रंगमंच कला

Theater Art.jpg
Theater Art.jpg

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी परफॉर्मिंग आर्टसमध्ये अनेक कलाप्रकारांचा समावेश असून, त्याचे स्वतंत्रपणे वा सामूहिकरीत्या प्रयोग केले जातात. येथे कलाकार आपला आवाज, चेहऱ्यावरील भाव, देहबोलीतून आपली कला सादर करतात. स्वत:च्या भावभावना व्यक्त करणे हा परफॉर्मिंग आर्टसचा मुख्य उद्देश असतो. हा फाइन आर्टसचा विशेष प्रकार असून, यात रसिक प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष प्रयोग केले जातात. ज्याला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. परफॉर्मिंग आर्टस्‌ हा शब्द इंग्रजी भाषेत 1711 मध्ये पहिल्यांदा वापरात आला. परफॉर्मन्स आर्ट हे प्लॅस्टिक आर्टपेक्षा वेगळे असते. प्लॅस्टिक आर्टमध्ये माती, धातू वा रंगांचा वापर केला जातो. या कलाप्रकारात साच्यांचा वापर करून आकार बदलला जातो वा त्याचे रूप बदलले जाते. प्लॅस्टिक आर्टमध्ये भौतिक कलाकृती साकारते. नृत्य, संगीत, ऑपेरा, नाटक, जादूचे प्रयोग, सर्कस, मुकाभिनय, वक्तृत्वकला या सर्वांचा समावेश रंगमंच कला अर्थात परफॉर्मिंग आर्टस्‌मध्ये होतो. ज्या व्यक्ती रंगमंच कलेत भाग घेऊन प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करतात, त्यांना कलाकार म्हणतात. 

नट, अभिनेते, हास्यकलाकार, विनोदी नट, नर्तक, जादूगार, गायक/वादक यांचा यात समावेश होतो. गीतकार, नेपथ्यकार, नृत्य-नाट्य दिग्दर्शक इत्यादी संबंधित कार्यक्षेत्रातील जाणकारांचाही याला हातभार लागतो. वेशभूषा, रंगभूषेच्या सहाय्याने कलाकारांच्या रूपात आमूलाग्र बदल घडविला जातो. ध्वनी व प्रकाशयोजनेने प्रयोगांना अधिक उठाव आणला जातो. सर्कस हा आबालवृद्धांना आवडणारा मनोरंजनाचा विशेष प्रकार आहे. कसरतपटू, विदूषक, प्राणी इत्यादींचे साहसी व कौशल्यपूर्ण खेळ असलेला हा एक मिश्ररंजनप्रकार असून, उंच टांगत्या झुल्यावरील कसरती, ताणलेल्या उंच दोरीवरील वा तारेवरील तोल सांभाळून चालण्याचा कौशल्यपूर्ण खेळ, सुराफेक, अग्निगोलातील चित्तथरारक खेळ, हातचलाखीचे प्रयोग, शक्तिसौष्ठवाचे प्रयोग, प्रशिक्षित प्राण्यांचे कौशल्यपूर्ण खेळ, विदूषकाचे अंगविक्षेपयुक्त विनोद, बॅंडवरील वाद्यसंगीताची त्याला असलेली साथ अशा नानाविध घटकांचा सर्कशीच्या प्रयोगात अंतर्भाव असतो. सर्कशीचे प्रयोग मोकळ्या मैदानात उंच व मोठ्या तंबूमध्ये होतात. तंबूच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार रिंगणात शेकडो प्रेक्षकांसमोर प्रयोग केले जातात. सर्कशीमध्ये विदूषकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. गंभीर खेळांच्या दरम्यान ताण हलका करण्याचे काम विनोदी हालचाली करून विदूषक पार पाडत असतो. 

