TDM : गाव खेड्यातल्या 'ड्रायव्हर' लोकांचं भावविश्व प्रकट करणारा 'TDM'

महाराष्ट्रातील गावगाड्यात बराचसा बहुजन वर्ग हा एकतर अल्पभूधारक
TDM : गाव खेड्यातल्या 'ड्रायव्हर' लोकांचं भावविश्व प्रकट करणारा 'TDM'

- मतीन शेख

महाराष्ट्रातील गावगाड्यात बराचसा बहुजन वर्ग हा एकतर अल्पभूधारक, अथवा कोरडवाहू जमिन कसणारा. या घटकाने उदरनिर्वाहाचे अनेक मार्ग अवलंबले. कोणी गावाकडेच मजुरी केली, तर काहींनी रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून शहरं गाठली. नव्वदीच्या दशकानंतर भारताच्या आर्थिक धोरणात बदल झाले.

माणसांच्या हाती काही अंशी पैसा खेळू लागला. उद्योग, व्यवसायांची चलती झाली. परंतु गावकुसातला अल्पशिक्षित तरुण वर्ग यात कुठे दिसत नव्हता. आई, बापासारखी एक तर शेत मजुरी करणं अथवा शहरात रोजगार शोधणं हाच पर्याय या तरुण वर्गापुढे होता. जो आज ही आहे.

अलिकडच्या दोन, तीन दशकात खेड्यातल्या सरंजमदार वर्गाने दावणीचा बैल बारदाना विकला अन् आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत घरासमोर ट्रॅक्टर उभे केले. त्यांनी हे ट्रॅक्टर विविध ठिकाणी उद्योगी लावले. या काळात गावातल्या अल्पशिक्षित तरुणांनी ड्रायव्हिंग ही कला शिकून घेतली अन् या ट्रॅक्टरांना सर्वस्व मानलं.

परंतू मालक वर्गाकडून सततचे शोषण, अपमानाला कंटाळून या ड्रायव्हर वर्गाने स्वमालकीच्या ट्रॅक्टरचे, विविध वाहनांची स्वप्ने बाळगली. याच 'ड्रायव्हर' लोकांच्या स्वप्नांचा पाठलाग करणारा, त्यांच भाव विश्व, प्रेमकथा मांडणारा लेखक, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेचा हा नवा 'TDM' सिनेमा, अर्थात 'ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा'...

सिनेमाच्या रिअँलिझम थेअरीची चौकट अवलंबत भाऊरावने ख्वाडा, बबन सारखाच अर्थपुर्ण सिनेमा 'टीडीएम' च्या रुपाने पेक्षकांना दिलाय. भाऊराव सिनेमातल्या कल्पना विलासाला दुर ठेवतो. ग्रामीण राजकीय व सामाजिक वर्चस्ववादाच्या, झुंडशाहीच्या मार्गातून सामान्यावर होणारा अन्याय आपल्या चित्रपटांतून वास्तववादी रेखाटतो.

ग्रामीण वर्चस्ववादी आर्थिक, राजकीय संस्कृतीवर विचार करायला लावणारा व भाष्य करणारा भाऊराव कऱ्हाडेंचा व त्याच्या संपुर्ण टीमचा 'टीडीएम' सिनेमा म्हणता येईल. नायक बाबू व नायिका निलम यांच्या प्रेम कथानका भोवती 'ट्रॅक्टर' पडद्यावर फिरत राहतो...

सिनेमाचं कथानक सुरु होतं भल्या पाहटे. त्या गावखेड्यात पिंगळा येतो. आपल्या गीतातून शिवरायांची महती सांगत या गल्लीतून त्या गल्लीत दान मागत फिरतो. दुसरी फ्रेम येते नायकाच्या घराची. छप्परवजा ते घर. अंगणातल्या दगडावर नायकाची अंघोळ चाललेली असते. शेलकाटी पण पिळदार अंग, डोक्यावर केसांचा जथ्था. सावळी चेहरापट्टी नायकाचे गाल बघावे तर पार आत गेलेले. पाहताक्षणी वाटावं, हा कसला हिरो. पण भाऊरावांनी सिनेमातल्या सौदर्यंशास्त्राच्या पुढे जावून आपल्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या पृथ्वीराज थोरात नावाच्या युवकाला सिनेमाचा हिरो बनवलाय आणि त्यांने स्वतःला सिद्ध देखील केलंय.

नायक बाबू हा ट्रॅक्टर ड्रायव्हर. सोबतच विहिरींच्या पाषाणाचं ब्लास्टींग करणाऱ्या मशिनचा चालक ही. तसं हे जोखमीचं काम पण बाबू सहज पार करणारा. पण तरी ही ट्रॅक्टर मालकाची त्यावर चिडचिड, तो वैतागतो. काम सोडून निघून जातो. स्वतःचा ट्रॅक्टर घेवून वाळू विक्री करण्याचा कयास बांधतो. पण खरचं दारिद्र.

तोवर गावातल्या सोसायटीचं इलेक्शन लागतं. सत्ताधारी वर्गाकडून आपल्याला मतदान करण्याच्या अटीवर सोसायटीतून कर्ज देण्याचा वायदा होतो. पुढे मात्र त्या वायद्याचं खरं राजकारण नायकाच्या समोर येतं. घरची शेती घहाण ठेवत नायक ट्रॅक्टर घेतोच. तो ट्रॅक्टर वाळूला लावतो. नदी पात्रातील वर्चस्वशाली लोकांशी त्याचा संघर्ष होतो.

