esakal | कलासक्त वनाधिपती विनायकदादा पाटील; भेट पहिली आणि अखेरची..!
sakal

बोलून बातमी शोधा

vinayak dada 1.jpg

दादांना कलेची मोठी पारख होती. अधून मधून ते छायाचित्रणही करीत असत. चांगलं दिसलं की त्या कलाकृतीची व कलाकाराच तोंडभरून कौतुक करत, त्यामुळे दादा चित्रकार, छायाचित्रकारांचे आदराचे स्थान होते. बबूलमध्ये धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणीच्या छोट्या मुलीला स्वतःचा किमती मोबाईल देऊन, कदंबवनातील बबुलच्या आवारात फुललेल्या विविध फुलांचे, पानांचे तिच्याकडून फोटो काढून घेऊन, त्याच्या मोठ्या प्रति केल्या. फोटोना फ्रेम करून त्या चिमुकलीच्या फोटोचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पदरमोड करून प्रदर्शन भरवणारे दादा. या प्रदर्शनाचे उदघाटन तुझ्या हस्तेच झाले पाहिजे असा मला आग्रह धरणाऱ्या दादांनी त्या चिमुकलीमधल्या कलाकाराला मोठे व्यासपीठ व उत्तेजन दिले होते.

कलासक्त वनाधिपती विनायकदादा पाटील; भेट पहिली आणि अखेरची..!

sakal_logo
By
सोमनाथ कोकरे

दादांचा वावर सर्वच क्षेत्रात होता. राजकारण, कला, साहित्य, संस्कृती, वनशेती या विषयातील दांडगा अभ्यास त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते, नव्या राजकारण्यांना मार्गदर्शन मग तो कोणत्याही पक्ष्याचा असो दादाच्या सल्ल्याने तो समाधानी होत व त्यास मार्ग सापडत असे. व्यासपीठ मग कोणतेही असो, विषय कोणताही असो दादा बोलायला लागले की त्यांनी बोलतच राहावे आणि आपण ऐकतच राहावे अशी रसाळ व ओघवती भाषाशैली होती, वाचनाचा व्यासंग दांडगा असल्याने अनेक दाखले व उदाहरने याने भाषण समृद्ध असे.

शेती व वनशेती याविषयी केलेल्या अफाट कामामुळे त्यांना वनाधिपती ही उपाधी कवी कुसुमाग्रजांनी प्रदान केली होती, तेव्हा पासून वनाधिपती म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखत होता.
माझी व दादाची भेट १९९३ मध्ये झाली. किल्लारीच्या भूकंपग्रस्तना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मदत घेऊन गाडी जाणार होती. त्यासाठी मी गेलो होतो त्यावेळीं दादांची पहिली भेट कुसुमाग्रज यांच्याबरोबर झाली होती. प्रथम बोलण्याचा योग आला होता. "मी पुण्याहून आलोय, अभिनव महाविद्यालयाचा व सहाय्यक समितीचा विद्यार्थी त्यात प्रतापराव पवारसाहेब, यादवराव कुलकर्णी, निर्मलाताई पुरंदरे यांचा विध्यार्थी सांगितल्यावर आणखीच जवळीक झाली, तेव्हापासून त्यांची व माझी चांगलीच गठ्ठी जमली. सकाळमध्ये ऑफबीट छायाचित्र छापून आले की दादांचा फोन किंवा मेसेज आल्यावाचून राहत नसे, ते संपादकांनाही त्या छायाचित्राबाबत कळवत असत.
  
