Siddhidatri Devi, Navratri Day 9, Maha Navami
esakal
सिद्धिदा : आज नवरात्रीचा नववा दिवस! महानवमी! या दिवशी नवदुर्गांपैकी 'सिद्धिदा' या देवीच्या नवव्या स्वरूपाचे पूजन करतात. सिद्धिदा म्हणजे 'सिद्धी प्रदान करणारी'. तिला 'सिद्धिदात्री' असेही म्हणतात. दा किंवा दात्री म्हणजे देणारी. सृष्टिरचनेच्या वेळी ब्रह्मदेवांना काही प्रश्न पडले होते.त्यासाठी त्यांनी शंकरांची मदत मागितली.त्यावेळी सृष्टिनिर्मिती कार्याच्या सुकरतेसाठी, सुलभतेसाठी भगवान शंकरांनी आदिशक्तीची आराधना केली.भगवान शिवांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन पराशक्ती सिद्धिदात्रीच्या दिव्य स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि कृपाशीर्वाद स्वरूपात तिने शिवांना अष्ट सिद्धी प्रदान केल्या.अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, ईशिता आणि वशिता ह्या त्या अष्टसिद्धी होत. या अष्ट सिद्धींच्या प्रभावाने भगवान शंकरांचे अर्धे शरीर नारीस्वरूप झाले व अर्धे शंकरांचे राहिले,आणि तेव्हापासून 'अर्धनारी नटेश्वर' या नावाने ते प्रसिद्ध झाले.अर्धनारी नटेश्वर या रूपात शिवशक्तींचे मीलन झाले. या घटनेनंतर ब्रह्मदेवांच्या सृष्टिनिर्मितीच्या कार्याला चालना, प्रेरणा मिळाली. ह्या कथेचा मथितार्थ असा की, निसर्गात पुरुष म्हणजे शिव आणि स्त्री किंवा प्रकृति म्हणजे शक्ती या दोन्हींचे संतुलन आणि सामंजस्य अत्यंत आवश्यक आहे.शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत असे म्हटले जाते. 'शिव' या शब्दातील इकार काढला तर तो शब्द 'शव' होतो.