आणखी 'पांडुरंग' गमवायचे नाहीत !

सायली नलवडे कवीटकर
Friday, 4 September 2020

दोन महिन्यांपूर्वी कसब्यातील एक रुग्ण केवळ रुग्णवाहिनीची वाट पाहत रस्त्यावर बसल्या जागी गेला. यानंतर प्रशासनाने रुग्णवाहिकांच्या तुटवड्यावर काय उपाय शोधला? आता महापालिका पांडुरंग रायकरच्या मृत्यूचा अहवाल कागदोपत्री रंगवतेय, पण मुद्दा हा आहे की, पुण्यासारख्या मेट्रो सिटीत रुग्णवाहिका मिळत नाही. गेल्या पाच महिन्यांच्या मोठ्या काळात प्रशासकीय यंत्रणा काहीच शिकली नाही का?

पाडुरंग जाऊन तिसरा दिवस उजाडलाय, तरी मनातील हुरुहुरू संपत नाहीय, ना की भीती जातेय! भीती स्वतःला कोरोना होईल का याची नाही, तर अजून कोणी आपला सहकारी, मित्र हा कोरोना आपल्यापासून हिरावून तर नेणार नाही ना? या विचाराने मनाला यातना होतायत.

कोरोनामुळे कोणाचाच जीव जाऊ नये, यासाठी शिकस्तीचे प्रयत्न यंत्रणांनी करावेत, त्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभारली जावी. कोरोना स्थितीचे रिपोर्टिंग करणे असो वा कोरोना परिस्थीतीचे ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून अनेक पत्रकार, कॅमेरामन, छायाचित्रकार प्रयत्नरत आहेत. कशाची पर्वा न करता हे पत्रकार हॉटस्पॉटपासून वैद्यकीय उपचार होणाऱ्या कोव्हिड सेंटरपर्यंत प्रत्येक अपडेट नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. का तर रुग्णांच्या उपचारामध्ये कुचराई होऊ नये, म्हणून रिपोर्टिंग केलं जातंय, हे प्रत्येकानं लक्षात पाहिजे. या कोरोनाच्या बातम्यांनी केवळ जागरूकता निर्माण होती आहे. ना की मीडिया हाउसचा टीआरपी वाढतोय. एकीकडे सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे, प्रत्येक अधिकारी कर्मचारी काम करतोय, त्याचा आदर आहेच. पण त्यांना काय झालं तर त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारने मोठे आकडे जाहीर केलेत. पण, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वपूर्ण घटक असलेल्या पत्रकारांना उपचारदेखील मिळत नाहीयेत, हे दुर्दैव म्हणावं लागेल. सामान्यांची तऱ्हा तर याहीपेक्षा बिकट. या परिस्थितीला जबाबदार कोण?

पांडुरंगचा मृत्यू केवळ योग्य उपचार न मिळाल्याने झाला, हे सत्य आता कोणीच नाकारू शकत नाही. दोन महिन्यांपूर्वी कसब्यातील एक रुग्ण केवळ रुग्णवाहिनीची वाट पाहत रस्त्यावर बसल्या जागी गेला. यानंतर प्रशासनाने रुग्णवाहिकांच्या तुटवड्यावर काय उपाय शोधला? आता महापालिका पांडुरंग रायकरच्या मृत्यूचा अहवाल कागदोपत्री रंगवतेय, पण मुद्दा हा आहे की, पुण्यासारख्या मेट्रो सिटीत रुग्णवाहिका मिळत नाही. गेल्या पाच महिन्यांच्या मोठ्या काळात प्रशासकीय यंत्रणा काहीच शिकली नाही का? की 'दुष्काळ आवडे'प्रमाणे 'कोरोना आवडे सर्वांना' ही स्थिती आहे? संकटातील 'वेगळीच संधी' तर यंत्रणा शोधत नसतील ना? हाही प्रश्न डोकावतोच!

जेव्हा एखादा पत्रकार आणि त्याचे सहकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा ते केवळ समाजासाठीच उतरतात, याची जाणीव या समाजाला नाही का? हेदेखील शंका मनात उपस्थित होते आहेत. कारण, गेल्या पाच महिन्यांत स्वतःच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा चमकोपणा करणारे सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि स्वयंघोषित कोरोनायोद्धे खूप झाले. त्यांनी अनेकदा पांडुरंगाला टीव्हीवर झळकण्यासाठी कॉल केले असतील. पण, तो गेल्यावर एकही जण त्या कोव्हिड सेंटर बाहेर अगतिक झालेल्या त्याच्या बायको आणि बहिणीला आधार द्यायला आला नाही. हेही अस्वस्थ करणारं आहे.

पाडुरंग एकटा तर गेला, पण त्याचं कुटूंब संपलंय. कित्येक नाती पोरकी झालीत. त्या कुटुंबातील सगळे मनाने आयुष्यभर सावरू शकणार नाहीत. पांडुरंगच्या जाण्याने मनात विचाराचं काहूर माजलं. त्यात महत्वाचा विचार मनात येतो, तो म्हणजे अशा परिस्थितीला आणखी कोणी सहकारी सामोरा जाऊ नये. ही वेळ पुन्हा नको. पण, करणार काय? का यंत्रणा हालत नाही? का मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितावर दाखल होत नाही? कोणत्या अदृश्य शक्ती आहेत, की त्या या भोंगळ कारभाराला पाठीशी घालत आहे? सगळं अलबेल आहे. अंधारून आलंय फक्त मनात इतकंच वाटतंय, पुन्हा आता कोणताच पांडुरंग गमवायच नाही !

इतर ब्लॉग्स