जगातील हे दहा देश कोरोनाच्या संसर्गापासून दूर!

संजय उपाध्ये
Friday, 4 September 2020

भारतातील एक मोठे गाव असावे इतके छोटे हे देश आहेत. अकरा हजार लोकसंख्येचा नौरू जगातील स्वतंत्र बेट असलेला आणि सर्वांत छोटी लोकशाही असलेला देश आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरू असतानाही जगातील असे दहा देश आहेत, की जिथे अजूनही कोरोनाचा शिरकावच झालेला नाही. हे चिमुकले दहा देश कोविड-१९ च्या संसर्गापासून दहा कोस दूरच आहेत. त्यामुळे साहजिकच तिथे नागरिक आजारी असणे, तपासणी तसेच स्वॅब घेणे, उपचार, क्‍वारंटाईन असले काही नाही. पण मार्चपासून लॉकडाउन सुरू असल्याने मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असणारे हे देश मात्र आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आले आहेत.

अथांग प्रशांत महासागराच्या पश्‍चिम भागात हे दहा देश विखुरले आहेत. पलाऊ, मायक्रोनेशिया, मार्शल आयलंडस्‌, नौरू, किरीबाती, सोलोमन आयलंडस्‌, तुवालू, समोआ, वानुआतु आणि टोंगा असे दहा देश आहेत. त्यापैकी सोलोमन आयलंडस्‌ हा मोठा देश असून, लोकसंख्या सहा लाख ५२ हजार आहे. वानुआतु या देशात तीन लाख लोक राहतात. इतर देशांची लोकसंख्या अशी ः समोआ (दोन लाख), किरीबाती (सव्वा लाख), मायक्रोनेशिया (एक लाख १२ हजार), टोंगा (एक लाख), मार्शल आयलंडस्‌ (५८ हजार), पलाऊ (१८ हजार), तुआलु (१२ हजार), नौरू (अकरा हजार).

भारतातील एक मोठे गाव असावे इतके छोटे हे देश आहेत. अकरा हजार लोकसंख्येचा नौरू जगातील स्वतंत्र बेट असलेला आणि सर्वांत छोटी लोकशाही असलेला देश आहे. पण, या सर्व देशांत एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे या सर्व देशांचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे पर्यटन. निसर्गसौंदर्याची उधळण असलेली छोटी-मोठी बेटे, प्रशांत महासागराचे निळेशार पाणी, स्वच्छ वातावरण आणि मिळणारी दर्जेदार सेवा यामुळे जगभरातील पर्यटक या देशांकडे आकर्षित होतात.

पण, गेल्या मार्चपासून या देशांची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी या देशांकडे पाठ फिरविली आहे. जगभरातील कोरोनाचा कहर पाहून मार्चपासून या सर्व देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला आहे. केवळ १८ हजारांचा देश असलेल्या पलाऊ देशाचे तर हाल सुरू आहेत. पलाऊच्या लोकसंख्येच्या तब्बल पाच पट पर्यटक गेल्या वर्षी आले होते. या पर्यटकांकडून देशाच्या सकल उत्पन्नापैकी ४० टक्के इतके उत्पन्न मिळाले होते. पण, यंदा नावालाही पर्यटक इकडे फिरकला नाही. पलाऊबरोबरच नौरू, तुआलु, मार्शल आयलंडस्‌ या देशांचीही ही गत झाली आहे.

 

सगळे सुरळीत व्हायला हवे...
या संदर्भात बोलताना तेथील स्थानिक ब्रायन म्हणाला, ‘‘लवकरात लवकर देशातील पर्यटन उद्योग सुरू करायला हवेत आणि सारे काही सुरळीत व्हायला हवे, अन्यथा या बेटावर कोणीही फार काळ जगू शकणार नाही.’’ इतकी भीषण परिस्थिती या दहा देशांची झाली आहे.

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स