लाॅकडाऊन : धीर धरा आणि आशा कधीच सोडू नका !

डॉ.अनिमिष चव्हाण,एम. डी. (मनोविकारतज्ञ), सातारा.
रविवार, 17 मे 2020

जगण्यासाठी जिवापाड धडपडणाऱ्या या जगात कुणीतरी स्वत:हून निरोप घेणं ही एक सुन्न करणारी घटना असते. अशात ही व्यक्ती जर तारुण्याच्या, जीवनाचा उपभोग घेण्याच्या, कार्य-कर्तृत्वाच्या उंबरठ्यावर आत्महत्या करीत असेल तर तो त्या व्यक्तीसाठीचा किती भयंकर निर्णय असेल हे समजणे कोणालाही कठीण जाऊ नये. मात्र, एकूणच आत्महत्या का केली जाते हे समजणे वाटते तितके सरळ-सोपे नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अशा निर्णयावर कुणीही अधिकारवाणीने काही भाष्य करणे, त्या निर्णयाची चिकित्सा करणे हे खरं तर मुळीच योग्य नाही. फक्त या निमित्ताने जिवंत असलेल्या माणसांनी स्वत:च्या जीवनाचा, त्यामागील धडपडीचा आणि जगण्यातील अडचणींचा थोडं थांबून विचार केला पाहिजे.

गात सर्वत्र घडणाऱ्या अपघात, हिंसा, आत्महत्या वगैरे घटनांचा करोना-संकटाच्या पार्श्वभूमीवर विचार करत आहोत. पण, खरोखर करोना-संकट हेच या घटनांचं कारण आहे का? की हा केवळ रंगमंचातील बदल आहे? हे आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर करोनाची पार्श्वभूमी आपल्याला या घटनांचा सुस्पष्ट विचार करण्यासाठी एक संधी आहे, असं म्हणता येईल. कारण, या सर्व घटनांमागचे मूलभूत कारण हे बिफोर कोरोना, ड्युरिंग कोरोना आणि आफ्टकोरोना आश्‍चर्यकारकरित्या एकच एक असणार आहे. ते म्हणजे अनिश्‍चीत आणि असाधारण परिस्थितीचे भय आपल्या आयुष्यात सर्व काही सुरळीत आणि सुनियोजित असायलाच हवे अशी कल्पना आपण किती घट्ट कवटाळून बसतो. असं सर्व काही सुरळीत आणि सुनियोजित असू शकतं हाच संदेश आपण सर्व व्यवस्थांमधून सतत स्वत:ला, इतरांना तसेच आपल्या मुला-बाळांना नेहमी देत राहतो. अमुक शिक्षण घ्या, अमुक नोकरी मिळवा, अमुक पैसे कमवा, अमुक गुंतवणूक करा, अमुक व्यायाम करा, म्हणजे नक्की सारं काही छान होईल. हा संदेश देत-घेतच आपण जगत आलो आहोत आणि खरं तर तिथेच स्वत:ची फसगत करीत आलो आहोत. कारण, वास्तविक जीवनात कधीच कोणतीच गोष्ट निश्‍चित नसते. जे काही निश्‍चित आहे, असे आपल्याला दिसते ती आपल्या नजरेची, विचारांची आणि अनुभवांची मर्यादा असते. या मर्यादेत राहून आपण या खोट्या सुनिश्‍चिततेचा आनंद जरी घेत असू तरी एक तर तो करोना-संकटासारख्या काळात उद्‌वस्त तर होतोच. पण, त्याहीपेक्षा महत्वाचा तोटा म्हणजे आपण या अनिश्‍चीत आणि असाधारण परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुळीच स्वत:ची पूर्वतयारी केलेली नसते.
 
