नवी दिल्ली - सिरियात असाद घराण्याविरूद्ध झालेल्या उठावानंतर अमेरिका व युरोपला हवा असलेला अल कैदाचा माजी दहशतवादी व विद्यमान अध्यक्ष अहमद अल शारा (42) 29 जानेवारी 2025 सत्तेवर आला असला, तरी सीरियात अद्याप शांतता प्रस्थापित झालेली नाही. .सीरियाचा माजी अध्यक्ष बशर अल असाद याने त्याच्याविरूदध झालेल्या उठावानंतर कुटुंबासह ऱशियाला पलायन केलं. 17 जुलै 2000 ते 8 डिसेंबर 2024 अशी तब्बल 24 वर्षे असाद सत्तेवर होता. तत्पूर्वी त्याचे वडील हाफिज अल असाद 14 मार्च 1971 ते 10 जून 2000 असे 29 वर्षे सत्तेवर होते..ते सीरियातील अल्पसंख्याक अलावाईट पंथाचे. याचा अर्थ, असाद पिता पुत्राची सीरियात तब्बल 53 वर्षे सत्ता होती. ती लष्कराच्या बळावर होती. हाफिज अल असाद यांनी सीरियात डोके वर काढणाऱ्या मुस्लिम ब्रदरहुडच्या हजारो अनुयायांची अनेक वर्ष कत्तल केली.त्याचप्रमाणे, बशर अल असाद हे ही विरोधकांचे वर्षानुवर्ष शिरकाण करीत सत्तेवर राहिले. याचे कारण, त्यांना इराण, रशिया, काही अरब राष्ट्रे, दक्षिण आफ्रिका, हेजबुल्लाचा नेता हसन नसरूल्ला व काही प्रमाणात भारताचा पाठिंबा होता. तसा पाठिंबा इराकमधील सद्दाम हुसेन व लीबियातील कर्नल मुअम्मर गद्दाफी यांना मिळाला नाही..'असाद यांच्याकडे सर्वनाशक रासायनिक शस्त्रास्त्रे आहेत,’ असा आरोप गेली अनेक वर्षे अमेरिका करीत होती. कतारचा ही या आरोपाला पाठिंबा होता. असाद यांना पदच्यूत करण्याचे प्रयत्न अऩेक वेळा होऊऩही ते शक्य होत नव्हते, जे पाश्चिमात्य देशांच्या साह्याने अहमद अल शारा यांनी करून दाखविले.त्याची पोच पावती त्यांना मिळाली, ती अलीकडे सौदी अरेबियाला दिलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या भेटीने. असाद यांच्या काळात आयसीस ही दहशतवादी संघटना त्यांची प्रमुख विरोधक होती. या संघटनेने सिरियात प्रचंड हैदोस घातला..संयुक्त राष्ट्रसंघाने `हेरिटेज’ सिटी (जागतिक ठेवा) म्हणून दर्जा दिलेले पलमैरा हे अयतिहासिक शहर त्यांनी जवळजवळ उद्धवस्त केले. सीरियातील सुमारे दोन तृतीअंश प्रदेशावर त्यांनी कब्जा केला होता. त्या काळात आयसीसचा नेता अबु बकर बगदादी जिवंत होता.पलमैरातील विध्वंसाची तुलना काही प्रमाणात तालिबानने अफगाणिस्तानातील बामियानमध्ये उद्ध्वस्त केलेल्या महाकाय बुद्ध मूर्तींशी करता येईल. पलमैरा सिरियातील पर्यटनासाठी जगप्रसिद्ध शहर होते. दुसरीकडे, लटाकिया हे बंदर रशियाच्या ताब्यात होते. तथापि, अहमद अल शारा सत्तेवर आल्यापासून सीरियातील रशिया व इराण यांच्या प्रभावाला जबरदसस्त धक्का बसला आहे..असाद यांच्या कारकीर्दीत दमास्कसमधील (राजधानी) इमारतींवर कार्ल मार्क्स, व्लादिमीर लेनिन व फेड्रिक एंजल्स या कम्युनिस्ट नेत्यांची भव्य म्युरल्स पाहावयास मिळत. तीही आता इतिहासजमा होतील. गेली अनेक वर्षे सीरियावर अमेरिका, युरोप व इस्त्रायलचा डोळा होता. इस्त्रायलने वारंवार हल्ले करून सीरियाचे लचके तोडले होते. आजही ते थांबलेले नाही.दुसरीकडे, असाद यांची क्रूर हुकुमशाही व आयसीसचे हल्ले, यामुळे जेरीस येऊन सीरियन जनतेने लाखोंनी तुर्किये मध्ये पलायन केले. त्यामुळे सीरियन निर्वासितांचा मोठा बोजा तुर्कियेवर पडला. अर्थातच त्यांना आश्रय देऊन मतदानाचा हक्क दिल्याने तुर्कियेचे अध्यक्ष रिसिप ताईप एर्डोहान यांना त्याचा बराच राजकीय फायदा झाला. परंतु, निर्वासितांचे लोढे युरोपातून थेट जर्मनीपर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे श्वेतवर्णीय युरोपपुढे मुस्लिम दहशतवादाचे एक नवे संकट उभे राहिले, ते अद्यापही संपुष्टात आलेले नाही..