जागतिक हस्ताक्षर दिन विशेष! हस्ताक्षराची गोडी, जगाशी नाते जोडी..

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

२३ जानेवारी, जागतिक हस्ताक्षर दिन! जगभरातील हस्ताक्षर प्रेमी हा दिवस जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा करतात. या डिजिटल युगात हस्ताक्षर कला लोप पावते की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कलेचे संवर्धन करण्यासाठी हस्ताक्षर प्रेमी या दिवशी विविध उपक्रम राबवितात. भारत हा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या व लिहिल्या जातात. प्रत्येक लिपीचे सौंदर्य वेगळे आहे. दोन हस्ताक्षर प्रेमी जेंव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात लगेच मैत्री होते. ते अक्षरमित्र बनतात. मग ते वेगवेगळ्या राज्यातील असो किंवा वेगवेगळ्या देशातील. कारण, प्रत्येक हस्ताक्षर प्रेमीचे हस्ताक्षर हीच त्यांची ओळख असते. आपल्याकडेही समर्थांनी ३००-३५० वर्षापूर्वी दासबोधातून आपल्याल्या हस्ताक्षर सुंदर कसे करावे याचे मार्गदर्शन केले. या काळातही हे मार्गदर्शन आपल्याला महत्वाचे ठरते. 

बालके बाळबोध अक्षर | घडसुनी करावें सुंदर|
जे देखतांचि चतुर | समाधान पावती ||
दासबोध : समर्थ रामदास स्वामी

समर्थांनी ३००-३५० वर्षापूर्वी दासबोधातून आपल्याला आपले हस्ताक्षर सुंदर कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या काळात देखील हे मार्गदर्शन आपल्याला अत्यंत मोलाचे ठरते. यावरून समर्थांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. यातील ‘घडसुनी’ हा शब्द महत्वाचा आहे. अक्षर सुंदर करायचे असेल तर ते घोटून सुंदर केले पाहिजे. आजच्या संगणकाच्या युगात हस्ताक्षर कला लोप पावते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरंतर आपण लिहितो कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. ‘वाचण्यासाठी’. आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता आले पाहिजे. पण, कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येत नाही. तर कित्येक वेळा आपण लिहिलेलेच थोड्या दिवसानंतर आपल्याला वाचता येत नाही. एखाद्या व्यक्तीचे सुंदर अक्षर बघितले की, आपल्याही मनात हस्ताक्षर सुधारण्याचा विचार येतो. विद्यार्थ्यांसुध्दा हस्ताक्षर चांगले नसल्यामुळे कमी गुण मिळाल्याचे आपण बऱ्याचदा ऐकतो. पण, हस्ताक्षर सुधारण्यासाठी नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. पालकही मुलांच्या हस्ताक्षाराबाबतीत चिंता करत असतात. 

हस्ताक्षर सुधारण्यासाठी सुरुवात करण्याअगोदर हस्ताक्षाराविषयी काही गैरसमज आहेत. त्यापैकी एक गैरसमज म्हणजे हस्ताक्षर एका विशिष्ट वयातच सुधारते. खरंतर हस्ताक्षर सुधारण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. गरज असते प्रयत्नांची व काही मुलभूत नियम समजून घेण्याची. दुसरा गैरसमज आहे की, सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी आहे. खरंतर सरावाने सर्वांचे हस्ताक्षर सुंदर होऊ शकते. रोज योग्य पद्धतीने सराव केल्यास हस्ताक्षर सुधारते. आता थोडीशी आपण आपल्या मराठी भाषेची माहिती घेवूया. आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण ४८ मुळाक्षरे आहेत. या मुळाक्षरांचा वापर करून आपली भाषा बनते. लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील १५ वी व भारतातील ४ थी भाषा आहे. ज्येष्ट साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी,  हा दिवस आपण ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करतो. आपल्याला हस्ताक्षर सुंदर करावयाचे असेल तर मुळाक्षरे, त्यांचा आकार, मुळाक्षर काढताना कोठून सुरु करावयाचे व कोठे थांबावे या सर्व गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.
 
आता हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोणते साहित्य वापरावे ते आपण बघूया. अजूनही आपल्याकडे  लहान मुलांना लेखन करण्यासाठी शिश पेन्सिल दिली जाते. खरंतर जुन्या काळी लेखन करण्यासाठी टाक, बोरू, शाईची दौत याच वापर केला जात असे. हे सर्व साहित्य हाताळणे हे लहान मुलांना अवघड होते. म्हणून त्या काळी लिखाणासाठी लहान मुलांना शिश पेन्सिल दिली जात असे. पण, आज कित्येक कंपन्याचे जेल पेन, शाई पेन उपलब्ध आहेत की जे लहान मुलांना हाताळण्यास एकदम सोपे आहेत. तेव्हा या पेनचा वापर लहानपणापासूनच लिखाणात केला तर काही अडचण येणार नाही. लहान मुलांना जसे आपण सुरुवातीला सायकल शिकताना आधारासाठी दोन बाजूला चाके असणारी सायकल आणून देतो. तसेच शाईच्या पेनाला दोन टोके असल्यामुळे लहान मुलांना अक्षर काढताना समतोल साधने सोपे जाते. शिश पेन्सिलचा उपयोग मार्गदर्शक रेषा मारणे, काही मुलभूत भौमितिक आकारांचा सराव करणे यासाठीच करावा. अक्षर सुंदर करावयाचे असेल तर तर अक्षरांचे वळण, अक्षराची जाडी कोठे बारीक आहे, कोठे जास्त आहे याचाही अभ्यास करणे गरजचे आहे. हा अभ्यास करण्यासाठी आपण देवनागरी लिपीसाठी बाजारात मिळणारे कट-निबचे पेन वापरू शकतो. 