सर्कशीमध्ये पशुपक्ष्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे खेळ करणाऱ्या पशुशिक्षक व रिंगमास्टरची भूमिकाही महत्त्वाची असते. हिंस्त्र जंगली प्राण्यांकडून साहसी कौशल्याचे खेळ करून घेणे हे काम धोक्‍याचे व जिवावरच्या जोखमीचे असते. पूर्वी वाघ, सिंह, अस्वल यांसारखे जंगली प्राणी, घोडे, हत्ती, उंट, सी लायन त्याचप्रमाणे कुत्र्यांसारख्या पाळीव प्राण्यांचेही खेळ सर्कशीमध्ये होत, हल्ली मात्र अनेक देशांत त्यांच्या वापरावर कायदेशीर बंधने आली आहेत. भारतातील आद्य सर्कसचालकाचा मान विष्णुपंत छत्रे यांच्याकडे जातो. कार्लेकर, देवल यांची सर्कसही नावाजलेली होती. हल्लीच्या काळी जेमिनी सर्कस, रोमन सर्कस, ग्रेट बॉम्बे सर्कस प्रख्यात आहेत. जादूगार हातचलाखी व दृष्टिभ्रम निर्माण करून लोकांचे मनोरंजन करतो. व्यक्तीचे कौशल्य हा जादूच्या खेळांचा पाया असून, लोकांचे मनोरंजन हे उद्दिष्ट असते. हॅरी हौदिनी, डेव्हिड कॉपरफील्ड, तर भारतीय जादूगार पी. सी. सरकार जगविख्यात आहेत. वक्तृत्व ही पण एक कलाच आहे. सभाधीटपणा हा वक्‍त्याचा महत्त्वाचा गुण. हल्ली सार्वजनिकरीत्या औपचारिक प्रसंगी बोलणारी व्यक्ती म्हणजे वक्ता होय. 

विनोद सांगणारा तो विनोदवीर (कॉमेडियन), आधुनिक काळात कॉमेडी म्हणजे गमतीशीर गोष्टी असणारे मनोरंजन, असे आपण म्हणू शकतो. प्रेक्षकांना हसविणे हा याचा मुख्य उद्देश असतो. स्टॅण्डअप कॉमेडी हल्ली अतिशय लोकप्रिय आहे. पु. ल. देशपांडे मराठी साहित्यातील पहिले स्टॅण्डअप कॉमेडियन आहेत. ऑपेरा हा नाटकाचा प्रकार असून, यात संगीताला प्राधान्य असते. यात गायकच जरी वेगवेगळ्या भूमिका निभावत असले तरी हे संगीत नाटकांपेक्षा वेगळे असते. यात अभिनय, निसर्ग वा सृष्टिसौंदर्य, वेशभूषा, नृत्य वा बॅले यांचा समावेश असतो. ऑपेरा हाउसमध्ये सादर होणाऱ्या या कलेला वाद्यवृंदाची महत्त्वाची साथसंगत असून, 19 व्या शतकाच्या आरंभापासून संचालकाची भूमिका यात महत्त्वाची राहिलेली दिसते. 16 व्या शतकाच्या अखेरीस इटलीमध्ये याचा आरंभ झाला असून, प्रामुख्याने युरोपमध्ये हा कलाप्रकार आढळतो. 

2006 च्या सुरवातीपासून अनेक ख्यातनाम ऑपेरा हाउसेस व्हिडिओच्या माध्यमातून सुस्पष्टपणे आपले कार्यक्रम प्रेक्षकांना प्रत्यक्षपणे दाखवू लागले. स्क्रिप्ट रायटिंग, संवाद, नेपथ्य, रंगमंच संकल्पना, रंगभूषा, वेशभूषा इत्यादी अनेक व्यवसाय रंगमंच प्रयोगाशी जोडलेले आहेत. नर्तक, संगीतनाटक कलाकार, पटकथा लेखक, नाट्य संचालक, नाट्यमंच व्यवस्थापन असे फायदेशीर व्यवसायही या कलेशी निगडित आहेत. रंगमंच कलेत प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक होत असल्याने नकळतपणे तेही त्या कार्यक्रमाचा हिस्सा होऊन जातात, हेच या कलेचे वेगळेपण आहे. पु. ल. देशपांडे यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर "पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.'  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com