esakal | महाराष्ट्रातील दगडफोड्याच्या मुलाचा आंध्रात झेंडा 
sakal

बोलून बातमी शोधा

The story of ias officer Balaji Manjule

प्रत्येक मुखाला अन्न, प्रत्येक हाताला काम, प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न, तसेच प्रत्येकाच्या मनात आशावाद असा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक "कार्यकर्ता अधिकारी' म्हणून नावलौकीक मिळविलेल्या बालाजी मंजुळे यांची भरारी नेत्रदीपक अशीच आहे. मूळचे जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेले श्री. मंजुळे यांचा एक डोळा निकामा झालेला असतानाही त्यांनी या अपंगत्वावर त्यांनी लिलया मात केली आहे. दगडफोड्या अशी ओळख असलेल्या अत्यंत मागासलेल्या वडार समाजातील असूनही त्यांनी जातीच्या कुबड्या झुगारत आएएस परीक्षेत यश मिळविले. त्यांनी गाठलेले यशोशिखर पाहून अनेकांनी त्यांचा उल्लेख "दगडखाणीतील हिरा' असाच केला जातो. 

महाराष्ट्रातील दगडफोड्याच्या मुलाचा आंध्रात झेंडा 

sakal_logo
By
अभय दिवाणजी

प्रत्येक मुखाला अन्न, प्रत्येक हाताला काम, प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न, तसेच प्रत्येकाच्या मनात आशावाद असा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक "कार्यकर्ता अधिकारी' म्हणून नावलौकीक मिळविलेल्या बालाजी मंजुळे यांची भरारी नेत्रदीपक अशीच आहे. मूळचे जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेले श्री. मंजुळे यांचा एक डोळा निकामा झालेला असतानाही त्यांनी या अपंगत्वावर त्यांनी लिलया मात केली आहे. दगडफोड्या अशी ओळख असलेल्या अत्यंत मागासलेल्या वडार समाजातील असूनही त्यांनी जातीच्या कुबड्या झुगारत आएएस परीक्षेत यश मिळविले. त्यांनी गाठलेले यशोशिखर पाहून अनेकांनी त्यांचा उल्लेख "दगडखाणीतील हिरा' असाच केला जातो. 
शालेय शिक्षणावेळी दरवेळा होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळविणाऱ्या बालाजींना या स्पर्धेमुळे आपले जीवन घडत असल्याची अनुभूती स्पर्धा परीक्षेवेळी झाली. मिळालेल्या बक्षिसाची रक्‍कम आईच्या हातावर ठेवताना ती नेहमी म्हणत, "तुला कलेक्‍टर होऊन देशसेवा करायची आहे'. आईचे हे शब्द खरे ठरण्यासाठी श्री. मंजुळे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळच म्हणावे लागेल. वयाच्या 24 व्या वर्षी 2009 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (आयएएस) त्यांनी देशभरात 56 वे, महाराष्ट्रात तिसरे तर राज्यशास्त्र विषयात देशात प्रथम क्रमांक पटकावला. आंध्र प्रदेश केडरमध्ये त्यांची नेमणूक झाली. वडार समाजातील असल्याने आई पार्वती व वडील दिगंबर यांच्या माथी कायम कष्टाचीच नोंद होती. दोघेही इमारतीसाठी व रस्त्यासाठी लागणारे दगड फोडण्याचे कष्टाचे काम करत. एकदा त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या बालाजींचा डोळा अपघातात निकामी झाला. दिव्यांग मंजुळे यांचा प्रवास भल्याभल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असाच आहे. घरी अठराविश्‍व दारिद्रय ! सात भावंडं... कमावणारे एकटेच तर खाणारी तोंड मात्र जास्त. आपल्या मुलांनी शिकावे हीच अशिक्षित माता-पित्यांची धडपड. पाच भाऊ, दोन बहिणीत एक शिक्षक, एक पोलिस, एक शेतकरी, तर एका भावाने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. 
सतत स्फूर्ती देणाऱ्या आईमुळेच आपण कलेक्‍टर झाल्याचे सांगताना कृतज्ञतेच्या यादीत ते पुण्यातील "चाणक्‍य'चे अविनाश धर्माधिकारी यांचा उल्लेख करण्यास विसरत नाहीत. एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्‍वास या तीन गुणांवरच आपली वाटचाल सुरु असल्याचे ते सांगतात. आयएएस होण्यापूर्वी त्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली होती. परंतु ऑर्डर येण्यापूर्वीच त्यांनी आयएएस परीक्षेत यश मिळविले. घरी वीज नाही, घड्याळ नाही, पुरेसे कपडे नाहीत, अशा विदारक स्थितीत प्रचंड अशा काळोखावर मात करीत संघर्षरुपी जीवनात प्रकाशाची कास धरणारे बालाजी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या नव्या पिढीसमोर एक मोठा आदर्श ठरतात. सामाजिक परिवर्तनाचे एक मोठे उदाहरण म्हणूनच त्यांची नोंद होत असली तरी कडक प्रशासक ही त्यांची ख्याती आंध्रबरोबरच प्रतिनियुक्तीवर आलेल्या महाराष्ट्रानेही अनुभवली आहे. राजकारण्यांशी सूत जमले नाही तरी जनतेशी जुळलेली त्यांची नाळ मात्र कायम आहे. 
आंध्र प्रदेशमध्ये श्री. मंजुळे यांनी विविध पदावर काम करताना स्वच्छता मोहीम, आदिवासी व गरजूंच्या भूमीवाटप, अपंगांना घरे, अतिक्रमण हटवणे, ग्रामपंचायती व जिल्हा परिषदा निवडणुका, पूर व्यवस्थापन, भूसंपादन, महसूल, विकास, आपत्ती व्यवस्थापन, हैदराबाद येथे जागतिक कृषी परिषदेचे काम, कृष्णा कुंभमेळ्यांचे काम, चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचे काम, आंध्र-तेलंगणा या राष्ट्रांच्या विभाजनाची प्रशासकीय जबाबदारी पार पाडली. शिक्षण हे मुलभूत परिवर्तनाचे माध्यम असल्याने श्री. मंजुळे यांनी त्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळा व वसतिगृहांचा, सरकारी दवाखान्यांचा दर्जा सुधारला. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसुनवाई घेण्याने जागेवरच तक्रारींचे निवारण होत होते. अपंगांना ट्रायसायकल्स, विधवांना निवृत्तीवेतन, भूमिहिनांना भूमिवाटप, बेघरांना घरासाठी जागा, शाळाबाह्य मुलांना शाळाप्रवेश, वयोवृद्धांना निवृत्ती वेतन, रेशनकार्डचे वाटप, वीज नसलेल्या ठिकाणी वीज, पुनर्वसन करताना गावातील लोकांना घरे, वीज, पाणी, वाहतूक सोयी, भूसंपादन झालेल्या लोकांना त्यांचा मोबदला ही त्यांची कामे नजरेत भरण्यासारखी झाली. कोमकम भीम प्रोजेक्‍ट वेळेत पूर्ण करण्यासाठी जलद गतीने भूसंपादन करणं, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात त्यांचा मोबदला, ज्यांची घरे प्रकल्पात गेली, त्यांचं पुनर्वसन यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. 

