
भारतात दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा होत असताना ब्रिटनच्या राजकारणाला अयतिहासिक कलाटणी मिळाली. त्याच दिवशी ब्रिटनमधील हुजूर पक्षाने 42 वर्षाचे भारतीय वंशाचे हिंदू नेते व माजी अर्थमंत्री ऋषि सुनक यांची पक्षनेते व पंतप्रधानपदी निवड केली. ब्रिटनच्या 210 वर्षांच्या इतिहासात निवडून आलेले सुनक हे पहिले व सर्वात तरूण पंतप्रधान आहेत. ब्रिटनमध्ये जन्मलेले ते कृष्णवर्णीय आहेत. अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशात अधुमधून उफाळून येणाऱ्या वंशवादावर मात करून बराक ओबामा 2009 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले व 2022 मध्ये सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले. दोन्ही देश श्वेतवर्णीय आहेत. दुसरीकडे, काळाची पावले ओळखून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी 2021 मध्ये उपाध्यक्ष पदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड केली. भारतासाठी हे सारे निश्चितच अभिमानास्पद होय.
स्वतःला `विश्वगुरू’चे बिरूद लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रतिस्पर्धी निर्माण झालाय. तसंच, परदेशस्थ भारतीय स्थानीय नेत्यांच्या काकणभरही मागे नाहीत, हे यामुळे दिसून येत आहे.
सुनक हे कृष्णाष्टमीच्या दिवशी गायीची पूजा करतात. आपल्या आजोबांनी बांधलेल्या देवळात जाऊन पूजाअर्चा करतात, मांसाहार करीत नाहीत, भगवत्गीतेवर हात ठेवून ब्रिटिश संसदेच्या सदस्यपदाची शपथ (2015) घेतात, ब्रिटनचे प्रिन्स फिलप(तृतीय) यांना भेटायला जातानाही हातात लाल गंडा (कलावा) घालतात. 10 डाऊनिंग स्ट्रीटहून केलेल्या पहिल्या भाषणातही तो घातलेला दिसत होता, अशी एका मागून प्रसिद्ध होणारी माहिती अनेकार्थाने विस्मयजनक आहे. त्यातून त्यांचे प्रबुद्ध व्यक्तिमत्व प्रतीत होते. हिंदुधर्माविषयी असलेली त्यांची शिकवण त्यातून दिसते. तरुणपणी हॉटेल बॉय म्हणून रेस्टॉरंन्ट ते मध्ये काम करीत. पंतप्रधान मोदी ही रेल्वे स्टेशनवर चहावाला म्हणून व्यवसाय करीत. दोघेही सामान्य कुटुंबातून आलेले. परंतु, कौतुकाची बाब म्हणजे, ब्रिटनच्या राजकारणात प्रवेश करून केवळ सात वर्षात ते पंतप्रधान झाले, याचा सर्वत्र आदराने होणारा उल्लेख. आज ते आणि त्यांची पत्नी अक्षथा मूर्ती (इन्फोसिसचे अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांची कन्या) हे ब्रिटनमधील सर्वाधिक सधन कुटुंब मानले जाते. त्या दोघांची संपत्ती 730 दशलक्ष पौंड एवढी आहे. मजूर पक्षाच्या खासदार नादिया व्हिटोम यांच्यानुसार ब्रिटनचे राजे प्रिन्स फिलिप (तृतीय) यांच्या संपत्तीपेक्षा सुनक यांची संपत्ती दुप्पट आहे. सुनक सत्तेवर येताच ढासाळणारा पौंड वधारला. ब्रिटनच्या औद्योगिक क्षेत्राला उभारी आली.
त्यांच्या आधी ब्रिटनच्या इतिहासात सर्वात अल्पकाळ म्हणजे केवळ पन्नास दिवस झालेल्या पंतप्रधान लिझ ट्रस यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त व वादळी ठरली. या अल्पकाळात अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग व गृहमंत्री सुएला ब्राव्ररमान यांना एकामागून एक द्यावे लागलेले राजीनामे व त्यानंतर आलेल्या अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी लिझ सरकारचे पूर्णपणे रद्द केलेले करविषयक धोरण, यामुळे ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची प्रतिमा ढासाळली. सुनक यांच्या निवडीने ती सावरली आहे. तथापि, माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन, लिझ ट्रस, तसेच पंतप्रधान पदाच्या चुरशीतून बाहेर पडलेल्या पेनी मॉर्डांट यांचे वेगवेगळे गट पक्षात असून, मतभेदातून मार्ग काढून पक्षअयक्य साधण्याचे मोठे आव्हान सुनक यांच्या पुढे आहे.
