आहे चौथीपर्यंत.
मग मी पुढे विचारले की, पुण्यात इथे राहायला कुठे? तर ती व्यक्ती म्हटली इथेच नांदेड गावात राहतो साहेब. मी विचारले घर घेतले आहे का? ती व्यक्ती म्हटली नाही नाही भाड्याने राहतो आहे. मी म्हटलं तिथे किती भाडे? तर ती म्हणाली 4 हजार. मी प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवत पुढे लगेच विचारले फॅमिलीत किती लोकं आहेत? तर ती व्यक्ती डोळ्यात पाणी आणून कातरल्या स्वरात म्हणाली 6 जण होतो, पण आता 5 जण राहिलो आहोत. 15 दिवसांपूर्वी कोरोनाने आईला खाल्ले. असे म्हणताच मला धक्काच बसला. आत्ताच्या कोरोनाच्या काळात 'आईला खाल्ले' असा शब्दप्रयोग जरा विचित्रच होता, पण तो तसा योग्यही होता. कारण कोरोनाने सगळ्याचं आयुष्य पार बदलून टाकलं आहे. ती व्यक्ती पुढे म्हणाली, ''साहेब खुप प्रयत्न केले पण, आईला नाही वाचवू शकलो. सुरवातीला हॉस्पिटल मिळत नव्हते, मग बेड मिळत नव्हते, मग व्हेंटिलेटर मिळत नव्हते..नांदेड गावातल्या एका पुढाऱ्याच्या (गावातल्या नेत्याला पुढारी म्हणतात) ओळखीने सगळी व्यवस्था झाली पण, आईला नाही वाचवू शकलो.'' असे म्हणताच त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. त्या व्यक्तीचे डबडबलेले डोळे पाहून मीही भांबावून गेलो. तरीपण काहीतरी बोलायचे म्हणून त्या व्यक्तीला आधार देत म्हटले जीवनात असे प्रसंग येत असतात; घाबरू नका दादा, परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी. त्या व्यक्तीने जरा चिडतच म्हटले, ''कसला आलाय परमेश्वर साहेब, तो तर सहा महिने मंदिरात बंद झालाय. तोच हतबल आहे. तो काय आपली मदत करणार.'' हे वाक्य थेट माझ्या काळजाला चिरत गेले. त्या अडाणी न शिकलेल्या माणसाची समज पाहून मीही जरा चक्रवलोच.
पण, ती व्यक्ती तिच्या बोलण्यावरून खूप विवश, हतबल झालेली मला दिसत होती. मग मी विषय बदलायचा म्हणून विचारले दादा, मुले किती आहेत तुम्हाला? ती व्यक्ती म्हटली 2 आहेत. एक मुलगा, एक मुलगी. मी म्हणालो, काय करतात? शिकत असतील ना! ते म्हटले काॅलेजात शिकत आहेत. मुलगी SYBA ला आहे व मुलगा अकरावीत आहे. पुढे ती व्यक्ती म्हणाली, कसे सांगू साहेब? आता नाही जमणार शिकवायला. मुलीचे शिक्षण बंद करून लग्न करून टाकावा, असा विचार करतो आहे. आता दोन्ही मुलांचा शिक्षण, खाणंपिणं खर्च नाही झेपत. घरभाडे, दुकानभाडे, दवाखाना, घरखर्च हे सर्व केवळ दुकानावर भागत नाही. आज सकाळपासून तुम्ही तिसरे कस्टमर आहात. कसं भागणार तुम्हीच सांगा? असा सवाल त्या व्यक्तीने माझ्याकडे फेकला, पण त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतेच. मी काय बोलणार. एव्हाना आता माझी कटींग पण झाली होती. आमचा हा सगळा संवाद कटींग सुरू असतानाच चालू होता. माझ्या डोक्यात फक्त केस कापायचेच होते पण, त्या व्यक्तीची कर्मकहाणी ऐकून, आता मी विचार बदलत त्यांना म्हटले दादा, मला वेळ आहे तर; दाढी पण करा. त्यांची विवशता पाहून मी मनात म्हटले चला आपल्या दाढी-कटिंगचे दोन्हीचे जरा पैसे तरी मिळतील त्यांना. सकाळपासून तिसरे कस्टमर म्हणजे काहीच पैसे मिळाले नसतील. पण माझा हा विचार ठीक असला, तरीपण माझ्या त्या थोड्याशा पैशाने त्यांचा काय कात-चुना होणार होता?
