Blog: पुरोगामी 'सर्जेरावां'ना वजाबाक्यांची बाई खुपच घाई...

Blog: पुरोगामी 'सर्जेरावां'ना वजाबाक्यांची बाई खुपच घाई...

बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा दिल्याकारणाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. तिच्यासोबतच काँग्रेसचे सत्यजित तांबे देखील याच कारणासाठी ट्रोल होतायत. पुरोगामी गटाच्या वेगवेगळ्या शेड्स यां दोघांच्या विरोधात उतरलेल्या दिसून येतायत. वरकरणी दोन्ही प्रकरणांचा पायाघटक 'पुरंदरे' हा एकच असला तरीही त्यांच्या आक्षेपाच्या आशयात मात्र निश्चितच फरक आहे.

मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं, त्यांना पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी मानावं का? असा पुरोगामी वर्तुळाचा बेसिक सवाल! "दाभोलकरांच्या 'अंनिस' व्यासपीठावर सतत येणाऱ्या सोनालीला तर आम्ही आमची मानत होतो., पाहिलंत ना, शेवटी 'हे लोक' आपले रंग दाखवतातच, " अशा वेगवेगळ्या आशयाच्या विरोधांच्या शेड्स यामध्ये दिसून येतायत.

बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांनी शिवाजी महाराजांसदर्भात केलेली मांडणी ही वादग्रस्त आहे. मुळात ते शिवशाहीर होते का? इथपासून पुरोगामी लोकांचे आक्षेप आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचा 'शिवाजी' खरा की 'शिवाजी' मांडला म्हणून पाठीमागून गोळ्या झाडून खून झालेल्या गोविंद पानसरेंचा 'शिवाजी' खरा? हा 'ब्राह्मणी विरुद्ध बहुजनवादी' अशा मोठ्या साहित्यिक-सांस्कृतिक लढ्यातील एक सतत चर्वण केलेला आणि पुढेही होत राहील असा प्रश्न! याला किनार अर्थातच जातवास्तवाची आहेच, सोबतच वास्तव इतिहासाच्या शोधाची आणि आग्रहाची देखील आहे.

आता इथे पुरोगामी म्हणजे काँग्रेसी, राष्ट्रवादी, ब्रिगेड, अंनिसवाले, कम्युनिस्ट, आंबेडकरी अशा सगळ्याच वेगवेगळ्या छटांचे लोक आले. सोनाली कुलकर्णींनी जर फक्त सदिच्छा दिल्या असत्या तर वेगळी बाब ठरली असती मात्र, त्यांनी फोटोला दिलेलं कॅप्शन विचार करण्याजोगंचं आहे, हे नक्की!

Blog: पुरोगामी 'सर्जेरावां'ना वजाबाक्यांची बाई खुपच घाई...
निळू फुले: खलनायकी मुखवट्यामागचा सच्चा माणूस!

"आमचा इतिहास शंभरीत पोचला... आमची जागा तुमच्या पायाशी... जय भवानी जय शिवाजी!" त्यांनी दिलेल्या या कॅप्शनमधील 'आमचा इतिहास' आणि 'जागा पायाशी' या शब्दांचे गर्भितार्थ काढेल तसे नक्कीच निघू शकतात. 'आमचा इतिहास' असं म्हणताना सोनालींना पुरंदरेंचा इतिहास मान्यय, हे दिसूनच येतं. शिवाय अर्थ काढणाऱ्यांना 'आमचा' शब्दमागे जातीय संदर्भ देखील सहज आढळून येतील. म्हणजे अर्थातच, ही पोस्ट म्हणजे एक फोटो आणि दोन ओळींचे कॅप्शन इथपर्यंत मर्यादीत नाहीये. यामागे खूप मोठे जातीय संदर्भ आहेत.

हे खरंय की, पुरंदरेनी लिहलेल्या इतिहासाचा जुनाजाणता वाद, त्यांनंतर पुरंदरेंना ज्या'टायमिंग'ला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला होता, तेंव्हा पानसरेंच्या खुनाचा तपास देखील लागला नव्हता. तेंव्हा त्यांना आणि त्यानिमित्ताने जो 'शिवाजी' पुढे आणला गेला, या सगळ्याचे संदर्भ मागे उभे राहतात. आणि त्यामुळेच 'आमची सोनाली' म्हणणाऱ्या आमच्यासारख्या पुरोगाम्यांना दुखतंय, ते यासाठीच! "बहुजनांना खोटा इतिहास सांगणाऱ्याचं उदात्तीकरण तुमच्यासारख्याकडून अपेक्षित नाही." असं हे लोक का म्हणत आहेत, हे देखील एकदा सोनालीने समजून घेतलं पाहिजे. सोनाली स्वतः हे प्रकरण 'माझं वैयक्तिक मत' म्हणून सोडून नक्कीच देऊ शकते. मात्र, तिने हा सगळा परिप्रेक्ष समजून न घेता अशी पोस्ट कशी बरं टाकली, असा या लोकांचा संतापी आग्रह आहे, जो माझाही आहे. तोच सत्यजित तांबेनाही लागू आहे.

