दररोजच्याप्रमाणे मी यवतेश्वरच्या घाटात पळायला गेलो होतो. दररोज माझ्यासोबत पळायला माझे मित्र मैत्रिणी असतात पण त्यादिवशी कोणीच नव्हतं. मी नेहमीप्रमाणे माझं नॉर्मल रुटीन केलं आणि आज जरा वेगळ्या रस्त्याने परत यावं असा विचार केला. यवतेश्वरच्या घाटातून येण्यापेक्षा सांबरवाडीच्या वॉटर प्लॅन्टकडून पाईपलाई ला धरून खाली यावं असा विचार केला आणि निघालो. तसंही काही दिवसांनी आमचा सातारा परिक्रमा भटकंतीचा प्लॅन चाललेला आणि त्या भटकंतीमध्ये हा रस्ता होता. त्यामुळे बाकी सगळ्यांना घेऊन जाण्यापेक्षा आपण आधी एकदा जाऊन बघून यावं असा मी विचार केला आणि निघालो. वातावरण खूप सुंदर मोहक होतं त्यामुळे मस्त फोटो काढत, व्यायाम करत एन्जॉय करत होतो. वरती पठारावर खूप सुंदर भुरळ घालणारी हिरवळ होती. पलीकडे ठोसेघर चाळकेवडीच्या पवनचक्क्या आणि त्यांच्या मागे धावणारे ढग स्वर्गाचा अनुभव देत होते. समोर किल्ले अजिंक्यतारा आणि खाली वाकून बघितल्यावर यवतेश्वर घाटाचा नागमोडी रस्ता अत्यंत मनमोहक दिसत होता.
मजल दरमजल करत मी त्या पॉईंटला पोचलो जिथून मला खाली उतरायचे होते. रस्ता शोधत, पायवाट पकडत पाईपलाईनला फॉलो करत मी खाली उतरायला लागलो. दिसायला तो उतार जितका सोपा दिसतो तितकाच तो अवघड आहे हे मला तिथून उतरायला लागल्यावर कळाले. माझा बूट हा फक्त पळण्यासाठी आहे हे मी विसरलो होतो आणि तिथून उतरायला लागल्यावर मला कळाले. तरी पण आता काम हाती घेतलेच आहे तर फत्ते करायचाच असं ठरवलं. त्यामुळे मी उतरायला लागलो. पाऊस एकदा होऊन गेल्यामुळे आणि नंतर ऊन पडून जमीन सुकल्यामुळे तिथली माती बाहेर आलेली. रस्ता पूर्ण घसरडा झालेला त्यामुळे मी खाली बसून अंदाज घेत येत होतो. मी तीन वेळा तसा तोल जाऊन डोंगरावरून पडताना वाचलो. एकदा ठोसेघरच्या बाजूला, एकदा घाटाच्या बाजूला आणि एकदा पुढे. तरी तोल सावरत उतरायला लागलो.
