बाळांनो तुम्ही ठीक राहा, काळजी घ्या, लॉकडाउन संपला, की मी येतो गावी...

सर्जेराव नावले
बुधवार, 24 जून 2020

गावोगावी त्यांनी तांदूळ, पीठ-मीठ, अन्य शिधा गोळा करून तो क्वारंटाईन व्यक्तींसाठी पोहोच केला.

जगभर हाहाकार माजवणारा 'कोरोना' गावगाड्यासह दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोचला. गेले कित्येक दिवस बहुतेक जण 'कोरोना'च्या भीतीच्या छायेखाली आहेत. तीन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने खबरदारी घेत आहे. अगदी प्रत्येकाला कोरोना कधी एकदा कायमचा जातोय, असे झालेले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणेसह डॉक्‍टर, नर्स, आरोग्य कर्मचारी जीव धोक्‍यात घालून राबत आहेत. यांच्याच जोडीला एक शिक्षक कोरोनारक्षक बनून गेले तीन महिने दुर्गम भागात अहोरात्र राबत आहे. लॉकडाउन काळामध्ये अनेक जण जेथे कुटुंबासोबत सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहेत, तेथे शिक्षक रघुनाथ गांगुर्डे आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर राहून गेले तीन महिने कोरोनाविरोधात जेथे जेथे शक्‍य आहे तेथे सेवा बजावत आहेत.

असळज-मांडुकली, शेळोशी (ता. गगनबावडा) येथील केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख रघुनाथ गांगुर्डे अखंड सेवेत आहेत. श्री. गांगुर्डे यांचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री. ते गगनबावडा तालुक्‍यात केंद्रप्रमुख म्हणून सेवेत आहेत. 24 मार्चपासून कोरोनाचा लॉकडाउन सुरू झाला आणि मुंबई-पुण्यातून येणारे लोक प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन करण्यास सुरुवात झाली. गगनबावडा तालुक्‍यातही हे लोण पोचले. अशा वेळी श्री. गांगुर्डे हे त्यांच्या केंद्रांतर्गत असलेल्या 39 शाळांत क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींना निवासासह जेवणखाण आदी सुविधा देण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत राबू लागले.

गावोगावी त्यांनी तांदूळ, पीठ-मीठ, अन्य शिधा गोळा करून तो क्वारंटाईन व्यक्तींसाठी पोहोच केला. त्यांच्या काही शाळा अतिशय दुर्गम भागात आहेत, जेथे फक्त चालत जाणे शक्‍य आहे. अशा ठिकाणीही त्यांनी शासकीय यंत्रणेसोबत काम केले. केंद्रांतर्गत गावातील बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती ठेवणे, ती पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयाला वेळोवेळी कळविणे अशी कामे त्यांनी केली. यासोबतच त्यांनी ग्रामस्थांत कोरोना प्रतिबंधाबाबत जागृतीही अखंड सुरू ठेवली.

गेले सहा महिने ते त्यांच्या मूळ गावी गेलेले नाहीत. कुटुंबीयांशी ते केवळ फोनवरून संपर्क साधतात आणि मुलांना "मी ठीक आहे, बाळांनो तुम्ही ठीक राहा, काळजी घ्या, लॉकडाउन संपला, की मी येतो गावी,' असाच निरोप देतात आणि आपल्या कामाला जुंपून घेतात. क्वारंटाईनसाठी घेतलेल्या शाळा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सोबत घेऊन श्रमदानाचेही काम केले आहे. इतकेच काय, पण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यासाठी त्यांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपही तयार केले आहेत.तालुक्‍याच्या ठिकाणी आलेली शासनाची मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येऊ न देता, शिक्षकांना सोबत घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी ती पोहोच केली आहेत. आपले घर, कुटुंबापासून दूर राहून गेले तीन महिने अहोरात्र राबणाऱ्या या सच्च्या कोरोनारक्षकाच्या कार्याला सलाम तर करायलाच हवा. त्यांचा आदर्श समोर ठेवून इतरांनीही आपापल्या परीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपला वाटा नक्कीच उचलायला हवा.
 

 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या