सत्यजित तांबेनी आपल्या लहानपणातील आठवणींशी पुरंदरेंना जोडून सदिच्छा दिल्या आहेत. लहानपणी त्यांना कशा थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची आवड होती आणि त्यातून बाबासाहेबांनी आवडीने त्यांचे नाव 'सर्जेराव' कसे ठेवले होते, याचा किस्सा त्यांनी सांगितलाय. सोबत 'सर्जेराव' लिहून दिलेला फोटोही जोडलाय. अगदी परवाच राहुल गांधींनी स्पष्ट विधान केलंय की, ज्या लोकांना भाजप-आरएसएसची भीती वाटते, त्यांनी खुशाल काँग्रेस सोडावी. मात्र आरएसएस माइंडेड लोकांनी पक्षातून बाहेर व्हावं! राहुल गांधींनी दिलेली ही तंबी तांबेच्या ट्रोलिंगमागेही उभी होती, असं म्हणायला पुरेसा वाव आहे.

जी लहानपणीची आठवण तांबेंची तीच सोनालीचीही! सोनाली सांगते त्याप्रमाणे ती लहानपणापासूनच बाबासाहेबांची चाहती आहे. तिने तिच्या लहान भावासोबत डबल सीट जाऊन त्यांचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. आणि त्यांचं जे वर्णन आहे शिवइतिहासांचं, ते तिला भावलेले होतं. ते तिच्या मनावर कोरलेलं आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे तो मोठापणा तिने दिलेला असू शकतो. ती याआधी देखील खूपदा त्यांच्याविषयी बोललेली आहे, पोस्ट केली आहे, हे वास्तव आहे.

Blog: पुरोगामी 'सर्जेरावां'ना वजाबाक्यांची बाई खुपच घाई...
राजर्षी शाहू महाराजांना पत्र!

मात्र, ज्यांनी पुरोगामी म्हणवत सोनालीला ट्रोल केलं, त्यांचं सगळंच बरोबर आहे, असंही मला बिलकुल वाटत नाही. आरएसएस-भाजपने आणलेली 'पोलरायझेशन'ची संस्कृती आता पुरोगाम्यांच्याही अंगवळणी पडल्याचं हे चित्र आहे. म्हणजे काय? एकतर तुम्ही या बाजूचे किंवा त्यांचेच! तुम्ही एकतर पांढरे किंवा मग काळेच! 'आम्ही' नाहीतर मग 'ते' हाच आता सगळ्या सामाजिक वादविवादासाठीचा अलिखित नियम बनलाय. आरएसएस-भाजपने आणलेल्या या संस्कृतीच्या ट्रॅपमध्ये जेंव्हा नकळतपणे पुरोगामी देखील अडकतात तेंव्हा, वाईट वाटतं!

पुरोगामी 'माणसं' नसतात, त्या माणसांच्या 'भूमिका' पुरोगामी असतात. कोणत्या संदर्भात माणूस कोणती भूमिका कशी घेतो, यावरून पुरोगामीत्व ठरवलं गेलं पाहिजे. 'पुरंदरेंचा' शिवाजी मान्य असणारी सोनाली दाभोलकरांची 'अंनिस कार्यकर्ती' नसलीच पाहिजे, या दोन वेगवेगळ्या भूमिकांबाबतचा निकाल फारच वरवरचा आहे. कारण, सोनाली प्रकरण बाजूला ठेऊन विचार केला तर, सगळ्या पुरोगाम्यांच्या भुमिका साचेबद्ध आणि एकसारख्याच असण्याचा अट्टहास हल्ली वाढलेला दिसून येतोय. कुठेही काहीही 'ग्रे' शेडमध्ये अथवा वेगळ्या रंगात बघण्याची आपली क्षमताच कमी झालेली आहे. या वादाला 'खरीखुरी' किनार जातीची सुद्धा आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. सोनाली कुलकर्णी 'ब्राह्मण' आहे, पुरंदरे ब्राह्मण आहेत आणि तुम्ही ब्राह्मणी इतिहासाला चालना देताय? असं सहजसोपा निकाल लगेच देता येतो, अनेकांनी तो दिलाय, जो मला अमान्य आहे.

