Shivjayanti 2020 : शिवरायांची तात्त्विक अधिष्ठाने...

theoretical premise of shivaji naharaj
theoretical premise of shivaji naharaj

    शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यासंबंधी आजपर्यंत खूप लिहिले गेले आहे. शिवछत्रपतींच्या दरबारातील कवींद्र परमानंद आणि कृष्णाजी अनंत सभासद यांच्यासारख्या बखरकारांपासून ते अगदी आजचे आघाडीचे साक्षेपी शिवचरित्रकार ग. भा. मेहंदळे यांच्यापर्यंत शिवछत्रपतींच्या जीवनासंबंधी आपल्यापुढे खूपसे मांडले गेले आहे.

ग्रॅंड डफ, राजारामशास्त्री भागवत, वि. का. राजवाडे, द. ब. पारसनीस, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, डॉ. बाळकृष्ण, चिंतामणराव वैद्य, रियासतकार सरदेसाई, यदुनाथ सरकार, सेतूमाधवराव पगडी, ग. ह. खरे, ब. मो. पुरंदरे, मु. गो. गुळवणी, डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहासकारांनी त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला. त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे, डॉ. रा. चिं. ढेरे, नरहर कुरुंदकर, कॉम्रेड शरद पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे आदी विचारवंतांनी या महापुरुषाच्या जीवनकार्याचे आपापल्या दृष्टिकोनातून विश्‍लेषण केले आहे. भालजी पेंढारकरांनी मराठी चित्रपटांतून मराठी मनात शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य सदैव जिवंत ठेवले.

रायगडावर झुडपांत दडलेल्या शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध प्रथम महात्मा फुले यांनी घेतला. तर १८९६ च्या एप्रिलमध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत पहिला शिवजयंती उत्सव साजरा झाल्याचे न. र. फाटक आपल्या ‘लोकमान्य’ ग्रंथात सांगतात. परंतु, शिवछत्रपतींच्या हयातीतच वैशाख द्वितीयेला प्रतापगडावर भवानी मंदिराच्या आवारात शिवजयंती साजरी होत असल्याचा पुरावा स. वि. वावसकर संपादित ९१ कलमी बखर या ग्रंथात मिळतो. 
१९६० मध्ये नवमहाराष्ट्र राज्य निर्मिती झाली आणि शिवजयंतीचा जोश आणि जल्लोष वाढतच गेला. परंतु, या शिवगौरवाच्या जल्लोषात शिवछत्रपतींच्या स्वराज्यनिर्मितीचे तात्त्विक अधिष्ठान दुर्लक्षित केले जात आहे की काय, असा प्रश्‍न आपल्यासमोर उभा राहतो.
सर्वसामान्य नेहमीच शिवछत्रपतींच्या जीवनातील त्यांनी रोहिडेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचे बलिदान, शाहिस्ताखानाची बोटे छाटणे, आगऱ्याहून सुटका आदी घटनांमध्ये रमतो. परंतु त्या घटना शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेतील केवळ साधने आहेत ते साध्य नव्हे, याचा त्याला विसर पडतो. म्हणूनच प्रस्तुत लेखात शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साध्य कोणते होते, हे साध्य कोणत्या तात्त्विक अधिष्ठानावर उभे होते, याचा मागोवा घ्यावयाचा आहे.

मराठीतील पहिले समग्र शिवचरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र’ यातून मांडले. हा अभिजात ग्रंथ १९०७ मध्ये राजर्षी शाहू छत्रपतींच्या आर्थिक साह्याने प्रकाशित झाला. त्यामध्ये शिवछत्रपतींचे स्वराज्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, हा सविस्तरपणे विचार प्रथम मांडला. केळुसकरांचा हा विचार नरहर कुरुंदकरांनीही मान्य केलेला दिसतो. डॉ. नीरज साळुंखे छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य श्रीलंकेपर्यंत जाऊन भिडले असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करतात. डॉ. आनंद पाटील यांच्यासारखे इंग्रजी वाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक आपल्या ग्रंथाला ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ असे नाव जाणीवपूर्वक देतात.
स्वसमूहश्रेष्ठतावादातून काही तथाकथित विचारवंत शिवरायांचे राज्य ‘टिचभर’ असल्याचे जे सांगतात ते कसे चुकीचे आहे, हे आता लक्षात येईल. म्हणून शिवरायांची व्यापकता महाराष्ट्र, भारतापुरती सीमित नव्हती, तर शिवराय भारत भूमीबाहेर जाऊन विस्तारत होते. म्हणून शिवरायांच्या स्वराज्याची व्यापकता हे त्यांचे पहिले अधिष्ठान मानावे लागेल.

राज्यकर्ता या नात्याने शिवरायांनी आपल्या समोर उभ्या असणाऱ्या या देशातील हिंदू-मुस्लिम संघर्षाचे सखोल आणि चिंतनशील असे केलेले आकलन किंवा दाही दिशांनी ती जटिल समस्या कशी नष्ट करता येईल याचे अनुभवजन्य असे केलेले मनन, उकलन हे शिव-स्वराज्याचे दुसरे महत्त्वाचे अधिष्ठान म्हणून विचारात घ्यावे लागेल. म्हणूनच त्र्यंबक शंकर शेजवलकर या संदर्भात शिवाजीराजांचा गौरव करताना म्हणतात,‘‘शिवाजी म्हणजे पाचशे वर्षांच्या हिंदू-मुसलमान लढ्याचा अन्वयार्थ समजलेले एकमेव कर्ते पुरुष, मुसलमानी संस्कृतीतील सर्व उत्तम अंगे आत्मसात केलेले एक पराक्रमी वीर, हिंदुत्वाचा नितान्त अभिमान असलेले एक धर्मनिष्ठ माणूस.’’

