टोळधाड म्हणजे काय? ती कशी रोखावी?

टोळधाड म्हणजे काय? ती कशी रोखावी?

टोळ ही अर्थपटेरा या श्रेणीतील कीड असून वाळवंटी टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय स्तरावरील घातक कीड आहे. टोळ मोठ्या संख्येने एका देशांतून दुसऱ्या देशात जातात. टोळधाड येण्यापूर्वीचा पिकाचा हिरवागार परिसर टोळधाड होऊन गेल्यानंतर ओसाड आणि उजाड होतो. इतके हे नुकसान करतात. विशेषतः तांबूस रंगाच्या अवस्थेतील टोळ अतिशय नुकसानकारक असतात. एका टोळधाडीत लाखो टोळ असतात. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होते. ते वालुकामय प्रदेशात राहतात. भारत-पाकिस्तान, अफगानिस्तान, अरेबिया, इराक आणि आफ्रिकेतील देशात यांची उत्पत्ती चालू असते. ही उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाल्यास मोठ्या संख्येने खाद्याच्या शोधात भ्रमण करतात. याला धाडीचे स्वरूप येते. 

भारतात टोळधाडी आल्याचे पुरातन काळापासून नमूद झाले आहे. पावसाळ्यानंतर पाकिस्तानातून राजस्थानच्या वाळवंटी भागात शिरतात व तेथे त्यांची उत्पत्ती वाढते. नंतर थवे तयार होऊन या टोळधाड राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या उत्तर भागात पसरतात. महाराष्ट्रात 1960 ला टोळधाड येऊन गेली. त्यानंतर याबाबत सूचना आल्या, परंतु प्रत्यक्ष टोळधाड आली नाही. टोळधाडीत दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूप कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीला एकाकी असे म्हणतात. मात्र अनुकूल हवामान टोळांची संख्या पुष्कळ वाढते. त्यांचे थवे तयार होतात आणि त्यांना भ्रमण करावीशी वाटते. या स्थितीस थव्यायांची स्थिती असे म्हणतात. टोळ्यांच्या उत्पत्तीचे तीन हंगाम असतात. पहिला उन्हाळी हंगाम जानेवारी ते जून, दुसरा पावसाळी हंगाम जुलै ते ऑक्‍टोबर आणि तिसरा हिवाळी हंगाम नोव्हेंबर ते डिसेंबर. यातील उन्हाळी हंगामात टोळधाडी अचानक येतात आणि त्यांची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणावर होते. 

टोळांच्या जीवनात अंडी पिल्ले आणि प्रौढावस्था अशा तीन अवस्था असतात. 

अंडी अवस्था : यातील अंड्यांची अवस्था जमिनीत असते. टोळ्यांची मादी ओलसर रेताड जमिनीत 50 ते 100 अंडी पुंजक्‍या पुंजक्‍याने घालते. जमिनीत अंडी घातल्यानंतर त्यावर फेसाळ आणि चिकट पदार्थ टाकून अंड्यांचे बीळ बंद करून त्यांचे संरक्षण केले जाते. एकाकी अवस्थेत अंडी घातली जातात, परंतु थव्याच्या अवस्थेत टोळ मोठ्या प्रमाणावर एकत्र हलचाल करत असल्याने मोठ्या प्रमाणावर अंडी घातलेली दिसतात. अंडी साधारणपणे दोन ते चार आठवड्यांनी फूटून त्यातून पिल्ले बाहेर पडतात. जमिनीतील ओलावा आणि हवेतील उष्णतामान यावर अंड्यांच्या अवस्थेचा काळ अवलंबून असतो. 

पिल्ल्या अवस्था ः अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान टोळांना पंख फुटलेले नसतात. थव्यांच्या अवस्थेतील टोळ्यांची पिल्ले काळसर रंगाची असतात आणि त्यांच्या मध्यावर एक पुसट रंगाचा पट्टा असतो. एकाकी अवस्थेतील टोळांची पिल्ले हिरव्या रंगाची असून त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात. लहान टोळ वाढत असताना तीन ते पाच दिवसांच्या अंतराने पाच वेळा कात टाकतात. या वाढीच्या काळातच त्यांना पंख फुटतात. टोळाची ही बाल्यावस्था चार ते सहा आठवडे राहते. ही कालमर्यादा हवामानाप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्ध खाद्याप्रमाणेप्रमाणे बदलत असते. टोळाची सर्व पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेत येणाऱ्या वनस्पतींचा फडशा पाडत पुढे सरकतात. अशाप्रकारे थवे सरकत असताना सायंकाळ झाल्यावर झाडाझुडपात वस्ती करून राहतात. 

