Osmanabad News
Osmanabad News

तबलीग जमात आणि भारतातील मुस्लिमांचे जमातवादीकरण

निजामुद्दीन, दिल्ली येथे झालेल्या जमात-ए-तबलीग या इस्लामच्या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोरोनाच्या प्रसाराला घेऊन चर्चा सुरू झाली आहे. जमात-ए-तब्लिगने हा सोहळा लॉकडाऊनच्या आधी घेतला होता. सरकारला हे धार्मिक संमेलन रद्द करण्याची सूचनाही करता आली असती, किंवा जगभरातल्या कोरोना प्रसाराला लक्षात घेऊन तबलीगही हे संमेलन रद्द करू शकली असती. ह्या घटनाक्रमाची योग्य चौकशी होण्याची गरज आहे.

या घटिताची दुसरी बाजू अशी, की मुस्लिमांना फसवले जाऊ नये हे खरे असले, तरी ह्याचा फायदा तब्लीगसारख्या चळवळींबाबत सहानुभूती निर्माण व्हावी, असाही होता कामा नये. एकूणच मुस्लिम समाजाचे 'राक्षसीकरण' करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडतानाच तबलीगसारख्या संघटनांची चिकित्सासुद्धा होणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताने धर्मनिरपेक्ष लोकशाहीची राजकीय रचना स्वीकारलेली असली, तरी मुसलमानांना जमातवादी ठेवण्यात याच घटकाचे हितसंबंध गुंतलेले होते. अर्थात हिंदूंमध्येदेखील संघ परिवार व हिंदू महासभेसारखे पक्ष तेच करीत होते. या ठिकाणी मी फक्त 'तबलीग जमात' व 'जमाते इस्लामी' यांच्याच जमातवादीकरणाच्या कार्याचे विवेचन करणार आहे. 

जमाते इस्लामीच्या तुलनेने तबलीग जमातीचे विश्लेषण कमी झाले आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तबलीग जमातची स्थापना स्वामी श्रद्धानंदाच्या शुद्धीकरण चळवळीस विरोध करण्यासाठी झाली होती.

शहावली उल्लाह यांच्या घराण्याचे वारसदार असलेल्या जनाब महंमद इलियास यांनी या जमातचा पाया घातला व त्यांचे पुत्र जनाब महंमद युसूफ यांनी तबलीग जमातचे कार्यक्षेत्र वाढविले. मौलाना इलियास व त्यांच्या तबलीग जमातचे मत होते, की धार्मिक निष्ठेचा अभाव व पैगंबर साहेबांनी दाखवलेले आचरण न स्वीकारल्यामुळे मुसलमानांनाची अधोगती झाली आहे. त्यांच्या धार्मिक अज्ञानाचा फायदा घेउन त्यांना परत हिंदू बनवण्यासाठी स्वामी श्रद्धानंदासारखे लोक व त्यांची संघटना, आर्य समाज पुढे सरसावले आहेत.

तबलीग जमातच्या स्थापनेचे एक उद्दिष्ट मुसलमानांचे धार्मिक शुद्धीकरण व नैतिक अध्यात्मिक विकास हे होते. तबलीग जमातची निरक्षर मुसलमानांना धर्माचे आचरण शिकवणारी, त्यांना नैतिक अध्यात्मिक धडे देणारी बिगर राजकीय संघटना अशीच जास्त प्रसिद्धी आहे. परंतु मुसलमानांच्या जमातवादीकरणात स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही तबलीग जमातचे कार्य मोठे आहे.

मेवाड भागातील मेयो मुसलमान धर्मांतरित राजपूत जमाती होते. इस्लामच्या स्वीकारानंतर त्यांनी पूर्वीच्या चालीरीती चालूच ठेवलेल्या होत्या. आर्य समाजाने याच मेयो मुसलमानांचे शुद्धीकरण करून त्यांना परत हिंदू बनविण्याचा प्रयत्न चालवलेला होता. तबलीग जमातने या मेयो मुसलमानांना नमाज (प्रार्थना) शिकविणे व इतर इस्लामी विधी शिकवून त्यांना पक्के मुसलमान बनविण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे आर्य समाजाबरोबर तर त्या मुसलमानांचे खटके उडू लागलेच, पण ग्रामीण भागातील हिंदू-मुसलमानांतील सामंजस्य व समन्वयाचे वातावरणदेखील बिघडून गेले.

