जीवघेण्या स्पर्धेचा बाजार अन् 'विकाऊ टॉपर्स'

UPSC
UPSCSakal

कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एखादा मुलगा/मुलगी टॉपर आले की, ते हमखास तीन-चार क्लासेसच्या तरी जाहिरातीत झळकत असतात आणि हे मी बारावी पासून पाहतोय. 12th, CET, JEE, MPSC, UPSC या सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे टॉपर अनेक क्लासेसच्या पोस्टरवर, पेपरातल्या जाहिरातीत चमकत असतात. MPSC/UPSC च्या परीक्षेत पास झालेले तर डायरेक्ट 7-8 क्लासेसच्या जाहिरातीत झळकतात. पण एकजण एवढ्या क्लासेसच्या जाहिरातीत कसा? हा प्रश्न तुम्हालाही अनेकवेळा पडला असेल.

तसं बघितलं तर टॉपर येणारा वर्ग मुळातच अभ्यासात हुशार आणि अभ्यासाच्या बाबतीत मेहनती असतो, त्यामुळे त्यांना क्लासेसची फारशी गरज पडत नसते, थोडाफार गायडन्स पाहिजे असतो. उदाहरणार्थ UPSC मध्ये सौम्या शर्मा AIR-9 आली होती, तेही एका वर्षाच्या अभ्यासात आणि कुठलाही क्लास न लावता. फक्त तिने काही टेस्ट सिरीज केल्या होत्या. गौरव अग्रवाल सरांनी तर काही दिवसातच वाजीरामचा क्लास सोडून दिला होता, त्यांना फक्त इतिहास हा विषय अवघड जात असल्याने त्यांनी बलियान सरांकडे इतिहासाचे मोड्यूल केलं होतं. ते भारतात पहिले आल्यावर वाजीरामने त्यांच्या क्लासचा विद्यार्थी म्हणून गौरव सरांचा फोटो लावला होता.

कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खरा तर खूप मोठा असतो व तो खूप वेळ सेल्फ स्टडी केला तरंच पूर्ण होतो. जर एखाद्या टॉपरने सात-आठ क्लास लावले तर त्याला सेल्फ स्टडीला वेळ राहणार कसा? कारण '24 तासातले 36 तास' क्लास करण्यातच जातील. मग अभ्यास कधी करणार? रिव्हीजन कधी करणार? टेस्ट कधी सोडवणार? आणि टॉपर कधी येणार? कोणत्याही मनुष्याला सात-आठ क्लास करणे शक्यच नाही. UPSC/MPSC मध्ये तर बरेच जण 3-4 ठिकाणी मॉक इंटरव्यू देतात, म्हणून त्यांचं नाव अनेक ठिकाणी दिसू शकतं. पण तरी काही जणांचं नाव 8-10 मोठमोठ्या अशा क्लासेसला असतंच. पण NEET/JEE या परीक्षेसाठी मुलाखत नसून सुद्धा पोरांचं नाव 3-4 ठिकाणी दिसतंच कसं? हाच खरा 'कोड्यात न टाकणारा' प्रश्न आहे, कारण त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

एक टॉपर अनेक ठिकाणी दिसतो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे "विकाऊ टॉपर्स" आतापर्यंत तुम्ही "विकाऊ मिडिया" ऐकलं असेल, पण "विकाऊ टॉपर्स ही संकल्पना कदाचित तुमच्या कानावर पडलेली नसेल. पण ही बिकाऊ टॉपर गॅंग, विकाऊ मीडिया पेक्षाही जास्त विकाऊ आहे. सात-आठ क्लासेसच्या पोस्टरवर टॉपर उगाच झळकत नसतात, त्यांना तिथे झळकण्यासाठी रग्गड पैसा मिळतो. हा पैसा कित्येक लाखात असतो. काहींना तर कार मिळते, काहींना फ्लॅट मिळतो तर काहींना विदेश दौरा सुद्धा मिळतो. प्रत्येक टॉपरला प्रत्येक क्लास त्यांच्या पोस्टरवर येण्यासाठी लाखो रुपये देत असतो व टॉपरही फक्त एकाच क्लास कडून पैसे न घेता अनेक ठिकाणांवरून घेतात व त्यांच्या जाहिरातीत आपला चेहरा लावतात. क्लासच्या सत्कार समारंभाला येण्यासाठी सुद्धा त्यांना पैसे दिले जातात. हे वास्तव प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकाला निर्विवादपणे स्विकारावं लागेल.

