US Election 2020 : महाझूठ के दीदार!

 US Election 2020 : महाझूठ के दीदार!

सध्या अमेरिकेतील मीडियाबाबत जगभर चर्चा आहे. अमेरिकेतील मीडिया कशा रीतीने खोटं बोलणाऱ्या आपल्या देशाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या आता माजी अध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण दाखवायला नकार देतो, याचीच सध्या जगभर चर्चा आहे. घडले असे की, ट्रम्प हे काही प्रातांमध्ये पिछाडीवर जाताच खोटं बोलू लागले. त्यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते खोटं बोलू लागताच. तेथील निर्भीड मीडिया म्हणजेच ABC, CBS, NBS यांनी ट्रम्प यांच्या प्रेस कॉन्फरन्सचे प्रसारण थांबविले. या सर्व चॅनेलच्या अँकरने सांगितले की, ट्रम्प हे करत असलेले भाषण भ्रामक व खोट्या गोष्टी पसरविणारे आहे. त्याबाबतचे फॅक्ट्स आम्हाला तपासायचे आहेत; म्हणून आम्ही त्यांच्या भाषणाचे प्रसारण रोखत आहोत. 

त्याच दरम्यान (CNN) ने थेट हल्ला करत सांगितले की, ट्रम्प यांचे भाषण म्हणजे (The most dishonest speech) आहे. त्यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या 16 मिनिटांच्या भाषणात 16 खोटी तथ्ये पुढे आली. तसेच ट्रम्प यांच्या कालावधीत अजून एक महत्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे ते बोललेल्या सर्व खोट्या बाबींची व त्यांनी पसरविलेल्या भ्रामक गोष्टींची नोंद ठेवण्यात आली आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वेबसाईटवरती दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2017 पासून ते 27 ऑगस्ट 2020 पर्यंत म्हणजे 1316 दिवसांमध्ये 22, 247 वेळेस खोटे किंवा भ्रामक असणारी वक्तवे केली आहेत. त्याचप्रमाणे वेबसाईटवरती ट्रम्प हे किती वेळेस कुठल्या बाबींवर खोटं बोलले आहेत, याचे देखील वर्गीकरण आहे. यानिमित्ताने मला एक प्रश्न पडतो; असे आपल्या देशात होणार का? त्याचप्रमाणे अमेरिकेत आपल्यासारखी व्हाट्सअप युनिव्हर्सिटी व आयटी सेलही नाही, मात्र तरिही असे प्रकार घडतात. पण अमेरिकेत अशा प्रकारांना तेथील मीडिया गांभीर्याने घेतो, हे आधोरेखित झाले. 

ट्रम्प यांनी दिलेल्या कॉन्फरन्समधील भाषणात त्यांनी अनेक खोटे फॅक्ट्स मांडले. त्यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ''मी विसकोंसिन, मिशिगन, जॉर्जिया, पेनासिल्व्हिया या ठिकाणी जिंकलो आहे.'' असे म्हणताच (CNN) ने हा दावा चुकीचा ठरवत, सांगितले की मतमोजणी सुरू असताना असे सांगणे म्हणजे साफ चुकीचे आहे. तसेच आघाडीवर असणे म्हणजे निवडणूक जिंकणे असे नव्हे. तसेच (CNN) ने आणखी एक फॅक्ट्स पुढे आणला तो म्हणजे त्यावेळी ट्रम्प हे विसकोंसिन व मिशिगन या दोनही ठिकाणी हरले होते. एव्हाना हे सगळं सुरू असताना मीडियाबरोबर ट्रम्प यांच्या पक्षातील लोकांनी देखील आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याचाच विचार जर भारताच्या बाबत कारावयास गेलो तर आपल्याकडे देश चालवणारी जोडगोळी तासनं-तास भाषण देत असते. यामधील खोटी तथ्ये न काढलेलीच बरी! तसेही आपल्याकडे अशी फॅक्ट्स काढणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे कुठे? आपल्याकडे तर सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया दिसतो. त्याला काही मीडिया अपवादही आहेत. पण त्यांनी असे काही फॅक्ट्स जनतेसमोर आणले तर मग, त्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इतर एजन्सींचा ससेमिरा लावला जाईल, असो...

अमेरिकेत ट्विटरचे कौतुक...