पण असं करण्याने यातील मुळात असलेला 'शिवाजी महाराजांच्या इतिहास सत्यशोधनाचा' भाग मात्र, सुमडीत बाजूला राहतो. हे कधीतरी समजून घ्यायची गरज आहे की, जेंव्हा इथल्या सत्यशोधक चळवळीचा मुळ गाभा हा 'सत्यशोधन' न राहता तो जेंव्हा 'ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर' या वादात अडकला तेंव्हापासून तिचं खरं पतन झालेलं आहे. त्याअर्थी दाभोलकर-पानसरे हे किमान आपल्या परिने सत्यशोधनाची परंपरा पुढे न्यायचा प्रयत्न करत होते. त्यांनाही हे सगळं सहन करावं लागलेलंच आहे.

आता यात गंमत अशीय की, सोनाली यानंतर प्रतिक्रिया म्हणून काहीही बोलली तरी अडचण तिची होणारच आहे, हे निश्चित!

कारण सोनालीच्या निमित्ताने त्यामागचा खरा विषय आहे तो समजून घेण्यात कुणाला इंटरेस्ट नाहीये. याचं कारण म्हणजे तो अंगभूतच जटील प्रश्न आहे. या जटील प्रश्नाच्या मुळातच जायचं असेल तर त्याची पातळी एवढ्या खाली आणून चालणार नाही,

कारण 'लोकांनी या खऱ्या इतिहासाच्या विषयावर विचार करावा' हा तुमचा उद्देश आहे की पोलरायझेन करणं हा तुमचा उद्देश आहे? ही खरी यामागची मेख आहे.

परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारे पुरोगामी बांधव जेंव्हा साचेबद्धपणे एखाद्याला 'काळ्या' यादीत ढकलतात तेंव्हा वाईट वाटतं. सोनालीबाबत आता हेच होणं दुःखदायक आहे. बाबासाहेब पुरंदरेंना मानणारी सोनाली आता एका पोस्टमुळे 'बादच' करून टाकायची का? हा प्रश्न आता शिल्लक आहे आणि तो मला म्हत्वाचाही वाटतो. एका पोस्टमुळे तिचा डॉ. दाभोलकरांवर असलेला विश्वास आणि त्यांच्या मुल्यांवर असलेली श्रद्धा कमी होते, अस मला अजिबातच वाटत नाही. ती स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाची कार्यकर्ती म्हणून अभिमानाने मिरवते आणि नुसतं मिरवत नाही तर ती काम देखील करते. 'सोनी हिंदी' सारखं मोठं हिंदी चॅनेल सध्या सोनालीला घेऊन 'क्राईम पेट्रोलच्या' माध्यमातून २५ एपिसोड्स हे अंधश्रद्धा निर्मूलनच्या विषयावर करत आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचं मी मानतो! हे अगदी अलीकडचे उदाहरण आहे. त्यामुळे तिला बादच करण्याची घाई केली जाऊ नये, अस मला प्रामाणिकपणे वाटतं.

ज्या अंनिस कार्यकर्त्यांची सोनालीच्या पोस्टमुळे निराशा झाली त्यांनी दाभोलकरांचं हे वक्तव्य नक्की आठवावं की, एखाद्याने विचारपूर्वक परिवर्तन स्वीकारायचे ठरवून आधी वर्षाला 10 होणारे सत्यनारायण हळूहळू बंद करत आता वर्षाला 2 दा घालत आणले असतील, तर तोही आपला मित्रच आहे. दोनदा का घातला जातोय? अशा उष्ण वारांनी आपला परिवर्तनातला मित्रांना शत्रू करायचं का? आपण प्रकाशाने उजळवणारी माणसे आहोत की उष्णतेने जाळणारी?

आ.ह. साळुंखेंच्या शब्दात सांगायचं झालं तर, अग्नीची दाहकता घेऊन क्रांती करू पाहणारे कार्यकर्ते अनेकदा आपली दाहकता काय जाळण्यासाठी आहे हेच विसरून बसतात. आपल्याच माणसावर 'कसा जाळ काढला' असं छाती फुगवून घोषित करतांना त्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून येतो. याचा अर्थ चिकित्सा करायची नाही असं नाही, मात्र मतभेद व्यक्त करणं वेगळं आणि जाळच काढणं वा जाळून टाकणं वेगळं! माफ करा, मात्र स्वतःपेक्षा परिवर्तनाच्या ध्येयावर अधिक निष्ठा असलेली माणसं असं करीत नसतात.

- विनायक होगाडे | vinayakshogade@gmail.com | 9011560460

(ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत. 'सकाळ माध्यम समूह' त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com