प्रौढ अवस्थाः पूर्ण वाढलेल्या थव्याच्या स्थितीला ढौ टोळ म्हणतात. ते प्रथम तांबूस रंगाचे असतात. त्यांचे पंख लांबट व कातड्यासारखे चिवट असतात. या टोळाचा अंगात बरीच शक्ती असते व त्यांचे पाय ताकदवान असतात. त्यांचा चेहरा उग्र दिसतो त्यांची मान पाठीवरील असलेल्या ढालीसारखी भागात फिरत असते. तांबूस टोळधाड पिकांचे जास्तीत जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळधाड दूरवर उडत जात असल्यामुळे अशा टोळधाडीपासून फार मोठा धोका असतो. ही टोळधाड हवामानाप्रमाणे आणि वाऱ्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते.हे तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोचल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशा ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. 

नुकसानीचा प्रकार ः पिवळ्या टोळ्यांची धाड पिकांचे प्रत्यक्ष नुकसान करीत नाहीत. मात्र त्यांच्या असंख्य अंडी घालण्याच्या सवयीमुळे ते अधिकच हानीकारक ठरतात. आकाशात टोळ्यांचे थवे 12 ते 16 किलोमीटर वेगाने उडतात. सायंकाळी हवा थंड झाल्यावर ती शेतातील पिकावर आणि झाडाझुडपांचा वर बसतात. रात्री हवा जास्तच थंड असल्यास ती झाडांच्या फांद्यावर आश्रयासाठी राहतात. सकाळी ऊन पडल्यानंतर हवेतील उष्णतामान वाढल्यानंतर टोळ उडून हा थवा दुसरीकडे निघून जातो. टोळांची सर्व पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेतील वनस्पतीचा फडशा पाडतात व पुढे सरकतात. टोळ हिरवी पाने फुले फळे फांद्या व पालवी आदींचा फडशा पाडत असतात. एका दिवसात त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ तीन हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा सहा ते आठ पटीने जास्त खातात. 
आर्थिक नुकसानीची पातळीः 
10000 प्रौढ / हेक्‍टर 
5 ते 6 पिल्ले/ झुडूप 

टोळ्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना ः 
टोळ्यांच्या नियंत्रणासाठी टोळ्यांची अंडी पिल्ले व पौढ या सर्व अवस्थांचा नाश करणे हा आहे. 
1. टोळ्यांच्या अंड्यांचा नाश ः 
पिवळ्या रंगांच्या टोळ्यांची टोळधाड जेथे बसली असेल किंवा टोळ्यांनी ज्या ठिकाणी अंडी घातली असतील अशा जागा शोधून काढाव्यात आशा जागांच्या भोवताली चर खणून अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना घेरावे. अंडी घातलेली जागा नांगरून अगर खणून अंड्यांचा नाश करावा. 

2. लहान टोळांचा नाश ः 
जेथे पिवळ्या रंगाची व धाड उतरली होती, अशा ठिकाणावर सक्त नजर ठेवून लहान टोळबाहेर पडल्यावर त्यांचा नाश करावा. या टोळ्यांची सवय थव्याने एका दिशेला पळत जाण्याची आहे. पुढे येणाऱ्या या त्यांच्या मार्गावर 60 सेंटिमीटर रुंद व 75 सेंटी मीटर खोल असे चर खणून त्यात या पिल्लांना पकडता येते. या टोळांना मारण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग प्रभावी होतो. 

3. टोळधाडीचे नियंत्रण ः 
मोठ्या टोळधाडीचा विस्तार पाचशे चौरस किलोमीटर पर्यंत असू शकतो. आशा टोळधाडीची सूचना मिळताच टोळधाड उतरणार नाही अशी तयारी करावी. डबे वाजवून आवाज करणे पांढरी फडकी हलविणे धूर करणे या उपायांनी टोळधाडीस खाली उतरू देऊ नये अर्थात हा उपाय प्रभावी ठरेल असे नाही. टोळ जेथे विश्रांती घेत असतील तेथे आग ओकणाऱ्या पंपाच्या सहाय्याने त्यांना जाळून नष्ट करता येते. कडुनिंबाच्या निंबोळीयांची पावडर पाण्यात मिसळून झाडावर फवारल्यास टोळ त्या झाडावर उपजीविका करू शकत नाहीत. 

मिथिल पॅराथिऑन 2% भुकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी टरी धुरळावी. 
विषारी आमिष याचा वापर करून किडाचे नियंत्रण मिळवू शकतो. 
क्‍लोरोपायरीफॉस 20 एसी 1200 ग्रॅम व 50 ईसी 500 ग्रॅम, डेल्टामेथ्रीन 2.8 यु एल व्ही 500 ग्रॅंम, डायफलूबेंझुरॉंन 250 ग्रॅम, लॅंमबडा सायहॅंलोन्‌ी 5 ईसी 400 मिली, मॅंलीथॉंन 50 ईसी 1850 मिली प्रति हेक्‍टर या किटकनाशकाची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलीकडेच केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केलेली आहे. शक्‍य त्या सर्व उपायांनी अगदी थोड्या अवधीत मोहीम राबवून त्यांचा नाश केल्यास आपण निश्‍चितच नियंत्रण मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com