कोरोना : महिला आणि मासिक पाळी!

कोरोना : महिला आणि मासिक पाळी!

भारतामध्ये 'मासिक पाळी' हा विषय अद्याप अस्पृश्य वा तुच्छ समजला जातो. याविषयी समाजात नको ते समज - गैरसमज पसरवले जात आहेत. यासाठी धर्म, रुढी, परंपरांचा आधार घेतला जातो आहे. हजारो वर्षे ज्या धर्म व सांस्कृतिक व्यवस्थेने स्त्रीला झूकवले, हरवले, नागवले, अशिक्षित ठेवले आणि तिच्या स्वातंत्र्याचा चुराडा करुन तीला गुलाम बनवले ती हरामखोर व्यवस्था आजही घराघरात दबा धरुन बसलेली आहे. त्यामुळे २१ व्या शतकात सुद्धा या देशात 'मासिक पाळी' च्या दरम्यान बाजूला बसणे, देव्हाराला हात न लावणं, लोणच्याला हात न लावणे,पापड करत असताना हात लावू नये, यात आता कामानिमीत्ताने मी कोकणात आहे इथेही खूप गैरसमजुती आहेत प्रसंग पहिला मी जिथे राहते तिथे पिण्यासाठी विहरीतून पाणी काढावे लागते. घरमालकिणीने सांगितले पाळी आली कि विहरीवर जायचे नाही त्या स्वतः पाणी आणून देणार त्यांनी आणलेले पाणी आपण ओतून घेतले कि त्या कळशीला सरळ उभी करून ठेवले तर त्या हात लावत नाही ती कळशी उलटी करून ठेवायची मग त्या हात हात लावणार. प्रसंग दुसरा माझ्या शेजारी एक शिक्षक कुटुंब राहते त्यांची दोन छोटी मुले आहेत. आता त्या मुलांच्या आईला पाळी आली कि घरमालकिणीने सांगितले मुलांना सुती कपडे घालायचे नाही तर सिल्कचे सुळसुळीत कपडे त्यांना घालायचे कारण ते आई जवळ सारखे जातात. नवीन संशोधन पुढे आले सुती कपडे घातले की विटाळ होतो. कॉलेजमध्ये लिंगभाव शिकवत असताना इथल्या विद्यार्थ्याकडून पाळीच्या वेळेत काय काय करतात हे ऐकले तेव्हा डोके एकदम चक्रावून गेले. पाळीच्या वेळेस अगदी हीन वागणूक दिली जाते. अगदी लाईट्च्या बटणाला जरी त्या स्त्रीने हात लावला तर विटाळ मानला जातो. बर या दिवसात बाईला तेवढाच आराम मिळतो म्हणावे तर तिला फक्त अन्न शिजवण्याव्यतिरिक्त सगळे काम करावे लागते. कपडे धुतलेले चालतात पण वाळलेल्या कपड्यांना हात लावायचा नाही. एक न अशा अनेक गोष्टी आहेत. अशा प्रथा- परंपरा अनेक घरांमध्ये पाळायला लावल्या जात असून समाजमनात त्या खोलवर रुजवल्याही जात आहेत. कोणी म्हणेल की हे असले प्रकार आता कुठे राहिलेत किंवा स्त्रियांना आता कोणी तशी वागणूक देत नाही वगैरे वगैरे त्यांनी ' पण आजही ग्रामीण भागात असे प्रकार सुरु आहेत. असे मी ठामपणे सांगू शकते. महिलांचीच याबाबती मानसिकता खूपच क्लेशदायक आहे. ती बदलणे फार गरजेचे आहे. का अशा प्रथा पंरपरा पाळणाऱ्या वाहक ह्या महिलाच!

पाश्चिमात्य स्त्रीवादी विचारवंत Iris Marion Young यांच्या मते, महिलांना जर समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या रोजच्या आयुष्यातील मासिक पाळीचा अनुभव समजून घ्यायला लागेल. जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात ह्याबाबतीतले ज्ञान नसल्यामुळे crisis सुरु होतात. स्त्रिया या 'मासिक पाळी' च्या काळात खुप चिडचिड करतात. भारतीय समाज व्यवस्थेत धर्मपरंपरा, पुरुषसत्ताक व्यवस्था याने स्त्रीला हीन,तुच्छ आणि व्यवस्थेतला शेवटचा घटक मानल्यामुळे 'मासिक पाळी' च्या काळात मानसिक भावनिक पातळीवर हतबल असते. आपण खरोखरच तुच्छ आहोत काय अशी भावना सतावत रहाते. वास्तविक आशा परिस्थितीत तीला 'मासिक पाळी' येते तेव्हा नेमके काय केले पाहिजे हे समाजव्यवस्थेने शिकवले पाहिजे. तसेच ही एक नैसर्गिक क्रिया आहे असे सांगितले पाहिजे  मात्र तसे घडत नाही. या उलट स्त्रीचे दमन आणि शोषण करणा-या प्रथा कशा पालन केल्या पाहिजेत हेच सतत शिकवले जाते ! तू या काळात अशूभ असतेस म्हणून ह्या वस्तूला हात नको लावू, त्या वस्तूला हात नको लावू असे निर्बंध घातले जातात. खरेतर 'मासिक पाळी' या विषयासंदर्भातील जागरुकता वाढवण्याची गरज आहे. मासिक पाळी बाबत जी जुनाट मानसिकता आहे ती बदलवण्यासाठी व्यापक प्रबोधनाची आणि प्रयत्नांची गरज विसरता कामा नये. जर एखाद्या महिलेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षें असेल तर साधारणतः तिला ११ ते १३ व्या वया दरम्यान मासिक पाळी सुरू होते तेव्हापासून ते मेनोपॉज पर्यंत म्हणजेच वयाच्या ४५ ते ५२ व्या वर्षापर्यंत मासिक पाळीचे चक्र सुरू राहते. अर्थातच तिच्या वयाच्या अर्ध्या कालखंडात तिला मासिक पाळीचा अनुभव येत असतो. अशा वेळी काय काळजी घ्यायाला हवी याची माहिती तिला मिळायला हवी. निर्जंतुक  सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले पाहिजेत. ग्रामीण, आदिवासी, शेतकरी गरीब कुटूंबातील, मोलमजूरी करणारी स्त्रीयांना सॅनिटरी नॅपकिन सारख्या  वस्तू घेऊ शकत नाही. हातावरचे पोट आसणा-या स्त्रियांना ते परवडणारे नाही. खरेतर, त्यांनाही तितकीच गरज असते , मी तर असे म्हणेन त्यांना तर ह्या बाबतीत स्वछतेची काळजी जास्तच घ्यावी लागते. त्या वापरत असलेला कपडा निर्जंतुक नसतो. वाळवण्याच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. जर सॅनिटरी नॅपकिन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत वाटले गेले पाहिजे. असे झाले तर सर्व स्तरातील महिलांना सहज उपलब्ध होईल व त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल. खरंतर, सद्या लॉकडाऊन मुळे वर्तमानस्थितीत महिंलाची अवस्था ही अस्वस्थतेच्या गर्तेत अडकून पडली आहे. कोरोना व्हायरसच्या काळात सारंकाही बंद असताना स्त्रीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सृदृढ कसे राहील हे पाहिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com