कोरोनातून सावरणाऱ्या "युके'समोर मंदीच्या झळा : अनुभव सातासमुद्रापारचे 

ऋतुजा राजमाने, लिडस्‌ (इंग्लंड) 
Saturday, 30 May 2020

"युके' झपाट्याने सावरतेय. गेल्या 20 एप्रिलपासून टाळेबंदी शिथिल होत गेली. आता कोरोनाच्या भीतीतून समाजमन सावरतेय. कोरोना आणि मंदी अशा दोन आव्हानांवर झालेल्या सरकारी उपाययोजनांचे यशापयश तपासण्यासाठी आता काळच जावा लागेल. 

कोरोनाला सामोरं जायचं कसं, याबद्दल इथं प्रारंभी मोठा गोंधळ झाला. आपल्याप्रमाणेच अचानक टाळेबंदीच्या अनेक अप्रत्यक्ष दुष्परिणामांना आजही इथे सामोरे जावे लागतेय; मात्र हुशारीच्या काही उपाययोजनांमुळे "युके' झपाट्याने सावरतेय. गेल्या 20 एप्रिलपासून टाळेबंदी शिथिल होत गेली. आता कोरोनाच्या भीतीतून समाजमन सावरतेय. कोरोना आणि मंदी अशा दोन आव्हानांवर झालेल्या सरकारी उपाययोजनांचे यशापयश तपासण्यासाठी आता काळच जावा लागेल. 

आमचं मूळ गाव मिरज तालुक्‍यातील कवठेपिरान. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही पुणेकर झालो. सिम्बॉयसिसमधून बीएस्सी करून आर्टस्‌ पदवीनंतर सध्या मी इंग्लंडमधील लिडस्‌ बेकेट्‌ युनिव्हर्सिटीत आहारशास्त्रातील एमएस्सी स्पोर्टस्‌ ऍन्ड एक्‍सरसाईज न्युट्रीशन या पदवीसाठी इथे आले आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स, या चार देशांचा समूह म्हणजे युके. क्रिकेटप्रेमींना लिडस्‌ माहीत असेलच. सुमारे सव्वाआठ लाख लोकसंख्येचे हे शहर ब्रिटिशांच्या सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेले. परंपराप्रिय अशा या शहरात कोरोनाच्या आपत्तीने पहिल्या टप्प्यात चांगलीच भंबेरी उडाली. अचानक टाळेबंदीने खाद्यपदार्थांपासून अनेक बाबतीत मोठी टंचाई झाली. चार दिवसांच्या धावपळीनंतर पुरवठा सुरळीत झाला. शासनाने इथे धान्य-किटस्‌चे वाटप केले. धान्याच्या किमतीही कमी केल्या. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने पूर्णवेळ सुरू झाली आणि गोंधळ कमी होत गेला. 

घरी स्वयंपाक हे ब्रिटिशांसाठी दिव्यच. माझ्यासाठी मात्र ती सवय. इथे विद्यापीठात फक्त राहायचीच सोय आहे. मेस नाहीच. त्यामुळे टाळेबंदीचा तसाही मला थेट फरक पडला नाही. साधारण दीड महिन्याची टाळेबंदी 20 एप्रिलपासून शिथिल झाली. जनजीवन पूर्वपदावर येतेय; मात्र अनेक समस्यांसह. आता इथे वेतनात सरासरी 20 टक्के कपात झाली. सरकारने असा आदेश काढतानाच कंपन्यांसाठी खेळते भांडवलही उभे करून दिले. घरातूनच काम करण्यासाठी सर्वच पुढे आल्याने कामकाज पूर्ण ठप्प असं झालं नाही. ऐतिहासिक अशा सर्वच पर्यटन केंद्रांना फटका बसल्याने अवलंबितांना फटका बसला. ही समस्या जगभराचीच. त्यावर इथे काय उपाय होतो हे बघावे लागेल. मंदीच्या झळा तीव्र आहेत. वेतन कपात आणखी वीस टक्के वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता सरकारकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

इथल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचं मोठं सर्वव्यापी जाळं चारही देशांत आहे. त्याअंतर्गत राव असो वा रंक; सर्वांवर उपचार होतात. कोविडने गाठलेल्या पंतप्रधान बोरीसनी याच व्यवस्थेत उपचार घेतले आणि बरे झाले. एरवीही आजाराबद्दल शंका वाटली तर सहज उपलब्ध मदत क्रमांकांवर संपर्क साधला तर फोनवरूनच प्रश्‍न विचारले जातात आणि आवश्‍यक वाटले तर न्यायला थेट रुग्णवाहिकाच येते. रुग्ण सापडला तर त्याच्या वावरात फिरती प्रयोगशाळा दाखल होते. "ड्राईव्ह थ्रू सॅंपल' ही ती सुविधा. एकाच वेळी शेकडो थुंकी नमुने घेतले जातात आणि 48 तासांत अहवाल जाहीर होतात. आजही ही मोहीम अखंड सुरू आहे. गृह-परिसरात मर्यादित टाळेबंदीही लागू होते. त्यामुळे आता साथ आटोक्‍यात आहे. आतापर्यंत पूर्ण युकेमध्ये 2 लाख 69 हजार बाधित तर 37 हजारांवर मृत्यू आहेत. भीती वाटावे असेच हे प्रमाण. लिडस्‌मध्ये 1600 बाधित आहेत. त्यामुळे टाळेबंदीनंतर मलाही भारतात यावं असं वाटलं; मात्र विमाने बंद झाली. आता इथेही भीती कमी झाली आहे. तूर्त परतण्याचा विचार नाही. इथे आता कोरोनासोबतचे जगणे सुरू झाले आहे. 

(शब्दांकन - ज्ञानदेव मासाळ) 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या