sister ligi
sister ligisakal

युक्रेनच्या युद्धग्रस्तांचे आधारस्थान : सिस्टर लिजी

युक्रेनचा प्रत्येक सैनिक रशियाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी प्राण पणाला लावतोय.
Published on

नवी दिल्ली - 'युक्रेनचा प्रत्येक सैनिक रशियाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी प्राण पणाला लावतोय. हा निश्चय तुम्ही का केला, असं विचारता ते सांगतात, युद्ध चालू असताना आम्ही ठार झालो, तर एकदाच मरण येईल.

परंतु, रशियाला युद्धात यश मिळाले व त्यांनी युक्रेनचा ताबा घेतला, तर मरण रोजचे असेल. पारतंत्र्य म्हणजे मरणच आहे. त्यानंतर, युक्रेनचे सैनिक काय, की नागरीक काय, त्याचा अनन्वित छळ सुरू होईल,’ सिस्टर लिजी सांगत होत्या.

दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेन्टर मधील `स्कॉलर्स ग्रूप’चे प्रमुख माजी राजदूत के.पी.फेबियन यांनी आयोजित केलेल्या एका संवादात सिस्टर लिजी पायापिल्ली बोलत होत्या. त्या मूळच्या केरळमधील अंगामाले गावच्या. 24 डिसेंबर 1973 रोजी त्यांचा जन्म झाला.

1999 पासून गेली 26 वर्षे त्या युक्रेनमध्ये ख्रिश्चन महिलांच्या मठात राहून जनसेवेचे काम करीत आहेत. त्यांच्या अथक सेवेची जाणीव ठेऊन 2018 मध्ये सरकारने त्यांना युक्रेनचे नागरिकत्व बहाल केले.

युद्धग्रस्त व वृद्धांसाठी त्यांनी `ओल्डएज होम (वृद्धाश्रम)’ स्थापन केले असून, युद्ध चालू असतानाही युक्रेनच्या शहराशहरातून भ्रमंती करीत तेथील अत्यंत कठीण परिस्थितीत त्या जनतेची सेवा करीत आहेत. त्यात असंख्य विधवा व त्यांच्या मुलाबाळांचा समावेश आहे.

'रात्रंदिवस कोणत्याही शहरात, कुठेही रशियन क्षेपणास्त्रे व बॉँब वर्षाव होत असतो,’ असे सांगून त्या म्हणाल्या, 'रशियाने लादलेले हे युद्ध तीन वर्षापूर्वी 2022 मध्ये सुरू झाले नाही, तर, त्याची सुरूवात रशियाने 2014 मध्ये क्रीमियावर आक्रमण केले, तेव्हा झाली.

रशियाने क्रीमिया तर गिळंकृत केलाच. परंतु, पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनचे धान्याचे कोठार असलेले व संरक्षणाच्या क्षेत्रातील अनेक महत्वाचे कारखाने असलेल्या युक्रेनचा घास घेऊन रशियन साम्राज्याचा युरोपात विस्तार करण्याचे स्वप्न रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पाहात आहेत.’

'2014 मध्ये ऱशियाच्या आक्रमणाची दाट छाया डोनबास, डोनेट्स्क, क्रीमिया, लुहान्स यावर पसरली,’ असे सांगून सिस्टर लिजी म्हणाल्या, '2018 मध्ये मी अन्य सिस्टर्स सह या परिसराचा दौरा केला, तेव्हा वाळलेल्या चिखलाच्या बंकर्समध्ये दिवसेंदिवस सैनिक बंदुका घेऊऩ पहारा करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यातून केवळ लढण्याचा निर्धार दिसत होता.’

'24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने जोरदार बाँबवर्षाव केला. ती रात्र भयाण होती. जागोजागी धुळीचे व आगीचे लोट दिसत होते. इमारती बेचिराख होत होत्या. त्यात कुणी वाचणेच शक्य नव्हते. आमच्या मठात येणारे दूरध्वनि थांबत नव्हते. एखादी लाट यावी, तसे ते आदळत होते. त्यात भारतीय विद्यार्थी तर होतेच, पण अनेक क्षेत्रात काम करणारे तज्ञ, अभियंते, त्यांची कुटुंबे आदी होती.’

त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सिस्टर लिजी व सिस्टर ख्रिस्तीना यांनी गाडी काढली. त्या म्हणाल्या, 'केवळ 9 सीट्स क्षमता असलेल्या मोटारीत पंचवीस जणांना आम्ही अक्षरशः कोंबले व मठात आणले.

यावेळी परमेश्वराची प्रार्थना करणे व मदतीची अपेक्षा करणे याशिवाय आम्ही काही करू शकत नव्हतो. रेड क्रॉसच्या कार्यकर्त्यांनीही स्वतःला झोकून दिले होते. रूमानिया व हंगेरीच्या सीमेवरून येणाऱ्या युद्धग्रतांच्या स्वागतासाठी आम्ही तयार होतो. त्यावेळी आम्ही बाराशे लोकांना युद्धाच्या वणव्यातून वाचविले.’

'मठात त्यांची सेवा करताना, त्यांच्यासाठी जेवण बनविताना, त्यांची स्वच्छता राखताना आमचे हात कधी थकले नाही. जीवघेण्या थंडीत त्यांची झोपण्याची, पांघरूणांची व्यवस्था करीत होतो. एकेका दिवशी आम्ही पाचशे ते सहाशे लोकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करीत होतो.

अनेक वेळा जेवणाची भली मोठी भांडी घेऊऩ आम्ही रेल्वे स्टेशनवर जायचो. प्रवाशांना जेवण द्यायचो, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील भय व कारूण्य पाहिले, की अंगावर काटा यायचा. थऱथरत्या हाताने आम्ही दिलेले पदार्थ ते घ्यायचे. 1200 लोकांना आम्ही वाचवू शकलो, याचे समाधान वाटते. आमच्या प्रयत्नांमागे परमेश्वराचा हात होता, यात शंका नाही.’

