उपासना कशाची करायची ? 

राजेंद्र घोरपडे 
गुरुवार, 19 मार्च 2020

जीवनाचा मुख्य उद्देश हा आहे हे विचारात घेऊन कार्य करायला हवे. संसारात राहूनच परमार्थाचे कार्य गाठता येते. कारण संसाराची निर्मितीच मुळात तो उद्देश साध्य करण्यासाठी आधार म्हणून झालेली आहे. त्यामुळेच संसार हा होत असतो पण परमार्थ मात्र आपणास करावा लागतो.

म्हणौनि आपणपां विश्‍व देखिजें । आणि आपण विश्‍व होईजें । 
ऐसें साम्यचि एक उपासिजें । पांडवा गा ।। 409 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 6 वा 

ओवीचा अर्थ - म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावें आणि आपण जगत्‌ व्हावें, अशा एका साम्याचीच हे अर्जुना, तूं उपासना कर. 

जग बदलते आहे. विकास होतो आहे. पण हा विकास भौतिक विकास आहे. बाह्य विकास आहे. हा विकास हा काळानुरुप होतच राहाणार. त्यात बदल हा होतच राहाणार आणि त्या विकासानुसार आपणे जीवन हे बदलतच राहाणार. तो बदल हा आपणास स्विकारावाच लागणार. बाह्य अन्‌ अंतरंगातील विकास आपण समजून घ्यायला हवा. म्हणजेच संसार आणि परमार्थामधील फरक आपल्या लक्षात येईल. संसार हा बाह्यरंगातील विकास आहे आणि परमार्थ हा अंतरंगातील विकास आहे. मग जगात आपण कशासाठी आलो याचाही विचार करायला हवा. आपल्या जन्माचा उद्देश काय हेही समजून घ्यायला हवे. जगण्यासाठी संसाराची आवश्‍यकता आहे. आपणास जीवन व्यवस्थित जगता यावे, यासाठी संसाराची व्यवस्था उभी राहिली आहे. हे समजून घ्यायला हवे. आता संसारात काही नियम आहेत. ते संसार व्यवस्थित व्हावा. सुखी-समाधानी व्हावा यासाठी आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.

या संसारात गुंतून न पडता आपण अंतरंगाच्याही विकासाचा विचार करायला हवा. म्हणजेच स्वतःच्या व्यक्तिगत विकासाचा विचारही करायला हवा. जीवनाचा मुख्य उद्देश हा आहे हे विचारात घेऊन कार्य करायला हवे. संसारात राहूनच परमार्थाचे कार्य गाठता येते. कारण संसाराची निर्मितीच मुळात तो उद्देश साध्य करण्यासाठी आधार म्हणून झालेली आहे. त्यामुळेच संसार हा होत असतो पण परमार्थ मात्र आपणास करावा लागतो. जीवनाचा अर्थ शोधावा लागतो. या जगात आपण एकटे नाही तर हे जग म्हणजेच आपण आहोत. आपल्या ठिकाणी हे जग पाहायला शिकायचे आहे. म्हणजेच आपण आपली स्वतःची ओळख करून घ्यायची आहे व ही ओळख झाल्यानंतर त्याचेच स्मरण निरंतर ठेवायचे आहे.

मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे आत्मा. मी म्हणजे सो ऽ हम. मी म्हणजे श्‍वास. श्‍वास आपण एका नाकपुडीतून आत घेतो. अन्‌ दुसऱ्या नाकपुडीतून सोडतो. पण यावर नियंत्रण ठेवायचे आहे. येथे साम्यावस्था साधायची आहे. दोन्ही नाकपुडीतून श्‍वास आत घ्यायचा आहे, अन्‌ दोन्हीतूनच तो श्‍वास बाहेर सोडायचा आहे. ही साम्यावस्था साधायची आहे. जीवनातील हा मुख्य उद्देश आपणास गाठायचा आहे. ही उपासना आपणास करायची आहे. म्हणजेच आपणास या विश्‍वाचे आर्त सद्‌गुरुकृपेने समजू शकेल. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल.  

 
 

टॅग्स

इतर ब्लॉग्स