ट्रम्प हे 2016 पासून ट्विटरव्दारे अमेरिकेतील लोकांना इंगेज ठेवत आहेत. 2016 च्या निवडणुकीत 'केंब्रिज ऍनालॅटिका' या एका संस्थेमार्फत अनेक भ्रामक गोष्टी पसरवत ट्रम्प यांनी निवडणूक एकहाती जिंकली होती. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीत ट्विटर, फेसबुक, यूट्यूब अशी सगळीच सोशल माध्यमे जागरूक झाली होती. त्यातही ट्विटर हे अधिकच जागरूक झाल्याचे दिसते आहे. ट्रम्प यांना ट्विटरवर 9 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 58 हजारांपेशा जास्त ट्विट केले आहेत. त्यामुळे जे 2016 मध्ये घडले ते परत घडू नये म्हणून या सर्वच सोशल माध्यमांनी यावेळी ठोस पाऊले उचलली. त्यातही ट्विटरने ट्रम्प यांच्या खोट्या व भ्रामक गोष्टी पसरविणाऱ्या बाबींना लगाम घालण्यासाठी, त्यांनी केलेले ट्विटचे फॅक्ट्स चेक करायला सुरुवात केली. तसेच त्यांनी केलेले ट्विट जर खोट्या गोष्टी पसरवत असतील तर त्यांच्या ट्विट खाली निळ्या रंगाचा रिमार्क ट्विटरमार्फत येऊ लागला. त्याचप्रमाणे ट्विटरने खऱ्या खऱ्या फॅक्ट्ससाठी (CNN) यांची त्याबाबतची लिंक देण्यास सुरुवात केली. तसेच मोठ्या प्रमाणात खोट्या बाबी पसरविणाऱ्या ट्विटचा रिट्विट व लाईक हे दोन ऑप्शन ट्विटरने बंद केले. 

सगळ्यात महत्वाचे पाऊल म्हणजे काही भ्रामक गोष्टी पसरविणारे ट्विट हाईडही केले. ते ट्विट पाहण्यासाठी वेगळ्या प्रकारची किचकट प्रक्रिया करण्यात आली होती. या सर्व कारणास्तव ट्रम्प यांनी खूप आकांडतांडव केला. ट्विटरने केलेला वार जिव्हारी लागल्याने ट्रम्प यांनी थेट तुमच्यावर सेन्सॉर आणू, बंदी घालू अशी धमकीच देऊन टाकली. पण त्याचाही काही परिणाम ट्विटरवर झाला नाही. शेवटी निवडणूक हरल्यानंतरही ट्रम्प यांनी मीच निवडणूक जिंकल्याचा दावा केला. यालाही ट्विटरने चोख उत्तर देत, हे सत्य नसल्याचे सांगितले. आता (CNN) ने देखील बायडेन विजयी झाल्याचे सांगितले आहे. अमेरिकेत घडलेल्या या कथानकातून आपल्या देशातील भक्तगण इलेक्ट्राॅनिक मीडिया काहीतरी बोध घेईल का? हाच खरा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो. मीडिया म्हणून आपला रोल काय आहे? याची तरी जाणीव भारतातील इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी ठेवायली हवी. इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहणारे देखील या गोष्टीला तितकेच जबाबदार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण तेच तर बेजबाबदार गोष्टी पाहून या चॅनेलचा टीआरपी वाढवतात. 

जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशातील मीडियाला तिथल्या सर्वसत्ताधीश खोट्या नेत्याला लगाम लावणे शक्य आहे, तर मग जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील मीडियाला का शक्य नाही? लोकशाहीचा चौथा खांब म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणावर अंकुश ठेवणे हे प्रामुख्याने मीडिया म्हणून आपले काम आहे. यामध्ये जनतेने देखील आपली देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य जाणून घ्यायला हवीत. राज्यघटनेत दिलेल्या हक्कांबाबत आपण जेवढे जागरुक आहोत; तेवढेच आपण कर्तव्यांबाबतही असावयास हवे. आपल्याकडे व्हाट्सऍप युनिव्हर्सिटीमधून पाठवलेले मॅसेज देखील जबाबदारीनेच पुढे फॉरवर्ड करायचे की नाही ते ठरवावे. हे एक जबाबदार देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

दरम्यान, घटनेचे कलम (artical 21- protection of life and personal liberty) जीवन जगण्याचा अधिकार व कलम (artical 19- guarantees the freedom of speech and expression) अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन कलमांचा गैरवापर करत आपल्या देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया बेधुंद सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याऐवजी; विरोधी पक्षांनाच बदनाम करत आहे. विरोधी पक्षांवरच अंकुश ठेवत आहे. त्याचबरोबर देशातील सत्ताधीश जोडगोळीचे लांगूलचालन करण्यात मीडिया आपला मोठेपणा समजत आहे. सध्या भारतात स्वायत्त म्हणवून घेणारे निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात असल्याचीच चर्चा आहे. 