'युद्ध सुरू झाले, तेव्हा 19000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते. त्यांच्याकडून फोन येत. आम्ही अमूक जागी अडकलो आहोत, सुरक्षित स्थळी कसे यायचे, असे त्यांचे फोन येत. तेव्हा मी त्यांना मठात येण्यासाठी कोणता रस्ता सुरक्षित आहे, हे सांगत असे. असे शेकडो विद्यार्थी मठात आले. भारतात परतेपर्यंत अनेक जण आमच्या बरोबर राहिले.’

'एक प्रसंग आठवतो. होलोकास्ट मधून वाचलेल्या 92 वर्षांच्या सीना मठात आली. या महिलेला पुन्हा त्या भयाण दिवसांची आठवण झाली. तरीही थरथरत्या स्थितीत ती म्हणाली, आय एम नॉट अफ्रेड टू डाय एनी मोअर, बिकॉज आय एम नो लॉंगर अलोन.’ 'तसंच, तरूण जुलिया त्या धगधगीतून नवअभ्रकाला घेऊन कशीबशी आली होती.

तिच्या हातातील बाळाला घेताना प्रसूतीचा गंधही जाणवत होता,’ असे सांगून, 'नावं लिहिलेल्या पट्ट्या लावलेली असंख्य बालकं पाहताना ऋदय पिळवटून निघे,' असे सिस्टर लिजी म्हणाल्या. 'ती सारी बेवारशी होती. युद्धात मातापित्यांचा मृत्यू झालेला, पण, दुर्दैवाने की सुदैवाने वाचलेली. पोटच्या मुलांना महिनोनमहिने न पाहिलेल्या रडकुंडीला आलेल्या, शून्यात पाहाणाऱ्या स्त्रिया, भेटल्या.’

`कॉल्ड टू युक्रेन’ या पुस्तकात सिस्टर लिजी यांनी लिहिले आहे, 'आय मेट विडोज, देअर हँड्स एम्टी, हार्ट्स हॉलोड बाय एबसेन्स. अँड द चिल्ड्रन-गॉड द चिल्ड्रन - विथ देअर फ्यूचर्स स्प्लिंटर्ड लाईक ग्लास अंडरफुट, आईज टू ओल्ड फॉर देअर फ्राजाईल फेसेस.

यट, इव्हन इन धिस एबिस ऑफ डिस्पेअर, युक्रेन्स स्पिरिट रिफ्यूजस टू बी एक्सिटिंग्विशड’ युक्रेनचे अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांनी वॉशिंग्नटनमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली, तेव्हा त्यांना कपड्यावरून त्यांच्यावर कुत्सित टिप्पणी करण्यात आली होती. त्यावेळी ट्रम्प व उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स टाय व सुटाबुटात होते.

परंतु, झेलेनस्की मात्र साध्या टी शर्ट मध्ये गेले होते. त्याबाबत विचारता, सिस्ट लिजी म्हणाल्या, 'युक्रेनमध्ये राजधानी किव्ह सह अनेक शहरातून वीज नाही, मरणाची थंडी आहे. सतत हल्ले चालू असल्याने लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या डोक्यावर ना छप्पर आहे, ना जखमींची शुष्रुशा करणारी रुग्णालये आहेत. त्यांनाही रशियाने सोडलेले नाही.

त्यामुळे असंख्यांवर भटक्यांचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. कित्येकांच्या अंगावर धड कपडे नाही, सतत चाललेल्या युद्धामुळे अपंग झालेल्या सैनिकांचा व कुटुंबाची वाताहात झालेल्या लोकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या स्थितीत त्यांच्याशी मानसिक जवळीक साधून, देशातील परिस्थितीची जाणीव ठेऊन झेलेन्स्की यांनी साधा पेहराव केला होता, हे योग्यच झाले. सुटाबुटाची गुलामीही त्यांना नको होती. शिवाय, आपल्याला ठाऊक असेलच, की राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी ते उत्तम अभिनेते, कथाकार होते.’

1978 मध्ये जन्मलेले झेलेन्स्की (वय-47) यांचे शिक्षण कीव्ह च्या नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमध्ये झाले. अभिनेता, कलाकार, कथालेखक, निर्माते, स्टँडअप कॉमेडियन ( कुणाल काम्रासारखे) म्हणून ते प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यांच्या कॉमेडी स्पर्धक गटाचे नाव `क्वार्ताल -95’ असे होते. इंटर टीव्ही स्टेशनचे ते कार्यकारी निर्माते होते.

त्यांनी `द लीग ऑफ लाफ्टर’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या गटाने दहा चित्रपटांची निर्मिती केली. त्यासाठी त्यांच्या गटाला तब्बल 30 राष्ट्रीय पारितोषिके बहाल करण्यात आली. 'अत्यंत कठीण परिस्थितीत ते युक्रेनचे नेतृत्व करीत आहेत.’

सिस्टर लिजी म्हणतात, '24 फेब्रुवारी 2025 रोजी युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली. ते केव्हा संपणार याची शाश्वती नाही. माझ्या आई वडिलांनी बालपणापासून माझ्यात मानवसेवेचे बीज पेरले. म्हणूनच, युद्धकाळात संकटे आली, तरी त्यांना पार करण्याची तयारी मी केली आहे. केरळमध्ये माझा जन्म झाला असला, तरी मी आता युक्रेनची नागरीक आहे. म्हणूनच अखेरपर्यंत या देशांच्या सेवेत राहण्याचा निर्धार मी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com