ब्रेक्झिटनंतर काही काळ ब्रिटनमधील वातावरण काही प्रमाणात सुधारले होते, दुसरीकडे राजकारणातील अस्थिरता वाढत होती. अर्थव्यवस्था कोलमडत होती. ग्राहकवस्तूंच्या किमतींच्या चलनवाढीचे प्रमाण साडे दहा टक्क्यांवर गेले आहे. ब्रिटनमधील नागरीक आता एकवेळच जेवण करीत आहेत, अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे एकेकाळी जगाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनची ही अवस्था पाहून युरोपातील अन्य देशात काळजीचे वातावरण पसरले.
बोरिस जॉनसन यांच्या कारकीर्दीत करोनाचा ब्रिटनमध्ये कहर झाला होता. ते संकट जॉनसन यांच्या सरकारने योग्यपणे हाताळले नाही, अशी जोरदार टीका होत होती. शिवाय, त्यांच्यावर झालेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी सुनक यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यांच्या नंतर आलेल्या लिझ ट्रस यांच्या निवडणुकीत सुनक प्रतिस्पर्धी उमेदवार होते. परंतु, ब्रिटन कृष्णवर्णीयास निवडणार नाही, हे त्यावेळी खरे ठरले. तथापि, यावेळी ऋषि सुनक यांच्या इतका योग्य नेता हुजूर पक्षालाही मिळाला नाही. पुन्हा पंतप्रधान होऊ पाहाणाऱ्या जॉनसन यांनी अखेर स्वतः चुरशीतून नाव मागे घेतले. त्यामुळे सुनक यांचा मार्ग मोकळा झाला. सुनक यांना सर्वाधिक 144 संसद सदस्यांचा पाठिंबा मिळाला, बोरिस जॉनस्न यांना 56 तर पेनी मॉरडॉन्ट यांना केवळ 23 सदस्यांचा पाठिंबा होता.
ब्रिटनवरील करोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्याचबरोबर ढासाळणाऱ्या आर्थिक परिस्थितीला सावरायचे मोठे आव्हानही आहे. ऱशियाने लादलेल्या युक्रेनवरील युद्धाचा शेवट दृष्टिपथात नाही. रशियन खनिज तेल व गॅसचा पुरवठा सीमीत झाल्याने युरोपची ससेहोलपट सुरू आहे. त्याचा परिणाम ब्रिटनवरही होत आहे. त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सुनक यांच्यावर आहे. भारतासाठी समधानाची बाब म्हणजे सुनक यानी चीनला `बिगेस्ट लॉंगटर्म थ्रेट टू ब्रिटन’ असे म्हटले असून, चीनी तत्ववेत्ता कॉन्फ्युशियसचे तत्वज्ञान शिकविणाऱ्या तीस संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये येणाऱ्या शरणार्थींची संख्या घटविण्याच्या जॉनसन यांच्या धोरणाला त्यांचा पाठिंबा आहे. तसेच, ``ब्रिटनमध्ये सर्वात जास्त भारतीय बेकायदॆशीर रित्या राहात आहेत व त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी लागेल,’’ या मताच्या माजी गृहमंत्री सुएला ब्राव्हरमन यांची सुनक यांनी पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केल्यामुळे सुनक सरकारचे स्थलांतरिताबाबतचे धोरण भारतासाठी किती अनुकूल राहणार, ही शंका कायम आहे. भारत व ब्रिटन दरम्यान खुल्या व्यापार (एफटीए) करार करण्यास त्यांचा विरोध आहे, तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी भारत उत्सुक व प्रयत्नशील आहे. ब्राव्हरमन यांचा विरोध पाहता, सुनक त्याबाबत काय पाऊल टाकतात, याकडे भारताचे लक्ष लागले आहे. हा करार झाल्यास ब्रिटनहून आयात होणाऱ्या मालावरील जकात कमी होईल.
सुनक यांच्यापूर्वी भारतीय वंशाचे लिओ व्हराडकर हे 2017 मध्ये आयर्लँडचे पंतप्रधान झाले. त्या पदावर ते जून 2020 पर्यंत होते. त्याचप्रमाणे 2015 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान झालेले अन्तोनिओ कोस्टा यांचे वंशज गोव्याचे होते. फिजीचे माजी पंतप्रधान महेश चौधरी हे भारतीय वंशाचे. अशा अनेक भारतीयांनी परदेशात जाऊन भारताची मान उंचावली आहे. सुनक यांच्या बाबतचे आगळेवेगळे वैशिठ्य म्हणजे, ज्या ब्रिटन ने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, त्या देशाला भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अवघ्या 75 वर्षात एका भारतीयाला पंतप्रधान म्हणून निवडण्याची वेळ आली. त्यातून भारतीयांनी गाठलेली उंची तर दिसतेच, परंतु, ब्रिटनमधील उदारमतवादी, लोकशाहीवादी व वंशवादाला भेदणारे राजकारण व समाज दिसतो. भारतातील आजच्या धार्मिक उन्मादात गुदमरणाऱे वातावरण निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.