साधारण अर्ध्या वाटेत पोचल्यावर मी एक ठिकाणी अडकलो जिथून मला उतरायला वाट सापडत नव्हती. तरी मी माझ्या आधीच्या अनुभवांवरून त्या दगडांचा अंदाज घेऊन तिथून उतरायचा प्रयत्न करत होतो. उतरताना माझं तोंड डोंगराच्या बाजूला होतं म्हणजे मी उलटा होऊन उतरत होतो. दगडाचा आधार घेऊन मी माझा पाय खाली ठेवला आणि ज्या दगडाला पकडलेलं त्या दगडाने मला दगा दिला. पाऊस आणि वाऱ्यामुळे तो दगड भुसभुशीत झालेला हे मला कळलं नाही आणि त्याचा साधारण अननसाचा आकाराचा भाग निघाला आणि सरळ माझ्या तोंडावर येऊन आपटला आणि मी साधारण 15 फूट खाली घसरत गेलो. माझा चष्मा दणक्यामुळे दुसरीकडे जाऊन पडलेला, माझे कपडे मळलेले, माझ्या हाताला खरचटलं होतं. तोंडाला मार लागल्यामुळे एक मिनिटे मला काहीच सुचले नाही. मी पटकन माझा चष्मा शोधला तर तो थोडा वाकलेला. त्याला नीट केलं आणि घाम पुसायला डोक्याला हात लावला, आणि हात खाली घेतला तर माझा पूर्ण हात रक्ताने भरलेला. अशा परिस्थितीत कुणालाही भीती वाटणं साहजिक आहे पण मला भीती वाटली नाही. जे झालं त्याच्यावर विचार करत बसायला माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे आता पुढे काय करायचं ते डोक्यात सुरू झालं. खाली रस्ता दिसत होता आणि तिथून लोक जाताना दिसत होती. मी झपझप पावलं टाकत खाली उतरायला लागलो. रक्त थांबत नव्हतं आणि मला किती लागलाय याची जाणीव नव्हती. त्यातून मी माझा रुमाल सोबत न्यायला विसरलेलो. माझ्या खिशात माझा मास्क होता तो काढून पटकन डोक्याला धरला आणि उतरायला लागलो. साधारण पाच ते सात मिनिटात मी रस्त्यावर पोचलेलो. तिथे मुलं होती त्यांनी माझी अवस्था बघितली. ते लगेच म्हणले खाली उतरल्यावर मित्राचं घर आहे तिथे चल. तिथे मी स्वतः माझी गाडी चालवत उतरलो. उतरल्यावर गाडीच्या आरशात मी स्वतःला बघितलं आणि धक्काच बसला. माझ्या चेहऱ्याची डावी बाजू पूर्ण रक्तबंबाळ झालेली. डाव्या भुवईच्या वरती खोक पडली होती आणि नाकाच्या डाव्या बाजूला चीर. मुलांनी मला त्यांचा रुमाल आणि थोडं पाणी दिलं. पाण्याने थोडं रक्त धुतलं आणि तिथेच जवळ एका मैत्रिणीचे घर आहे तिच्याकडे गेलो. तिच्या वडिलांनी तात्पुरते प्रथमोपचार केले आणि मग मी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला जाताना मैत्रिणीचे वडील सोबत होते.
तेथे पोचल्यावर बाबांना बोलवून घेतले. हॉस्पिटल घराशेजारीच असल्याने बाबा लगेच आले. डोक्याच्या जखमेला तीन टाके घालावे लागले. मलमपट्टी करून झाली आणि मग मी घरी आलो. या संपूर्ण अनुभवातून शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. खरं तर, जेव्हा पण तुम्ही एकटे फिरत असाल तेव्हा तुम्ही स्वतः ची काळजी घेण्या इतके सक्षम असला पाहिजेत. तुम्ही स्वतःसोबत एखादी दुर्दैवी घटना घडल्यावर ती परिस्थिती कशी हाताळता यावरून तुम्ही कठीण काळात दुसऱ्यांना कसे सावरता हे अवलंबून असते. तुमचे नेतृत्वगुण, organizing abilities, quick decision making abilities, self handling and self motivating, कठीण काळात तुम्ही किती स्थिर राहू शकता या गोष्टी अशा घटनांमधून समजतात.
कठीण काळात डोकं शांत ठेवून निर्णय घेणे खूप महत्त्वाचं असतं. ज्या क्षणी मला कळलं की डोक्यातून रक्त येतंय तेव्हा मला घाबरून चालणार नव्हतं. घाबरल्यामुळे माझा रक्तदाब वाढून अजून रक्त गेलं असतं आणि मी कदाचित तिथेच बेशुद्ध झालो असतो किंवा अजून काहीतरी दुर्दैवी घटना घडली असती. पण त्यावेळेस घाबरण्यापेक्षा मला स्वतःला सांभाळत मला हॉस्पिटलमध्ये पोचणं जास्त महत्वाचं वाटलं. तुम्ही तुमच्या मेंदूला आणि शरीराला कशाप्रकारे आदेश देताय तशाप्रकारे तुमचा मेंदू आणि शरीर तुम्हाला प्रतिसाद देणार हे कायम लक्षात ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.