सध्या जे अमेरिकेत घडत आहे ते आपल्याकडेही घडायला हवे. आपल्या देशातही वेगळी परिस्थिती नाही. आपल्या देशातील 2014 व 2019 च्या निवडणुकांमध्ये देखील सोशल मीडियाचा असाच गैरवापर झाला आहे. व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी व आयटी सेलवाले यांनी अमेरिकेतील 'केंम्ब्रिज ऍनालॅटीका' प्रमाणे सत्तारूढ पक्षासाठी भूमिका बजावली आहे. सध्या झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील फेक न्युज व फेक व्हिडीओ, फोटो यासारख्या खोट्या बाबी सोशल मीडियाव्दारे पसरविण्यात आयटी सेलवाले यशस्वी झाले आहेत. त्यांच्याच जीवावर आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाने अनेक निवडणूका जिंकल्या आहेत. अशा सोशल माध्यमांचा व भक्तगण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून मूळ प्रश्न म्हणजे बेरोजगारी, आरोग्य, अर्थव्यवस्था, महिला सबलीकरण, शिक्षण, मूलभूत गरजा, देशाची सुरक्षा, पायाभूत सोईसुविधा या बाबींना डायव्हर्ट केले जात आहे. जनतेला धार्मिक, जातीय मुद्दे पुढे आणून त्यात गुंतवले जात आहे. जे अमेरिकेत कोविडच्या प्रसाराच्या वेळेस झाले तेच आपल्याकडेही झाले. कोविडच्या काळात ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी अवैज्ञानिक वक्तवे करत कोविडला गांभीर्याने घेतले नाही, तसेच आपल्याकडेही थाळ्या वाजवा, दिवे पेटवा असे विज्ञानाला धरून नसणारे प्रकार घडले. त्याच कारणास्तव भारतात कोविडचा प्रसार वेगाने झाला. 

ज्याप्रमाणे विचारवंत कार्ल मार्क्स म्हणतात, 'धर्म ही अफूची गोळी आहे.' तसेच आपल्याकडे सध्या ही गोळी जनतेला देऊन मूळ मुद्यांवरून लक्ष हटविले जात आहे. त्यामुळे मग मतदाता सद्सद्विवेक बुद्धीचा वापर न करता मतदान करतो. अमेरिकेत जे घडत आहे त्याच प्रकारचे सोशल माध्यमांवरती सेन्सॉर आपल्याकडेही असायला हवे. यातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे, अमेरिकेत ट्विटरच्या तुलनेत फेसबुक सेन्सॉरच्या बाबत कमी पडल्याचे दिसते आहे. मध्यंतरी भारतात देखील फेसबुकबाबत मोठे वादविवाद झाले होते. विरोधी पक्षांच्या बाबतीत फेसबुक दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या मते फेसबुक त्यांच्या पंतप्रधान मोदी विरोधी असणाऱ्या पोस्ट बॅन करते आणि पंतप्रधान मोदी समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट व्हायरल करते. या वादाला मोठे स्वरूप आल्यानंतर भाजपसाठी काम करणाऱ्या अंकी दास यांनी नंतर राजीनामा दिला होता. आणखी एक महत्वाचा मुद्या नमूद करावा वाटतो, तो म्हणजे नुकताच घडलेल्या सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण व कंगणा प्रकरणात देखील काही इलेक्ट्रॉनिक मीडियाने संशय यावा अशा भूमिका घेतल्या होत्या. याबाबत (NBA) news broadcasters association ने काही चॅनेल्सवर कारवाई देखील केली आहे. त्यामुळे चॅनेलला जाहीरपणे माफीनामा देखील घ्यावा लागला होता. आता अमेरिकेची निवडणूक संपून निकालही लागला आहे. सातत्याने खोटं बोलणारे ट्रम्प हरले देखील आहेत. या अमेरिकेतील निवडणुकीच्या निमित्ताने एक प्रश्न पुढे येतोच, तो म्हणजे अमेरिकेतील मीडियाचा बोध आपल्याकडचा भक्तगण इलेक्ट्राॅनिक मीडिया घेईल का?

- सागर डी. शेलार (8262049634)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com