esakal | हॉटेल-रेस्टॉरंट उद्योग वाचवण्याची संधी आणि आव्हाने !

बोलून बातमी शोधा

Hotel

हॉटेल-रेस्टॉरंट उद्योग वाचवण्याची संधी आणि आव्हाने !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनासारखी भयंकर महामारी येऊन आज जवळजवळ दीड वर्ष होत चालला आहे. भारतात शिरकाव होऊन सव्वा वर्ष होत आले आहे, हे सर्वांनाच ठावूक असताना, हॉटेल, रेस्टॉरंट उद्योग हा सध्या संकटात आहे. त्याच्यासमोर भरपूर आव्हाने आहेत. त्यातून संधी शोधण्याचा मार्ग काढण्याचं लोक प्रयत्न करत आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये आलेली ही महामारी अनेकांना मृत्यूच्या जाळ्यात ओढत होती. अनेक लोक यामुळे बाधित झालेले दिसत होते. अशावेळी उद्योग, धंदे, व्यापार याच्यावरही भरपूर परिणाम झाला. असे असताना, सर्व उद्योजकांना विविध प्रकारे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत होते. कोरोना महामारीच्या आधी सुद्धा महागाई होतीच, परंतु जशी कोरोना स्थिती उद्‌भवली त्यात अनेक उद्योगधंदे, व्यापार डबघाईला गेले, तर काही उद्योगधंदे, व्यापार अगदी थांबले. हॉटेल, रेस्टॉरंट उद्योग अतिशय बाधित झाला. खरं तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये तसेच पूर्ण जगामध्ये खाद्यसंस्कृती प्रचलित आहे. कोरोनाचे संकट हे खाद्य संस्कृतीवर घाव घालत आहे. हा घाव इतका तीव्र आहे, की यामुळे अनेकांना त्रास होत आहे. हॉटेल व रेस्टॉरंट तसेच हॉस्पिटॅलिटी उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. खरं तर या उद्योगाशी जोडले गेलेले लोक आज मानसिक व शारीरिक आव्हानांना तोंड देत आहेत. तसेच आर्थिक दुर्बलता सुद्धा वाढत चालली आहे. लवकरच काही केले नाही तर जगातील खाद्यसंस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

या जगामध्ये सर्वांत जास्त लोक, कामगार, मालक वर्ग, संघटना या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. हा उद्योग डबघाईला गेल्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत आणि अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अशातच काय करावे जेणेकरून हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटॅलिटी उद्योगाला चालना मिळेल? सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी हॉटेल व रेस्टॉरंट चालू नसले तरी घरपोच सेवा चालू ठेवण्यात आली आहे. म्हणजेच कमीत कमी लोकांमध्ये व्यापार करण्याची आणि लोकांना अन्नपुरवठा करण्याची सोय झाली आहे. परंतु, कुटुंबाबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर, जोडपे तसेच एकटे रेस्टॉरंटला जायचे आणि तिथला आनंद घ्यायची प्रथा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक मालकांचे नुकसान झाले आहे. जरी घरपोच सेवा असली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही; कारण महागाईने जनता त्रस्त आहे व जीवनावश्‍यक सुविधा घेण्याला लोक प्राधान्य देत आहेत.

मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते, की पूर्ण जगामध्ये सर्वांत जास्त माणसे याच क्षेत्रात काम करतात. अगदी लहान खाद्य व्यवसाय असला तरी किंवा अगदी पंचतारांकित हॉटेल असो, अनेक लोक यामध्ये काम करतात. त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. पर्यटन व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे. प्रवासी घराबाहेर पडण्यासाठी उत्सुक असताना कोरोनाची भीती अजून मनातून गेलेली नाही, म्हणून लोक बाहेर पडेनात. याचा फटका हॉटेल, रेस्टॉरंट व पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

जिथे जीव वाचविणे महत्त्वाचे ठरणार आहे, तेथे पर्यटन किंवा हॉटेलमध्ये जाऊन राहणे किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे आता दुय्यम झाले आहे.

कोरोना या महामारीमध्ये अनेक हॉटेलवाल्यांनी पुढाकार घेऊन आपले हॉटेल रुग्णांसाठी तसेच विलगीकरणासाठी सरकारला दिले. यात त्यांचे कौतुकच आहे. म्हणजे समाजाची सेवाही होते आणि व्यवसाय चालू राहतो. त्याचप्रमाणे लोकांना रोजगार मिळत आहे. ही एक उत्तम कल्पना होती आणि ती सत्यात उतरत आहे. तसेच रेस्टॉरंटमधील घरपोच सेवेमुळे रेस्टॉरंट्‌सना आपले अस्तित्व टिकवता आले आहे. नवीन पद्धतीचे क्‍लाऊड किचन, ओपन किचन या पद्धतीमुळे सुद्धा अनेक फायदे झाले आहेत.

सध्या कोरोनाची स्थिती भयावह असताना, लसीकरणाचा वेग वाढवला गेला पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर रुग्ण बरे होतील किंवा त्यांची संख्या घटत जाईल. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्यास उद्योगधंदे तसेच व्यापार पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. अनेकांनी रोजगार गमावले आहेत, ते पुन्हा मिळवण्यास मदत होईल. महाराष्ट्रात असताना परप्रांतीय ज्यांच्या त्यांच्या गावाला निघून गेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे, अशी आशा आहे.

एकंदरीतच, मंदिरे सुद्धा बंद आहेत, दुकाने बंद आहेत, व्यापार बंद आहेत, रेल्वेसेवा तुरळक आहे, बससेवा तुरळक आहे. अशामध्ये पर्यटनाला संधीच नाही; परंतु कोरोना गेल्यानंतर देशांतर्गत पर्यटनाला संधी मिळेल, अशी आशा करतो.

आज सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व पर्यटनाशी जोडलेली लोकं आशा करत आहेत, की हे संकट लवकरात लवकर जाऊन एक आशेचा किरण कुठून तरी येईल आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे व्यापार सुरळीत होईल, अशी आशा करत आहेत. जग हे आशेवर टिकून आहे, त्याचप्रमाणे जीव वाचवणे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती जरी धोक्‍यात असली तरी तिला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. सरकारने सुद्धा हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, त्यांनी मार्गदर्शक सूची तयार केली पाहिजे, त्यामुळे या उद्योगधंद्याला पुन्हा ऊर्जितावस्था येईल. कर सवलती, वीजदर माफी किंवा इतर सुविधा देऊन या व्यवसायाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला पाहिजे. सर्व व्यावसायिक, उद्योजक आणि इतर जनता मिळून काम केले, एकमेकांना सहाय्य केले तर हे जग सुखी होणार आहे. "सेव्ह हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री' हे ब्रीदवाक्‍य आज फिट बसत आहे. आशा करतो, की सर्व लोक या संकटातून बाहेर येतील व एक छान जग पुन्हा निर्माण होईल.

- ऋत्विज चव्हाण