राजकारणातील उगवता ‘सूर्य’

story on Suryanarayana Tejaswi
story on Suryanarayana Tejaswi

एल. सूर्यनारायण तेजस्वी अर्थात तेजस्वी सूर्या हे नाव राजकारणात कमी कालावधीत सुपरिचित झाले. ‘२०१९ च्या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा एक राजकीय हिरा आहे,’ असे जाहीर वक्तव्य अनेक दिग्गज नेत्यांनी केले. २७ व्या वर्षी खासदार म्हणून लोकसभेत पोहचलेले सूर्या हे देशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरले आहेत. अलीकडेच त्यांची भाजप जनता युवा मोर्चा अध्यक्षपदावर नियुक्ती होऊन त्यांच्या राजकीय सवारीला आणखी वेग आला आहे.

तेजस्वी सूर्या यांचे काका राजकारणात होते. पण, सूर्या यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यवसायाने वकील असलेल्या सूर्या यांनी कर्नाटकसह देशाच्या राजकारणातही अतिशय कमी वेळेत एक वलय निर्माण केले आहे. दिल्लीतून त्यांच्यावर मेहेरनजर असल्याने सद्यःस्थितीत सूर्यापर्व सुरू असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात सूर्या यांच्या वक्‍तृत्वाने तरुण पिढी आकर्षित झालीच होती. ती आता राष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय युवा मोर्चा या संघटनेत त्यांनी काम केले आहे. नवव्या वर्षी त्यांनी पेंटिंग्ज विकून कारगीलसाठी संग्रहित करण्यात येत असलेल्या निधीसाठी मदत केली होती. अशा अनेक घटनांची त्यांची पार्श्‍वभूमी आता चर्चेत आहे. 

युवा मोर्चाची सूत्रे हातात घेण्याच्या कार्यक्रमावेळी कोरोनाचा काळ असतानाही त्यांचा दिल्लीत तीन किलोमीटर रोड शो झाला. खासदार पूनम महाजन यांच्याकडून सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट रणशिंग फुंकले ते ‘चलो पश्‍चिम बंगाल’चे. भाजपच्या इतर अनेक नेत्यांप्रमाणे सूर्या यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते. भाजपच्या मिशन बंगालमध्ये तेजस्वी यांच्यावरही मोठी जबाबदारी असल्याचे या कृतीवरून स्पष्ट दिसते. सूर्या यांचे वक्‍तृत्व कौशल्य प्रभावी असल्याने त्यांच्या भाषणाला युवकांची प्रचंड गर्दी असते. कर्नाटकात ते सध्या मास लीडर आहेत. आक्रमक आणि एकाच वेळी अनेक भाषांची सांगड घालून श्रोत्यांना कधी विनोदी चुटके तर कधी आक्रमकतेची धार देणारे भाषण सूर्या यांचे खरे भांडवल आहे. इंग्रजीवर प्रभुत्व ही त्यांची आणखी जमेची बाजू आहे. लोकसभेसाठी बंगळूर दक्षिण मतदारसंघातून (कै.) अनंतकुमार यांच्या पत्नीऐवजी सूर्या यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. पण त्यांचे मागील कार्य व प्रचाराचा धडाका पाहून अनेक जण अवाक्‌ झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांचा त्यांनी ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून देशाचे लक्ष वेधले. संसदेतही त्यांनी आपला ठसा दाखवून दिला. एनआरसीसारख्या विषयावर त्यांचे भाषण संसदेत भल्याभल्यांनाही शांत करणारे ठरले. भाजपकडून कर्नाटकातील ‘सूर्या’ला हेरण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. खासदार झाल्यानंतर सूर्या यांच्या छोट्याशा कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभाला चक्क अमित शहा यांनी लावलेली हजेरी ही त्यांच्यासाठी बरेच काही सांगून जाणारी होती. आता त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या पाहिल्यास सूर्या हे नाव राजकारणातील लंबी रेस का घोडाच ठरणार, हे नक्की आहे.

संपादन - धनाजी सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com