हे सर्व घडत असतानाच एकीकडे बाबूची प्रेमकथा फुलत असते. आपल्या पहिल्या ट्रॅक्टर मालकाच्या पोरीवर बाबूचा जीव आलेला असतो. नायिका निलम अर्थात कालिंदी निस्ताने या नवख्या मुलीने उत्तम अभिनय केलाय. बेधडक नजर, वावरण्यात, बोलण्यात एक वेगळाच एटीट्यूड. पण तिच्या अभिनयात एरोगन्स दिसत नाही. ती पडद्यावर सहजतेने पण आत्मविश्वासीपणे वावरताना दिसते. या जोरावरच सर्व प्रेक्षकांच्या नजरांना ती स्वतःकडे आकर्षित करते.

पुढे बाबूच्या बहिणीचं लग्न जुळून येतं. बहिणीचं पात्र वठवलंय शितल पाटील यांनी. बबन मधील 'मोहराच्या दारावर' या गीतावर अनोखं नृत्य सादर करणाऱ्या शितल यांनी यांवेळी अभिनय साकारलाय हे विशेष. पुढे सिनेमात लग्नाची धांदल, ग्रामीण भागातली लग्न पद्धती, वर्हाड, हुंडा प्रथा, त्यामुळे मुलींच्या माहेरच्या लोकांची पिढा, हे सर्व महत्वाचं अन् मार्मिक चित्रण सिनेमात पाहायला मिळतं.

'बकुळा' या गाण्यातून लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ या सगळ्यांचा उत्तम मिलाफ दिसून येतो. शेवटी प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायला हे गीत भाग पाडतं. बबन मधील 'साज ह्यो तुझा' नंतर ओंकारस्वरुप बागडेने हे गीत संगीतबद्ध करण्यासाठी चांगली मेहनत घेतलीय.

'एक फुल वाहतो सखे', 'मन झालं मल्हारी' ही गाणी मनाला स्पर्शून, रोमॅंटिक नव स्पंदने क्रिऐट करतात. गाण्याचं नृत्यदिग्दर्शन, रंगसंगती, लोकेशन, अवती भोवतीचे सबजेक्टस् सर्व काही उत्तम झालंय. ही गाणी प्रेक्षकांच्या कानाला, डोळ्यांना, मनाला नक्कीच समाधान देतात. कुणाल गायकवाड यांनी लिहिलेली एकुणच सिनेमातील गीते माइलस्टोन आहेत.

बाबू आणि निलूची प्रेमकथा रंगात आलेली असते. त्यातच फायनान्सची माणसं ट्रॅक्टरचे हप्ते थकले म्हणून ट्रॅक्टर ओढून नेतात. त्यांच्या प्रेमप्रकरणा बद्दल ही नायिकेच्या घरी हवा लागते. त्यामुळे तिची रवानगी पुण्याला होते. बाबू पुण्याला जातो. नायिकेला भेटतो. दोघांच्या प्रेमाचा गोड क्षण पडद्यावर उमटतो अन् नायक बाबू ट्रॅक्टर, जेसीबी वगैरे गाड्यांचा ताफा घेत गावात इंट्री करताना दिसतो व सिनेमा संपतो. पडद्यावर पुढील वर्षी TDM चा दुसरा गिअर, अशी पाटी झळकते अन् प्रेक्षकांना पार्ट टू चे वेध लागतात.

सिनेमॅटोग्राफीसाठी वीरधवल पाटील यांचं व त्याच्या कॅमेरासह नजरेचं कौतुक करायला हवं. खुप सुंदर रित्या त्यांनी सर्व सीनच्या फ्रेम लावल्यात. स्मुथली अनेक प्रसंग चित्रित केलेत. गावाचं देशी गावपण त्यांच्या नजरेतून प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळतं. फ्रेम, सिन मध्ये कुठे ही रिपिटेश जाणवत नाहीत. प्रत्येक फ्रेम नवी वाटते. सिनेमातील ग्रामीण भागातला रांगडेपणा, थेटपणा व मोकळे ढाकळा संवाद, नगर, शिरुर भागातील भाषेचा हेल मनाला भावतो. चित्रिकरणात कुठेही कृत्रिमपणा दिसत नाही. गाव, गावगाडा, परिसर, शेत जसं आहे तसं चित्र पडद्यावर उमटतं. सिनेमाची शेवटची दहा पंधरा मात्र थोडा रटाळ वाटतात. प्रेमचं, सिन्सचं रिपीटेशन तिथे कुठे तरी जाणवतं.

पण एकुणच ख्वाडा, बबन पेक्षा तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा सरस ठरतो. दिग्दर्शन करत करत भाऊरावांनी सिनेमात खुप चांगलं, तगडं पात्र वठवलंय. 'हे असंय' असा भाऊरावांचा डायलॉग सरत लक्ष वेधून घेतो. ते ताकतीचे अभिनेतेही आहेत, हे त्यांनी साकारलेल्या पात्राच्या माध्यमातून प्रकट होतं.

चित्रपट क्षेत्रात उच्चवर्णीय अभिजन वर्गाचा मोठा प्रभाव आहे. परंतू आपल्या मातीतील, बहुजनांन मधील माणसांना घेवून रुपेरी पडदा फुलवताना भाऊराव कऱ्हाडे यावेळी देखील यशस्वी झालेत, असं म्हणायला हरकत नाही....

( लेखक कुस्तीगीर, पत्रकार तसेच शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे संशोधक आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com