शिवछत्रपतींना आपण हिंदू असल्याचा जरूर अभिमान होता; परंतु हा अभिमान सहिष्णू हिंदू धर्माचा होता. शिवरायांची सर्वधर्मसमप्रवृत्ती हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात महत्त्वाचे असे तिसरे तात्त्विक अधिष्ठान होते. त्यामुळेच ते युद्धाच्या धामधुमीत पायदळी पडलेली कुराणाची प्रत आदरपूर्वक परत करतात.
अफजलखान स्वतःला ‘दीनदार बुत्‌शिकन’ (मूर्तिभंजक) असे मोठ्या गर्वाने म्हणवून घेत असे. त्याने हिंदू देव-देवतांची विटंबना केल्याचे पुरावे मिळतात. याउलट शिवछत्रपती मात्र मशिदी-दर्गे यांना हात लावत नाहीत. त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद हा बखरकार लिहितो, ‘मुलखात देव-देवस्थाने जागजाग होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य पाठविले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य (शिवरायांनी) स्थान पाहून पाठविले.’

शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे आणखी एक महत्त्वाचे असे चौथे अधिष्ठान म्हणजे आयुष्यभर विविध शत्रूंशी त्यांनी जो संघर्ष केला तो धर्माधिष्ठित कधीच नव्हता. त्याचे स्वरूप हिंदू विरुद्ध मुस्लिम असे केव्हाच नव्हते. त्या संघर्षाचे स्वरूप एतद्देशीय विरुद्ध परकीय असे होते. शिवछत्रपती विरुद्ध औरंगजेब हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा असता तर मिर्झा राजे जयसिंह शिवछत्रपतींना पकडून आणण्यासाठी आले नसते. बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात जसे हजारोंनी हिंदू होते त्याचप्रमाणे शिवछत्रपतींच्या सैन्यात असंख्य मुस्लिम होते.
स्त्रियांच्या अब्रूची-शीलाची सुरक्षितता ठेवणे ही समाजाच्या संस्कृतीचे मोजमाप करणारी एक मोजपट्टी असते. शिवछत्रपतींच्या हाती तलवारीसारखी ही मोजपट्टी सदैव धारण केलेली दिसते. म्हणूनच ते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून तिला तिच्या सासरी पाठवितात. तर गावातील निराधार स्त्रीशी बदअंमल करणाऱ्या रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडूनकठोर शिक्षा देतात. अर्थातच स्त्रियांच्या शीलाचे संरक्षण प्राणपणाने करणे हे हिंदवी स्वराज्याचे पाचवे तात्त्विक अधिष्ठान म्हणून विचारात घ्यावे लागेल.

शिवछत्रपतींना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ ही बिरुदावली जाणीवपूर्वक लावण्यात एकीकडे वि. का. राजवाडे यांच्यापासून ते ब. मो. पुरंदरे यांच्यापर्यंत धन्यता मानणारा एक वर्ग आहे, तर दुसरीकडे त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील, कॉ. पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यापर्यंत शिवछत्रपती हे गोब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली कधीच लावत नव्हते, असे सांगणारा इतिहासकार, विचारवंतांचा दुसरा वर्ग महाराष्ट्रात आहे. ‘लोकमान्य टिळकांनी १९०५ मध्ये पुण्यातील शिवाजी उत्सवामध्ये शिवाजी महाराजांच्या गोब्राह्मण प्रतिपालक या राजवाडेनिर्मित कल्पनेची वासलात लावली होती,’ असे न. र. फाटक आपल्या ‘रामदास वाङ्‌मय आणि कार्य’ या प्रसिद्ध ग्रंथात निर्धारपूर्वक स्पष्ट करतात. शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ अभिजनांचे किंवा बहुजनांचे नव्हते. ते सर्वजनवादी असे कल्याणकारी राज्य होते. तेच त्या राज्याचे मूलभूत असे सहावे तात्त्विक अधिष्ठान होते.

सारा वसुलीच्या नावाखाली रयतेला गुलामीत ठेवू पाहणारी वतनदारी पद्धत पूर्ण आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय शिवछत्रपतींनी घेतला. मस्तवाल वतनदारांना त्यांनी मोलमजुरीचे स्वरूप दिले. इतकेच नव्हे, तर त्यांना स्वतंत्र वाडे, किल्ले, गढ्या बांधण्यास बंदी केली. शिवछत्रपतींनी आपले स्वराज्य हे ‘रयतेचे राज्य’ आहे याची ग्वाही दिली. राजा म्हणजे ‘उपभोगशून्य स्वामी’ असतो. राज्य हे त्याच्या खासगी मालकीचे नसते. ते केवळ रयतेचे आणि रयतेचे असते. म्हणूनच ५ सप्टेंबर १६६७  रोजी सुभेदारास लिहिलेल्या पत्रात ते सांगतात, ‘त्येणेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे’ हे सातवे तात्त्विक अधिष्ठान सदैव नजरेसमोर ठेवून शिवछत्रपतींनी स्वराज्याची धुरा वाहिली. शिवछत्रपती हे हाडामांसाचे माणूस होते. त्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर सह्याद्रीइतके उंच असे कर्तृत्व करून हे अलौकिक असे ‘रयतेचे राज्य’ आपल्यासमोर उभा करून संपूर्ण मानवजातीपुढे एक अक्षय अमृतमय असा आदर्श ठेवला आहे हे सदैव स्मरणात ठेवणे, हाच त्यांना मानाचा मुजरा ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com