सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेसह इटली, स्पेन, भारत, चीनसह अन्य देशांना या व्हायरसचा तडाखा बसला आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. एका व्हायरसमुळे मानवजातीची अपरिमित हानी झाली आहे. लोक घरात बंदिस्त जीवन जगताहेत. तसा वायरस हा विषय सिनेसृष्टीला नवीन नाही. त्यातही व्हॉलिवुड चित्रपटांमध्ये अज्ञात व्हायरस किंवा साथीच्या रोगाचा प्रसार या विषयावर आत्तापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अर्थात, त्याच्याशी मिळता-जुळता चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला आहे. कंटेजन हा व्हाॅलिवुडपट सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चीनमधून अमेरिकेत आलेला व्हायरस लाखो लोकांचे बळी कसा घेतो आणि त्यापासून बचावासाठी औषध विकसित करण्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात व्हायरस प्रतिबंधासाठी सोशल डिस्टन्स, क्वारंटाईन व आयसोलेशनसारख्या उपायांचा उल्लेख केला गेला आहे.