ही पूर्वतयारी म्हणजे लॉकडाऊनपूर्वी गरजेच्या वस्तू घाई-घाईने दुकानातून जमा करण्यासारखी गोष्ट नाही. किंवा कुठल्याशा नशेमध्ये साऱ्या जगाला तुच्छ लेखण्याने आपण स्वत:ला पुरेसे सुरक्षित करू शकत नाही. हे या कोरोना काळात तरी आपण समजून घेतो आहोत का? या प्रश्नाचे दुर्दैवी उत्तर नाही असेच आहे. आपण या काळातही कोरोनाला हरविण्याच्या, मार्केट सुरू करण्याच्या आणि आयुष्य पुन्हा जुन्या वळणावरून सुरू करण्याच्या एककलमी नादात आहोत. मात्र, कुठल्याही संवेदनशील मनाला या स्वप्नातील फोलपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपण स्वत:ला आणि आपल्या सग्या-सोयऱ्यांना दिलेली आश्वासने पुरी होऊ शकत नाहीत. या जाणीवेने काळीज तुटणे थांबणार नाही. या कोरोनाने शारीरिक अंतराबरोबर मानसिक अंतरसुद्धा वाढविल्याचा अनुभव आपण नजरेआड करू शकत नाही. सारे काही नक्कीच पुन्हा चालू होईल. मात्र, तरीही सारे काही वेगळे असणार आहे, हे विसरता येणार नाही. हे वास्तव स्वीकारण्यासाठी आपल्या सामुदायिक मनाची उभारणी करण्यासाठी आपल्याकडे जवळ-जवळ कोणतीच यंत्रणा नाही. आजसुद्धा आपण बिफोर कोरोना पिरीयडचाच फॉर्म्युला वापरून आपली मानसिकता सावरण्याचा खटाटोप करीत आहोत. आपण स्वत:ला एकांतवास ही शिक्षा असल्याचे वारंवार सांगतो आहोत. फार-फार तर छंद, प्रशिक्षणासारख्या गोष्टींतून काळ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहोत. या नाही तर त्या मार्गाने पण आपल्या पूर्वीच्याच गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

त्याऐवजी आपण आपला एकांत, नाती, मानवी गरजा, मानवी जीवनाची अनिश्‍चितता यांचा आपल्या स्वत:च्या मनाशी आढावा घेऊ शकणारच नाही का? ही आपल्या आयुष्यात डोकावण्याची प्रक्रीया वरवर भयकारी, कठीण आणि असह्य वाटू शकते. पण, तीच खरे तर मनाला शांतता आणि स्थिरता देऊ शकेल आणि माणसांचे कोरोनासारख्या स्थितीत जाणारे अनावश्‍यक बळी रोखले जाऊ शकतील. आपण सारेच एकटे असतो, अस्थिरतेच्या निसरड्या वाटेवरच आयुष्याचा प्रवास करीत असतो. आपल्याला योग्य आणि न्याय्य तसेच आवश्‍यक वाटणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्याला नेहमी सहज मिळणार नाहीत. कदाचित कठोर प्रयत्नानंतरसुद्धा मिळणार नाहीत. पण, तरीही चालण्याचे मोल कमी होत नाही. जगण्याच्या धडपडीचे मोल कमी होत नाही. शिवाय, या जगण्याच्या निसरड्या रस्त्यावरही सुख अशक्‍य नाही. गरज आहे ती सुख समजून घेण्याची. आणि त्यासाठीच दु:खसुद्धा समजून घेण्याची. आजकाल घडणाऱ्या या सर्वच दुर्दैवी घटना आपल्याकडून केवळ हीच अपेक्षा करीत आहेत. म्हणून, आपल्या आसपास कोणी आतल्या-आत कुढत आहे. मृत्यूबद्दल सतत विचार करते आहे, भय आणि निराशा बोलून दाखवत आहे. परिस्थितीलाच नव्हे, तर स्वत:लाही दोषी आणि अपराधी ठरवत आहे किंवा दारू, नशापाणी, रेकलेस ड्रायव्हिंग सारख्या नको त्या मार्गाने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो आहे, असे दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्यासोबत बोलताना काही आशादायक बोलण्याबरोबरच त्याच्या खऱ्या-खुऱ्या भावनांचे महत्व अजिबात कमी लेखू नका. किंवा त्याविषयी बोलण्याचे टाळू नका. त्या भावना आणि विचार तुम्हाला कितीही चुकीच्या, अनावश्‍यक वाटल्या तरी त्यांना तुच्छ लेखू नका. त्या भावनांचा तुमच्यापाशी सावकाशीने, मोकळेपणाने, अजिबात न अडवता निचरा होऊ द्यात. खरे तर, आपल्यापैकी कुणालाही अशाच मन:स्थितीचा कधीही सामना करण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी आपण सर्वांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यायला हवीत. ती म्हणजे, एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. मदत नेहेमीच कुठूनही उपलब्ध होऊ शकते. आणि प्रत्येक रात्रीनंतर दिवस आहेच आहे. तेव्हा, धीर धरा आणि आशा कधीच सोडू नका ! 
 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या