व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप : क्षेत्रभेटीचा एक अनोखा असा आभासी अनुभव !

Vertual
Vertual

"क्षेत्रभेट' हा शालेय अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाचा घटक आहे. खासकरून विज्ञान, इतिहास व भूगोल या विषयांसंबंधी एखाद्या ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विविध क्षेत्रभेटीचं आयोजन केलं जातं. उदाहरणार्थ साखर कारखाना, एखादं प्रसिद्ध उद्यान, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, एखादं निसर्गानं समृद्ध असणारं ठिकाण, भाजी मंडई आदी ठिकाणी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जातात व तेथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देतात. 

प्रत्यक्ष अनुभवातून दिलं जाणारं शिक्षण हे चिरकाल स्मरणात राहतं, पण आजच्या या ऑनलाइन शिक्षणाच्या जमान्यामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटीला एक पर्याय म्हणून व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपकडे पाहता येईल. प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ऐवजी आपण "व्हर्च्युअली' अर्थात "आभासी' क्षेत्रभेट करू शकतो. शाळेतील सृजनशील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपचा अनोखा अनुभव देऊन त्यांचं ज्ञान व अनुभव समृद्ध करू शकतात. 

स्काईप, व्हॉट्‌सऍप, फेसबुक लाईव्ह, मायक्रोसॉफ्ट टीम, गूगल मीट यापैकी कोणत्याही ऍप्लिकेशनचा उपयोग करून आपण व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप करू शकतो. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप आयोजित करायची असेल तर प्रथम क्षेत्रभेटीचं ठिकाण ठरवून तेथे संबंधित मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींस, शिक्षकांस तयार राहण्यास सांगण्यात येतं. वेळ ठरवून स्काईप, गूगल मीट यांसारख्या वर सांगितलेल्यांपैकी कोणत्याही एका ऍप्लिकेशनवरती सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगावं. ज्याप्रमाणं प्रत्यक्ष क्षेत्रभेट करताना विद्यार्थी अनुभव घेतो, जे प्रश्न त्याला पडतात ते विचारतो आणि आपल्याला आवश्‍यक असणारं ज्ञान मिळवतो अगदी तसंच या ठिकाणी सुद्धा व्हर्च्युअली विचारू शकतो. 

व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपमुळं आपल्याला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कोठेही घेऊन जाण्याची आवश्‍यकता नसते. आपण एखाद्या वर्गामध्येच बसून प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याचा अनुभव मिळू शकतो. त्यामुळं प्रवासाचा खर्च वाचतो, प्रवासादरम्यान हवामानात होणाऱ्या बदलामुळं मुलांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात, त्या उद्भवण्याची शक्‍यता नसते. तसंच प्रवासासाठी आवश्‍यक असणारी तयारी करण्याचीही गरज नसते. फरक फक्त इतकाच असतो की प्रत्यक्ष डोळ्यांनी एखाद्या गोष्टीचा अनुभव घेण्याऐवजी समोर असणाऱ्या व्यक्तीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्‍यांना आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा प्रोजेक्‍टरवर दाखवून अनुभव देण्यात येतो. 

व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपची ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये माझा मित्र रणजितसिंह डिसले व विजयकुमार वसंतपुरे यांनी पहिल्यांदा राबवली. सोलापुरातील भुईकोट किल्ला, सोलापूर विज्ञान केंद्र, डायनॉसोर पार्क ठिकाणं इतर शाळांतील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या माध्यमातून दाखवली. पण आता अनेक शिक्षक अशा विविध व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप्स आयोजित करत आहेत आणि मुलांना एका ठिकाणीच बसून देश - परदेशांच्या सफरींचा अनोखा अनुभव देत आहेत. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com