हुदहुद चक्रीवादळाचा मुकाबला 
ऑक्‍टोबर 2014 मध्ये हुदहुद चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या विशाखापट्टणम या भागात 61 बळी आणि 21 हजार कोटींचे नुकसान झाले. या अस्मानी चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी श्री. मंजुळे यांची विशेष अधिकारी म्हणून तेथे नेमणूक केली. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. आपत्तीवर मात करताना आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. लोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी पार पाडताना त्यांची ओळख "कार्यकर्ता अधिकारी' अशी झाली. 

परिचय - 

 • 2009 ः आयएएसपदी निवड, मसुरी येथे प्रशिक्षण 
 • 2010-2011 ः सहाय्यक जिल्हाधिकारी, मेदक (आंध्रप्रदेश) 
 • 2011 - 2012 ः सब कलेक्‍टर, तेनाली (जि. गुंटूर) 
 • 2012 - 2013 ः जॉईंट कलेक्‍टर, आदिलाबाद जिल्हा 
 • 2014-2016 ः उपसचिव, कृषी विभाग 
 • 2017-2018 ः आयआयएम बेंगलोर येथून एक वर्षाचा पब्लिक पॉलिसी कोर्स पूर्ण 
 • 2018-2019 ः आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य 
 • 2019 ः जिल्हाधिकारी, नंदुरबार 
 • सध्या उपसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत 
 • सिंगापूर, व्हिएतनाम, युएसए या विविध देशांना भेटी 
 • निवडणुका, ग्रामविकास, आदिवासी विभाग, अपंग पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन या प्रशासनातील क्षेत्राचा विशेष अभ्यास व आवड