‘मैदान ए जंग’चा थरार सुरू व्हायलाच हवा!

सुजित पाटील
Friday, 9 October 2020

फुटबॉल हा कोल्हापूरचा लोकप्रिय आणि जीवाभावाचा खेळ. पेठापेठांत जबरदस्त इर्ष्या असते. जिल्ह्यातील अन्य भागातही फुटबॉलचे क्‍लब आहेत. फुटबॉलवर जीवापाड प्रेम करणारे येथील रांगडे चाहते. मात्र

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला. खेळांना तर तो अधिक बसला. विविध खेळांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कोरोनाची ‘जीवघेणी एंट्री’ झाली आणि मैदानांना ‘लॉक’ लावावे लागले. पाच महिन्यांहून अधिक काळ बंद झालेल्या मैदानांवर खेळ सुरू झाला तो इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने; पण तोही देशाबाहेर. दुबईत आयपीएलचा हंगाम रंगात आला असून, प्रेक्षक नसले तरी काय झाले; चौकार-षटकारांची बरसात धमाल करीत आहे, हे नक्की!

प्रत्यक्ष मैदानावरील खेळ अनुभवण्याची सर दूरचित्रवाणीवर सामने पाहण्यात येत नाही, हे खरे; पण घरात बसून सामने पाहणाऱ्यांची संख्याही मैदानावर हजेरी लावणाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे. मुद्दा हा की आताची ‘आयपीएल’ प्रेक्षकांविनाच सुरू आहे आणि त्यातील थ्रील जराही कमी झालेले नाही. अशा पद्धतीने अन्य स्पर्धा आता खेळविण्यास सुरवात करायला हवी. प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचा ‘तिरंगा’ घेऊन प्रतिनिधित्व करावेसे वाटते. असे वाटणे हे स्वाभाविकच आणि ते त्याचे ‘ड्रीम’ही असते; पण त्याची सुरवात जिल्हा पातळीवरून होते, हे लक्षात घ्यायला हवे.

जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय अशी निवडीची प्रक्रिया असते. या प्रत्येक टप्प्यावर खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करावे लागते आणि यासाठी ते कसून सरावही करतात; पण या स्पर्धाच झाल्या नाही तर खेळाडूंची अंगमेहनत सार्थकी लागण्याची शक्‍यता कमीच. शिवाय, देशाकडून खेळण्याचे स्वप्न साकार करण्याची संधीही हुकली. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आता स्पर्धा सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

कोरोनाचा धोका आहेच; पण याबाबतच्या नियमांचे पालन करून स्पर्धा खेळविणे शक्‍य आहे. इंडियन प्रीमियर लीगने याचे मॉडेल दिले आहे. व्यवस्थापन, साधनसामग्री आणि मन्युष्यबळाच्या पातळीवर ‘आयपीएल’ने हे आव्हान पेलले असले तरी याचा विचार जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावरही करायला हवा. कोरोनामुळे ‘प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले मैदान’ असे चित्र लवकर दिसणार नसले तरी स्पर्धांतील सहभाग आणि त्यातील जेतेपद याचे मोल कमी होत नाही. 

फुटबॉल हा कोल्हापूरचा लोकप्रिय आणि जीवाभावाचा खेळ. पेठापेठांत जबरदस्त इर्ष्या असते. जिल्ह्यातील अन्य भागातही फुटबॉलचे क्‍लब आहेत. फुटबॉलवर जीवापाड प्रेम करणारे येथील रांगडे चाहते. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षीचा हंगाम मध्यावरच आटोपला आणि बऱ्याच कालावधीनंतर सुरू झालेली महापौर चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात थांबवावी लागली. यात क्‍लब आणि खेळाडूंचे नुकसान झालेच. सध्या कोरोनाचा प्रभाव ओसरत असला तरी धोका टळलेला नाही. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन प्रेक्षक नसले तरी चालतील; पण कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अबलंब व नियमांचे पालन करून ‘मैदान ए जंग’चा थरार आता नक्कीच सुरू व्हायला हवा. यातच खेळांचे आणि खेळाडूंचेही हित व भविष्य आहे.

संपादन- अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स