स्क्रीन रेकॉर्डिंग 

Screen Recording
Screen Recording

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढत आहे तसतशा त्यातून निर्माण होणाऱ्या गरजाही वाढत आहेत. या गरजेतूनच "स्क्रीन रेकॉर्डिंग' हा शिक्षणातील तंत्रज्ञानासंदर्भातील नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. "स्क्रीन रेकॉर्डिंग' याचा अर्थ स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी डिव्हाईसची स्क्रीन जशीच्या तशी रेकॉर्ड करणं होय. म्हणजे स्क्रीनवर ज्या-ज्या गोष्टी आपल्याला दिसत असतात किंवा ज्या-ज्या गोष्टी आपण करत असतो त्या जशाच्या तशा आवाजासह रेकॉर्ड करता येणं होय. आणि याचा मोठ्या खुबीनं आपल्याला अध्यापनामध्ये वापर करता येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या मुलाचा अभ्यास झाला नसेल तर तो परत समजवण्यासाठी जेव्हा शिक्षकांना वारंवार त्याच गोष्टी सांगाव्या लागतात, त्याऐवजी जर आपण स्क्रीन रेकॉर्ड केलेला एखादा व्हिडिओ असेल किंवा इंटरॅक्‍टिव्ह व्हाईट बोर्डवर घेतलेल्या पाठाची जर स्क्रीन रेकॉर्ड केली असेल तर मुलांना स्क्रीन रेकॉर्डिंगचा तो व्हिडिओ आपण दाखवला तर शिक्षक म्हणून आपलं परत एकदा करायचं अध्यापनातील कष्ट वाचू शकतात. अभ्यासात मागे पडलेली मुलं, शाळेला गैरहजर असणारी मुलं किंवा मुलांना जर काही समजण्यासाठी अडचण आली असेल तर ते कळण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणता येतील. यामुळं आणखी एक गोष्ट होते, ती म्हणजे शिक्षकांना परत परत एखादी गोष्ट सांगण्याची गरज पडत नाही. एखादं काम परत परत करण्याची गरज पडत नाही. 

त्याचबरोबर अनेक वेळा शिक्षकांना ऑनलाइन कामे करावी लागत असतात. अशामध्ये काही शिक्षकांना एखादी गोष्ट करताना अडचण येते, त्या समजत नाही त्यावेळेस स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली एखादी व्हिडीओ क्‍लिप ज्याच्यामध्ये सर्व ऑनलाइन प्रक्रिया स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवलेली असते ती जर आपण त्यांना शेअर केली तर त्या व्हिडिओला बघून सुद्धा एखाद्या गोष्टीला स्टेप-बाय-स्टेप कसे करावे हे शिक्षकांना कळू शकते. म्हणून स्क्रीन रेकॉर्डिंग टीव्ही, स्मार्ट बोर्ड, मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर जर आपण वापरत असतो तर नक्कीच त्याचा आपल्याला अध्यापनामध्ये वापर प्रभावीपणे करता येणार आहे. यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालं, तर मोबाईलसाठी झेड रेकॉर्डर, ए झेड स्क्रीन रेकॉर्डर, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसाठी कॅम स्टुडिओ, बॅंडीकॅम आदी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. यातील काही सॉफ्टवेअर हे पेड आहेत तर काही फ्री आहेत. ज्या वेळेस एखादं फ्री सॉफ्टवेअर आपल्याला वापरायचं असतं तर त्याचा वॉटरमार्क आपल्याला येथे दिसतो. 

मुलं सोडवत असतील आणि त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग केली तर किती वेळात एखाद्या मुलानं परीक्षा सोडवली हेसुद्धा शिक्षकांना समजू शकतं. अर्थात ते मुलांचं मूल्यमापन करू शकतात. शेवटी काय स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण कामांमध्ये लागणारा वेळ वाचवू शकतो किंवा एखादं काम परत परत करण्यासाठी लागणारा वेळ, कष्ट वाचवू शकतो. शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांसाठी स्क्रीन रेकॉर्डिंग हा एक चांगला पर्याय म्हणून आपल्या शिक्षणामध्ये वापरायला हरकत नाही. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com