तबलीग जमातने हे कार्य विस्तारित करून भारतभर तबलीगच्या नावाने शुद्धीकरणाची मोहीम चालवली आहे. हिंदू व मुसलमानांतील मिश्र संस्कृतीचे घटक नाकारून सर्व सामान्य मुसलमानांना वेगळे पाडले आहे. त्यासाठी तबलीग जमात मोठे मोठे इज्तेमा (मेळावा) आयोजित करते. तसेच गावोगाव खरा इस्लाम शिकवण्याच्या नावावर धार्मिक स्वयंसेवकांचे जत्थे पाठवून ग्रामीण मुसलमानांना गावगाड्यापासून व सर्व प्रकारच्या संयुक्त सार्वजनिक उत्सव-समारंभापासून दूर करून, त्यांच्यात अलगतेची भावना निर्माण करते. हिंदू-मुस्लिम सलोखा संपवून टाकते.

पोषाखाच्या बाबतीत इस्लाममध्ये कोणताही विशिष्ट प्रकारचा पोषाख वापरावा, असा निर्देश नाही. पुरुषांच्या बाबतीत फक्त नाभीपासून गुडघ्यापर्यंतचा भाग झाकणारा पोषाख असावा, असे निर्देश आहेत. परंतु तबलीग जमातचे लोक एक विशिष्ट प्रकारचा लांब डगला, आखूड विजार घालण्याची प्रथा निर्माण करून पोषाखाच्या बाबतीतदेखील भिन्नता निर्माण करतात. त्यांच्या अशा प्रकारच्या कृतीतून ग्रामीण मुसलमानांचे जमातवादीकरण होत आहे, असे म्हणणे थोडेसे अन्यायकारक होईल. परंतु तबलीग जमातच्या कार्यपध्दतीमुळे सर्वसामान्य मुसलमान संकुचित व कुपमंडूक वृत्तीचे, अलिप्ततावादी, आळशी व दैववादी होत आहेत.

इस्लामची शिकवण ही समता, सामाजिक न्याय व विश्वबंधुत्वावर आधारित आहे. ती सर्व मानवतेसाठी आहे. परंतु तबलीग जमातीने आपले कार्यक्षेत्र मुसलमानापर्यंत मर्यादित करून त्यांच्या वृत्तीत संकुचितपणा आणला आहे. तबलीग जमात मुसलमानांना फक्त नमाज आदी धार्मिक विधी शिकवते, पण त्यांना सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देत नाही. 

उदाहरणार्थ, हजरत मुहमंद पैगंबर (स.) यांचे वचन आहे, की ज्यांचा शेजारी उपाशी आहे व जो स्वतः भरपेट खातो, त्याने कितीही उपासना केली अर्थात नमाज पठण केले, तरी ते व्यर्थ आहे. शेजाऱ्यांची व्याख्या त्यांना आपल्या घराच्या पुढे, मागे, उजवीकडे व डावीकडे 40-40 घरापर्यंत राहणारे सर्व लोक अशी केली आहे. तसेच ज्यांच्या हात व जिव्हेपासून लोक सुरक्षित नाहीत, तो सच्चा मुसलमान नाही, असे देखील पैगंबर वचन आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अल्लाहच्या उपासनेत कुचराई केली, तर त्यावर पश्चाताप केल्यास अल्लाह माफी देऊ शकतो. परंतु तुम्ही एखाद्या प्राणीमात्रास त्रास दिला, इजा पोहचवली, एखाद्याला धोका दिला, कर्ज बुडवले, तर त्याची माफी अल्लाह देणार नाही. त्याची माफी संबंधित प्राणी वा व्यक्तीनेच दिली पाहीजे.

हे व्यवहारज्ञान तबलीग जमात मुसलमानांना शिकवत नाही. त्यामुळे ते फक्त नमाजी बनतात. संवेदनशील मानव बनत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण मुसलमानांना सर्व कामकाज सोडून 40 दिवस ते 4 महिन्यापर्यंत जमातमध्य़े भ्रमण करण्यास उद्युक्त करतात. 'सर्व काही अल्लाह देतो. सर्व कामे अल्लाहच्या इच्छेनुसार होतात. त्यामुळे काम बुडण्याची चिंता करू नका, स्वतःला अल्लाहच्या कार्य़ासाठी वाहून घ्या,' असे सांगून तबलीगवाले लोकांना आळशी व दैववादी बनवतात. कौटुंबिक तथा सामाजिक जबाबदाऱ्यांपासून परावृत्त करण्याचे पातक करतात.

अशा पद्धतीने जो मुस्लीम समाज निर्माण होत आहे, तो इस्लामला अभिप्रेत असलेल्या मुस्लिम समाजापेक्षा सर्वथा भिन्न आणि जमातवादी वृत्तीचा समुदाय निर्माण होत आहे.

(हा लेख डॉ. बशारत अहमद 'इस्लाम समजून घेतांना', हरिती प्रकाशन, पुणे या आगामी पुस्तकातील असला, तरी २००२मध्ये पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात आयोजित एका चर्चासत्रातील भाषणाचा भाग आहे. हे भाषण पुढे समाजप्रबोधन पत्रिका आणि सत्याग्रही विचारधारा या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले होते.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com