आता दाढीही झाली. सगळं झालं, त्या व्यक्तीच्या हातावर 200 रुपये ठेवून बाहेर पडलो. पण मनात एक विचारांचा हल्लकल्लोळ सुरू झाला. या माणसाला दिवसाला 600 रुपये मिळत असतील तर हा दुकानभाडे 16 हजार, घरभाडे 4 हजार कसे देणार?. घराचा इतर खर्च कसा भागवणार? आजारपण आले, तर कसे निभावणार? मुलांचे शिक्षण कसे करणार? हा माणूस जगणार तरी कसा? याच्या व्यवसायाची कोरोनाने पार वाट लावली आहे. दुकानात कोरोनाच्या भीतीने कोणी यायला तयार नाही. या व्यक्तीचे कुटुंब चालणार तरी कसे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्यात गर्दी केली.
खरंच सद्य:स्थितीत छोट्या-मोठ्या व्यवसायांची कोरोनाने पार 'वाट' लावली आहे. व्यवसायिकांची ही अवस्था आहे, तर छोटे टपरीवाले, हातगाडीवाले यांची काय अवस्था असेल. एकंदरीत संपूर्ण देशातच वाईट स्थिती आहे. त्यात महागाईचा आग़डोंब उसळला आहे. अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार उपासमारीच्या बाबतही आपल्या देशाला 'अच्छे दिन' आले आहेत. सोवियत संघाचा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या मिखाइल गोर्बाचेव्हच्या ज्या दोन धोरणांमुळे (ग्लासनोस्त, पेरेस्त्रोइका) सोवियत संघाचे पतन 1991 साली झाले होते. तशीच काहीसी वाटचाल आपल्याकडे सुरू आहे, असेच मला वाटत आहे. आपले पतन नोटबंदी (डिमॉनिटायझेशन), फसलेले जिएसटी स्लॅबचे धोरण याने सुरू केले आहे. या सर्वांची झळ जनता सोसतच होती की, लगेच कोरोनासारखी महामारी आली. या महामारीने आता छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योगांचीही पार 'वाट' लावली आहे. त्यांनी अशा प्रतिकूल स्थितीत जगायचे कसे असा सवाल त्यांच्यासमोर निर्माण केला आहे.
त्यातच आपल्या देशाचे महान पंतप्रधान आणि अर्थमंत्री 'ताई' बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत वाटणार आहेत. हे असले निवडणूका जिंकण्यासाठी फुकट 'लशी' वाटण्याचे फालतू धंदे बंद करून. आपले दरडोई उत्पन्न -23 झाले आहे. देशाचा फिस्कल डिफीशिएट 7 लाख करोडने वाढला आहे. आपला देशाचा अर्थसंकल्प असतो 21 लाख कोटींचा, तो आता पुढची अनेक वर्षे कायमस्वरूपी तुटीचा असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ज्ञ असलेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी प्रमुख अर्थतज्ज्ञ बनलेले रघुराम राजन यांनी देखील देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल; तसेच तरुणांच्या हाताचे काम जाईल. देशात आर्थिक अराजक येईल असे म्हटले आहे. आता तरी देश चालवणाऱ्या स्वतःला महानतेची लेबलं लावणाऱ्या व रोज पक्षी खेळवत बसणाऱ्या पंतप्रधानांनी आर्थिक धोरणांकडे लक्ष देऊन, देशाला खाईत न लोटता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बिहारमध्ये लशी मोफत वाटण्यापेक्षा बुडणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आर्थिक आधार देऊन त्यांना परत आदरणीय पंतप्रधानांच्याच भाषेत 'आत्मनिर्भर' करावे, इतकेच!
- सागर डी. शेलार (8262049634)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.