अखंड सेवेचा नंदादीप

a social reformer of vinayak gadre from ichalkaranji special  article of praveen kulkarni in kolhapur
a social reformer of vinayak gadre from ichalkaranji special article of praveen kulkarni in kolhapur

कोल्हापूर : ‘मैं उस प्रभू का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहतें हैं...’ भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे तेजोवलय असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे हे आवडते वचन. ज्या समाजात वावरलो, मोठे झालो, चांगल्या-वाईटाची जाण आली, त्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जे जे शक्‍य असेल ते करणे, हे खरे सुविद्यतेचे लक्षण. इचलकरंजीतील विनायक गद्रे दाम्पत्य त्यांपैकीच. वय सत्तरीतले अन्‌ उमेद विशीतली. पॉवरलूम अन्‌ शेती व्यवसाय असणाऱ्या गद्रे काकांचा समाजकार्य हा पिंडच.

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याचा आदर्श घेत त्यांनी पत्नी विनया यांच्या साहाय्याने कौशल्य विकास योजनेखाली विविध उपक्रम राबविले. नववी, दहावी, अकरावी-बारावीच्या मुलींसाठी त्यांचे विशेष कार्य आहे. शिवणकामांद्वारे मुलींना त्यांनी स्वावलंबी बनविले. स्त्री शिक्षित झाली म्हणजे संपूर्ण घर उभे राहते, हा त्यामागचा सुज्ञ विचार. सामान्य कुटुंबातील मुलींना घरीच शिवणकाम शिकवायचे, बाहेरून रॉ मटेरियल आणून रूमाल, छोट्या पिशव्या, पायपुसणे, मास्क बनविण्यास शिकवायचे, त्या वस्तू मुलींना बाहेर योग्य भावात विकायला लावायच्या, त्यातून त्यांचा महाविद्यालयासह क्‍लासची फी व इतर खर्च निघावा, ही अपेक्षा.

असं व्यवहारज्ञानाचं बाळकडू पाजायचं, जगण्यासाठीची सकारात्मकता पेरायची, हे गद्रे काकांचं काम... त्यांच्या दृष्टीनं ती आदिशक्तीची आराधनाच जणू. त्यांचं घर म्हणजे मुलांसाठी अभ्यासाचं हक्काचं ठिकाण...सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत कुणीही यावं अन्‌ ज्ञानसाधना करावी... तेथे संगणकाचीही व्यवस्था आहे. तेथे अभ्यास करून अनेकजण आज उच्च पदावर कार्यरत आहेत. आर्थिक, कौटुंबिक वा कुठलीही अडचण असो, काका आहेत, हा मुलांना आधार. लॉकडाउन काळात हातावरचे पोट असलेल्या अनेक कष्टकरी कुटुंबांची आबाळ झाली. अशा कष्टकरी दहाजणांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. अत्यल्प किमतीत मास्क विकले. सुमारे दोन हजारांवर मास्कचे मोफत वाटप केले.

एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेला पौष्टिक आहार देतानाच हाताला कामही दिले. काही मुलींसाठी नवीन शिलाई मशिनची व्यवस्था केली. शिरदवाडमधील काही शेतमजूर महिलांसाठी अन्नधान्य दिले. आंबा, वैभववाडीतील काही मुलींना त्यांनी स्वखर्चाने स्कूटर चालविण्यास शिकविले. १९९६-९७ मध्ये त्यांनी शिरदवाड येथे बालवाडी शिक्षिकांसाठी कोर्स घेतला होता. त्यात सहभागी १२० जणी आज शासकीय सेवेत आहेत. साखरशाळा हा काकांच्या जिव्हाळ्याचा विषय. ते दरवर्षी लाट व शिरदवाड येथे गळीत हंगामात साखरशाळा घेतात.

मुलांना घरी त्याला जे हवे ते शिकवायचे आणि शक्‍य असेल तर त्यांच्या नोकरीसाठीही प्रयत्न करायचे. म्हणजे एकदा त्यांची भेट झाली की, त्यांनी पालकत्व घेतलेच, असे वाटावे. या कार्यात त्यांना पत्नी विनया यांचाही चांगलाच हातभार लागतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत...हेच खरं. युवा पिढीला भरभरून जे जमेल ते देत राहणाऱ्या गद्रे काकांच्या  समाजसेवेचा नंदादीप अखंड तेवत राहावा, असेच वाटते.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com