तसेच आपण सरावासाठी चार-रेघी वहीचा वापर करू शकतो. कट-निबच्या पेनने सराव झाल्या नंतर मग आपण आपल्या दैनदिन वापरातील पेनने सराव करू शकतो. प्रत्येक मुळाक्षर हे काही भौमितिक आकारांचे बनले आहे. त्यामुळे सुरवातीला उभी रेषा, आडवी रेषा, अर्धा गोल, पूर्ण गोल तिरप्या रेषा यांचा सराव करणे आवश्यक आहे. लहान मुलांना पेन नीट धरता यावा म्हणून काही व्यायाम प्रकार देखील करून घेता येतील की जेणेकरून त्यांच्या बोटातील ताकद वाढेल. उदा. घरातील जुन्या वर्तमानपत्राचा कागद चुरगाळून त्याचा बारीक गोळा तयार करणे. स्प्रे वापरून घरातील रोपांना पाणी घालणे. छोट्या कात्रीचा वापर करून कागदाचे लहान-लहान तुकडे करणे किंवा विशिष्ट आकार कापणे. यामुळे मुलांच्या बोटामधील ताकद वाढून हस्ताक्षर सुधारण्यास मदत होते. हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करताना सुरुवातीला आपण काही नियम समजून घेतले पाहिजेत. त्या नियमांचा उपयोग केल्यास कमी वेळामध्ये हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल. 

  1. अक्षरावरील आडवी रेषा (शिरोरेषा) व अक्षरातील उभ्या रेषा एकमेकास काटकोनात असाव्यात. 
  2. अक्षरातील उभ्या रेषा एकमेकांस समांतर असाव्यात. 
  3. अक्षरातील तिरप्या रेषा ४५ अंशामध्ये असाव्यात. 
  4. अक्षरांची वळणे गोलाकार असावीत.
  5. वेलांटी, रफार, उकार, मात्रा यांची उंची अक्षराच्या उंचीच्या निम्मी असावी.
  6. दोन ओळीमधील अंतर अक्षराच्या उंचीएवढे किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असावे. 
  7. अक्षराची उंची निबच्या जाडीच्या ५-६ पट असावी.
  8. पेन धरताना टोकापासून २ ते २.५ सेमी मागे धरावे. 
  9. कागद-वही अशा पद्धतीने धरावे की आडव्या रेषा डोळ्याला समांतर येतील.
  10. लिहिताना समोरून किंवा डावीकडून योग्य प्रकाश येणे आवश्यक.

मुळाक्षरांचा सराव करताना मुळाक्षरांचे त्यांच्या आकारानुसार गट तयार करावेत व मग त्या गटातील मुळाक्षरे व मुळाक्षरांनी बनलेले शब्द याचा सराव करावा. मुळाक्षरांचा सराव झाल्यानंतर मात्रा, वेलांटी, रफार, उकार याचादेखील सराव करावा. मुलांना हस्ताक्षराचा सराव करताना गोडी वाटावी म्हणून काही उपक्रमदेखील आपणास राबविता येतील. मुलांना पोस्ट-कार्ड आणून द्यावीत व जवळच्या नातेवाईकांना सुंदर हस्ताक्षारामध्ये पत्रे पाठविण्यास सांगावे. मुलांना सण-उत्सव याकरिता शुभेच्छा पत्रे तयार करावयास सांगून अशी तयार केलेली शुभेच्छा पत्रे घरामध्ये दर्शनी भागात लावावीत. अशामुळे मुलांना सुंदर हस्ताक्षराविषयी गोडी निर्माण होऊन हळूहळू त्यांचे हस्ताक्षर सुधारत जाईल. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे हस्ताक्षर सुंदर करावयाचे असेल तर ते घोटले पाहिजे. रोज योग्य पद्धतीने सराव केला पाहिजे. हे केल्यास आपल्या हस्ताक्षारामध्ये नक्कीच सुधारणा होईल.
शेवटी एवढेच म्हणावसे वाटते, || नित्य लिहा पाच ओळी, खुलेल अक्षराची कळी || (शब्दांकन : हेमंत पवार) 

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com