परवा मला सदाशिव पेठत एक पोरगा भेटला. तो एका मित्राचा रूममेट होता. त्यालाही प्रत्येक मराठी तरुणाप्रमाणे UPSC करून IAS व्हायचं होतं. त्याच्या घरी ना पैसा ना पाणी, तरी त्याने लाखभराचं कर्ज काढून कुठल्यातरी ॲकॅडमीला क्लास लावला होता. त्याने MA इकॉनॉमिक्स केलेलं होतं. मी म्हटलं ऑप्शनल इकॉनॉमिक्स घेतोय का? तर तो म्हणाला "नाही, मराठी लिटरेचर" घेतोय. म्हणलं इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स करून मराठी कसं जमेल तुला? तर म्हणला की मराठीला चांगले मार्क्स येतात, अन्सार शेखला पण आले होते. त्याला हेही माहिती नव्हतं की अन्सार शेखने पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल घेतला होता, फक्त परीक्षा मराठी माध्यामातून दिली होती. पण अन्सार मुळातच हुशार, मेहनती होता आणि त्याला मुलाखतीत पण 199 मार्क्स आले होते. त्यामुळे तो 22 वर्षाचा असतानाच IAS झाला. तू आता पंचवीसचा असताना तयारी सुरू करतोय, कसा मेळ लागायचा? तरी त्याने ऐकलं नाहीच...

टॉपर्स हे मुळातच हुशार व मेहनती असतात, तेही लहानपणापासूनच. त्यांची शैक्षणिक कारकीर्द चांगली असते म्हणूनच ते स्पर्धा परीक्षांमध्ये पण चांगला रँक काढतात. उठसूठ कुणीही टॉपर येत नसतं, इथे काही अजय देवगनचा "जिगर" पिच्चर नाहीये की, बदला घेण्यासाठी अजय देवगण लहानपणापासून कराटे शिकलेल्या फायटरला धूळ चारतो. टॉपर मुलगा/मुलगी हुशार असले म्हणजेच नीतिमान असतीलच असं नाही. कारण नैतिकता व हुशारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच हे टॉपर्स विकले जातात व प्रत्येक क्लासच्या कार्यक्रमात भाषणं ठोकताना दिसतात, पोस्टरवर दिसतात. मोक्कार पैसे छपाईचा काळ असतो तो त्यांच्यासाठी. हे या क्षेत्रातलं कटू वास्तव.

पण ह्या विकाऊ टॉपर्सवर आक्षेप घेण्याचं आपलं कारण काय? हा तर त्यांच्यातला आणि क्लासेस मधला व्यवहार आहे ना! पण इथेच तर खरी मेख आहे. अशा जाहिराती पाहूनच पोरांचे पालक या क्लासेसला ॲडमिशन घेतात. जिथे क्लास नीट घेत नाही, अभ्यासक्रम पूर्ण करत नाही व टेस्ट सिरीजही चांगल्या दर्जाची नसते. कित्येक क्लासला फक्त हुशार पोरांकडे लक्ष दिलं जातं. मी बारावीत जो क्लास लावला होता तिथे तर दहावीत चांगले मार्क्स असणाऱ्यांना कमी फी भरावी लागायची. ज्यांना 90% पेक्षा जास्त मार्क होते त्यांना तर फक्त 10% फी भरावी लागायची आणि त्यांना स्पेशल ट्रीटमेंट पण असायची. पण आमच्यासारखे मराठी मिडीयम मधून सायन्स घेतलेले, की ज्यांना प्रत्येक शब्द डिक्शनरी मध्ये पहावा लागायचा त्यांना कुणी विचारत नसायचं. या असमान वातावरणामुळे कमी मार्क्सवाले व मराठी मिडीयमचे पोरं मागे पडतात व ज्यांना क्लासची गरज नसली तरी ते टॉपर येतील त्यांनाच प्रोत्साहन दिलं जातं.