दादांना कलेची मोठी पारख होती. अधून मधून ते छायाचित्रणही करीत असत. चांगलं दिसलं की त्या कलाकृतीची व कलाकाराच तोंडभरून कौतुक करत, त्यामुळे दादा चित्रकार, छायाचित्रकारांचे आदराचे स्थान होते. बबूलमध्ये धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणीच्या छोट्या मुलीला स्वतःचा किमती मोबाईल देऊन, कदंबवनातील बबुलच्या आवारात फुललेल्या विविध फुलांचे, पानांचे तिच्याकडून फोटो काढून घेऊन, त्याच्या मोठ्या प्रति केल्या. फोटोना फ्रेम करून त्या चिमुकलीच्या फोटोचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पदरमोड करून प्रदर्शन भरवणारे दादा. या प्रदर्शनाचे उदघाटन तुझ्या हस्तेच झाले पाहिजे असा मला आग्रह धरणाऱ्या दादांनी त्या चिमुकलीमधल्या कलाकाराला मोठे व्यासपीठ व उत्तेजन दिले होते.

 कोल्हापूरच्या चित्रकाराने दादांसाठी पेंटींग पाठवून दिले होते, गुलाबी फेटा, खांद्यावर घोंगडी, पिवळा सदरा, हातात काठी हे धनगराचं  पेंटींग पाहण्यासाठी मला बोलवलं आणि चित्रकाराची नजर, चित्राची मांडणी, बॅकग्राऊंड वरील पोपटी रंगाची उधळण या विषयी दादा बोलत होते. आम्हा छायाचित्रकारांचे ते मार्गदर्शक होते. शरद पवार आणि त्यांचे निकटचे व मैत्रीचे संबंध असल्याने निवडणूक काळात कित्येक उमेदवारांना दादांमुळे तिकीटही मिळाले आहे. शरद पवार साहेबांचा दौरा कसा असेल, कधी, कोठे येतील या विषयी आम्हाला मार्गदर्शन मिळत असे, काही अडचण असो किंवा न कळणाऱ्या शब्दांचे अर्थ दादांना विचारला तर ते सविस्तर सांगत.

कदंबवनात वेगळं झाड येवो, वेगळं फुल येवो किंवा एखाद्या पक्ष्याच घरटं व पिल्ल असो दादांचा मला नक्की फोन येणारच. आधी दादा त्र्यंबक नाक्याजवळ राहत होते, सातपूर अंबड लिंक रोडवरील बबुल निवास बांधून झाल्यावर आवारात मोठमोठ्या कदंबवृक्षाचं पुनर्रोपन त्यांनी केले होते, जेसीबीने खड्डे करून त्यामध्ये क्रेनच्या साहाय्याने पंधरा-वीस फूट उंचीच्या कदंबवृक्षांचे पुनर्रोपन होणार होते ही प्रक्रिया पाहण्यासाठी व त्याची बातमी करण्यासाठी मी व त्यावेळचा माझा सहकारी यदुनाथ जोशी आम्ही गेलो होतो, दादांचा तो प्रयोग यशस्वी झाल्यावर महाराष्ट्रभर रस्तारुंदीकरणात काढलेल्या मोठमोठ्या वृक्षांचे ठिक-ठिकाणी पुनर्रोपन झाले.

मला दोन पाटलांच्या मिशाचे नेहमी विशेष आकर्षण वाटे. माजी खासदार माधवराव पाटलांच्या काळ्याभोर व जाड मिशा तर वनाधिपती विनायक दादांच्या पांढऱ्या पण धारदार मिशा. त्यामुळे  फोटोच्या निगेटीव्ह मधूनही कोणत्या पाटलांचा फोटो आहे चटकन कळत असे. दादांनी आपल्या बोलण्यातून वागण्यातून खूप माणसे जोडली, एकदा भेट झाली की तो माणूस दादांपासून दुरावत नसे, सोज्वळ व हसतमुख चेहरा, साखरेसारखी गोड वाणी त्यामुळे दादा आपलेसे वाटत. दादांना मी अखेरचं पाहिलं, त्या दिवशी दादाच्या डोक्यात गांधी टोपी होती, चेहरा मलूल झाला होता बोलणारे डोळे बंद होते, त्या पांढऱ्या मिशाही निस्तेज बनल्या होत्या, दादा मनाला रुखरुख लावून आपल्यातून निघून गेले होते, आपोआप अश्रू अनावर होत होते. दादा आम्हाला पोरके करून पुढच्या प्रवासाला निघाले होते.