साहेब शेती शिवाय मजा नाय

साहेब शेती शिवाय मजा नाय

कोरोनाच्या संकटामुळे सारे जग हादरून गेले आहे. यावर उपाय म्हणून अनेक देशांनी आपल्या सीमा बंद करत लॅाकडाऊन केले आहे. संसर्ग टाळण्यासाठी सर्वच जनतेला क्वॅारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे सगळे उद्योगधंदे बंद ठेवण्याची वेळ आली. सुरवातीस घरातून सुरू असलेले काम आता जवळपास कमी झाले आहे. लॅाकडाऊनमुळे सगळ्या इंडस्ट्री बंद झाले असलेतरी सध्या मात्र एकच इंडस्ट्री सुरू आहे ती म्हणजे अॅग्रो इंडस्ट्री.
बाधित रूग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय विभाग, संसर्ग टाळण्यासाठी पोलिस तर सर्वाना पोटभर जेवण देण्यासाठी शेतकरी अहोरात्र झटत आहे. सर्वाना जेवण मिळाले पाहिजे एवढ्या एकाच उद्देशाने शेतकरी धडपडताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बिनडोक लोकांसाठी हा शेतकरी राबत आहे. निर्सगाच्या अवकृपा, चुकीचे शासन, दुष्काळ परिस्थिती, बाजारपेठातील फसवणूक, वाढत्या खताच्या किमंती, शेतमालाच्य दरातील अस्थिरता, अपुरी विज यासारख्या असंख्य समस्याना सामोरे जात शेतकरी सर्वाना जगविण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्याच्या कष्टाला अनेकदा हिणवले जाते.
शहरी बाबूतर शेतकऱ्यांना फुकट देत असल्याच्या अर्विभावात खरेदी करतात, जणू यांनी नाही घेतले तर शेतकरी उपाशी राहिल. काही तज्ञ परदेशी शेतकऱ्यांची उदाहरण देतात. मात्र तेथील सोयसुविधाबाबत ब्र शब्द माहित नसतात. कोरोनामुळे देशापासून अगदी गावाच्या सीमाबंद केल्यावर शेतातून पिकाणाऱ्या भाजीपाल्याचे महत्व या तज्ञ मंडळीना जाणावू लागले आहे. नैसर्गिक संकटे तसेच दरातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत आले. यातून कर्जाचा डोंगर झाल्याने, हा डोंगर कसा फिटणार या भितीने शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. यातून अनेकांची कुटुंबे पोरकी झाल्याने रस्तावर आली. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या समस्या समजून न घेता त्याच्या आत्महत्येवरच प्रश्नचिन्ह निर्माण केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमाफी केली. या कर्जमाफीवर टिका केली. शेतकऱ्यांना देईल तेवढे कमी आहे, सगळे स्वताच्या खिशातून जात असल्याच्या अर्विभावात टिकाही केल्या. मात्र, सद्य परिस्थितीत हाच शेतकरी अख्या देशाला अन्नधान्य, भाजीपाला पुरवत आहे. कितीही पैसे असलेतरी हे खाता येत नाही.
शेतकऱ्यांनी पिकवलेलीच भाजी खाल्याशिवाय जगता येत नाही हे कोरोनाच्या संकटातून स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या संकट सगळ्यावरच असलेतरी शेतकरी आजही शेतात राबत आहे. काेरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाजार समित्या, स्थानिक मंडई बंद ठेवल्या आहेत. तरी शेतकरी न थांबता अगदी घरपोच भाजीपाला पोचवत आहे. जीवाच्या भितीमुळे घरी बसलेल्या दोन घास देण्याचे काम आज शेतकरी करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे एकदा महिना जरी सगळे बंद राहिले तरी चालू शकते. मात्र, अॅग्रो इंडस्ट्री बंद राहिली तर अन्न पाण्यावाचून जगणे शक्य होणार आहे. सर्व यंत्रणा बंद राहण्यामुळे सर्वच उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. या उद्योग धंद्या प्रमाणेच शेतीचे नुकसान होणार आहे. तरी शेतकरी घरी न बसता प्रयत्न करत आहेत.
सुखातील मदत लक्षात राहत नसते मात्र संकटात केलेली मदत ही नेहमीच लक्षात रहाते. आज संकटात शेतकरी आपला जीव धोक्यात घालून अगदी मुंबई, पुणे या शहारात शेतमाल घेऊन जात आहे. हा भाजीपाला देत असतानाही स्वताच्या दराचा हट्ट न धरता परवडेल अशा दरात घर पोहच करत आहे. या कष्टाला विचार कधीतरी प्रमाणिकपणे करा आपला शेतकरी आपली भूक भागऊ शकतो हेच आडच्या घडीला सत्य आहे. शेवट इतकेच साहेब शेती शिवाय मजा नाय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com