मुळात शाळेपासूनच हा क्लासेसचा बाजार वाढवण्यात टॉपरचा मोठा हातभार आहे. त्यांच्या स्क्रिप्टेड भाषणांमुळे विद्यार्थी प्रभावित होतात. वरून पालकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याचे दुःख वेगळंच. पालकांना वाटतं की पोराला चांगला क्लास लावला, त्याच्यावर भरपूर पैसे खर्च केले तर पोरगा MBBS ला लागलाच पाहिजे, IAS झालाच पाहिजे! अशा अपेक्षांचं ओझं उरावर वाहणारे कितीतरी पोरं-पोरी आजकाल डिप्रेशनमध्ये आहेत.

माझी बारावी झाली त्यावेळी करियर समुपदेशनासाठी आम्ही एका शिक्षिकेला भेटलो होतो. त्या शिक्षिकेचे पती कॉलेजला प्रोफेसर होते व त्यांची मुलगी माझ्यासोबतच बारावीत होती, पण CET मध्ये कमी मार्क्स पडल्याने त्या मॅडमच्या मुलीला MBBS न भेटता BAMS साठी प्रवेश मिळणार होता. दोघा आई-बापांनी तिला CET रिपीट करायला लावली. परत क्लास लावले, टेस्ट सिरीज लावल्या, परीक्षेआधी क्रॅश कोर्स लावला पण तरी तिचा MBBS ला नंबर लागला नाही. निकालाच्या दिवशी पोरीने बापाला मेसेज केला की, "पप्पा सॉरी, मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही" व गळफास घेऊन आत्महत्या केली. हे वास्तव. आईबापांच्या अपेक्षेखाली पोरीचा बळी गेला. आई-बापांमध्ये पण एक वेगळी स्पर्धा लागलेली होती व त्या स्पर्धेने पोरीचा जीव घेतला. शहरातल्या क्लासेसचं वातावरण व तिथली जीवघेणी स्पर्धा, आई-बापाला माहीत नसते व वरून त्यांच्या अपेक्षा ते लेकरांवर लादतात, त्यामुळे कित्येक मुलं कोवळ्या वयातच आयुष्य संपवतात.

क्लासेसने उभी केलेली ही स्पर्धा आता घराघरात पोहोचलेली आहे. गावातल्या एखाद्या श्रीमंत कुटुंबाने पोराला ज्या क्लासला टाकलेलं असतं, त्याच क्लासला बाकीचे मध्यमवर्गीय कुटुंब पोरांना घालतात व जीवघेण्या स्पर्धेत ढकलून देतात. एखादा क्लास चांगला आहे हे पालकांना कसं कळतं? तर त्यांच्या पेपरातला जाहिराती पाहून, त्यांच्या टॉपरचे फोटो पाहून. त्यातले बऱ्यापैकी टॉपर्स हे विकत घेतलेले असतात. अशा विकाऊ टॉपर्समुळे अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य जीवंतपणी नरक झालेलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या स्पर्धापरीक्षा थिअरीवर आधारित असल्याने त्यात नोकरी किंवा उद्योगास उपयोगी स्कील पण मुलांमध्ये तयार होत नाही. त्यामुळे अशा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न अजूनच विदारक रूप धारण करतो.

त्यामुळे पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, ह्या बाजाराचं आयतं गिऱ्हाईक होऊ नका, प्रत्येकाचा पोरगा MBBS, IAS, IITian होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या विकाऊ टॉपर्सच्या नादी लागून पोरांना कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये ढकलण्यापेक्षा त्यांना रोजगाराभिमुख स्कील कसं मिळेल याचा मार्ग शोधायला हवा. ही मेंढरांसारखी प्रत्येक चकाकणाऱ्या गोष्टींच्या मागे पळण्याची सवय सोडा व कवटीतल्या मेंदूचा उपयोग करा. आपल्या पोरांची अभ्यासातली गती, त्यांची मेहनत घ्यायची तयारी किती आहे हे पाहूनच, त्यांनी कुठल्या स्पर्धा परीक्षांमध्ये घुसायचं की नाही हे ठरवा.

- विजय रहाणे (vijayrahane@ymail.com)

(लेखक हे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com