`वॉशिंग्टन पोस्ट’ च्या 6 जूनच्या अंकातील विस्तृत वृत्तानुसार, 'सीरियात आज जगातील निरनिराळ्या देशातील परकीय दहशतवादी व त्यांच्या संघटना अस्तित्वात आहेत. या दहशवाद्यांनी असाद विरूद्ध लढ्यात अहमद अल शारा यांस पाठिंबा दिला. त्यांना मोकळे सोडल्यास शारा यांच्यासाठी मोठी डोकेदुखी होऊ शकते, म्हणून शारा यांनी त्यातील कट्टर दहशवाद्यांना सरकारमध्ये मोक्याच्या जागा देण्यास सुरूवात केली आहे.त्यांचे पुन्रवसन करून त्यांची सत्तेची भूक कमी करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. अन्यथा, शारा यांच्या सरकारलाच सुरूंग लावण्यासाठी ते पुढे सरसावतील.’’तसे होऊ नये म्हणून, अमेरिकेची गुप्तचर संघटना `सीआयए’ व इस्त्रायलची गुप्तचर संघटना `मोसाद’ यांचे सुरक्षाकवच शारा यांना घ्यावे लागेल..शारा याच्या विरोधात `अल नुसरा फ्रन्ट (जाबत अल नुसरा)’ चा नेता अबू महमंद अल जोलानी जोर धऱीत असून, 'सीरियामध्ये इस्लामिक शरिया कायदा लावण्यात यावा,’ अशी मागणी करीत आहे. असाद यांच्या काळात सीरियात त्यांचा `बाथ’ हा राजकीय पक्ष सत्तेवर होता. तो धर्मनिरपेक्ष असल्याने सीरियात ख्रिश्चन व अरब शांततेने राहात होते. त्यांच्यात सांप्रदायिक तणाव नव्हता.शर्ट व फ्रॉक घातलेल्या अनेक तरूणी दिसत. हिजाब घातलेल्यांची संख्या खूपच कमी होती. सीरियाला काही वर्षापूर्वी दिलेल्या भेटीत मी हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्समध्ये भोजन व गप्पा करताना मधूनच जवळ ठेवलेल्या गुडगुडीतून मस्त भपका घेत हास्यविनोद करणाऱ्या तरूणी व महिला पाहिल्या होत्या. इराकमधील सद्दाम हुसेन यांचाही बाथ हा राजकीय पक्ष व असाद यांचाही बाथ हा राजकीय पक्ष, परंतु, या दोन नेत्यांचे व त्यांच्या पक्षांचे कधीच पटले नाही..'असाद व विरोधकांचा रक्तरंजित संघर्ष तब्बल 14 वर्षे चालला. त्या काळात युरोप, अरब राष्ट्रे, आफ्रिका येथून सीरियात लढण्यासाठी आलेल्या भाडोत्री सैनिकांपैकी 5 हजार सैनिक आजही सीरियात आहेत,’ असे एका पाहाणीत दिसून आले आहे.वॉशिंग्टन पोस्टनुसार, 'अल कैदाचा सक्रीय सदस्य म्हणून अमेरिकेच्या 2003 मधील इराकवरील आक्रमणात शारा याने युद्धात भाग घेतला होता. त्यानेच सीरियात 'जाबत अल नुसरा' ची स्थापना केली व 2017 मध्ये त्याचे 'हयात तहरीर अल् शाम' असे नामकरण करून अल कैदा बरोबरचे संबंध तोडले..नंतर इस्लामी संघटनांविरूद्ध कारवाई करावयास सुरुवात केली. पोस्ट च्या वार्ताहरांनी केलेल्या पाहाणीनुसार, 'काही परकीय दहशतवादी सीरियातील हमा या शहराकडे जाणाऱ्या मार्गावर पाहावयास मिळाले. तुर्कीये दहशवादी 'झायन अल अबेदीन' मधील मशिदीत असून, याच ठिकाणी घनघोर चकमकी झाल्या आहेत.इराकी दहशतवादी मात्र कधी लष्करी गणवेशात, तर कधी साध्या कपड्यात पर्यटकांसारखे फिरताना दिसतात. मध्य आशियातून आलेले भाडोत्री सैनिक दमास्कस हून कासियोऊन या प्रसिद्ध डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याची देखरेख करतात. शारा याच्या हयात तहरीर अल शाम या संघटनेचे बहुसंख्य दहशतवादी वा समर्थक इडलिब या शहरात राहात आहेत.’.सीरियावर प्रभाव वाढल्यामुळे अमेरिकेला तेथील खनिज तेलाचा लाभ होण्याची शक्यता आहे. सीरियातील खनिज तेल हे प्रामुख्याने इराकनजिकच्या युफ्रेटिस नदी नजिक देर अल झौर या प्रांतात आहे. कुर्दिश सैन्याच्या नियंत्रणाखाली हा प्रदेश आहे.सीरियातील खनिज तेलाचे एकूण साठे अंदाजे 2.5 अब्ज बॅरल्स आहेत. तथापि, गेले चौदा वर्षे चाललेल्या युद्धामुळे त्याच्या उत्पादनात वारंवार अडथळे आले. राजकीय परिस्थिती स्थिरावल्यास त्याचा लाभ सीरियासह अऩ्य देशांना व प्रामुख्याने अमेरिकेला होईल..दहशतवादी उर्फ स्वातंत्र्यसैनिक अध्यक्ष अहमद अल शारा सत्तेवर असल्याने तेथील धर्मनिरपेक्षता धोक्यात येऊन लोकशाही चे रोपण होणे शक्य नाही. शारा यांच्या लष्करशाहीचे नेमके स्वरूप कळावयास वर्ष, दीड वर्ष लागेल. या काळात सीरियाची वाटचाल कोणत्या दिशेने होते, हे पाहाणे उद्बोधक ठरेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.