कागद म्हातारा होताना...

when the paper is getting old article in kolhapur marathi news
when the paper is getting old article in kolhapur marathi news

कागदावरचा वाळवंटी प्रवास- प्रश्‍नचिन्हांच्या सावल्यांतून असतो... सावली आहे, म्हणून रेंगाळूनही चालत नाही. 
कागद तसाच असतो; शुभ्र, रिकामा. 
नांगरून ठेवलेली जमीन. 
काय असतं मुठीत? बी. आपसूक घरंगळत स्वतःला खोलवर झोकून देणारं! किंवा मुठीत असतो वीतभर आकाशाचा तुकडा. 
जमीन भिजवणारा. निळ्या शाईचं माहेरपण. 
प्रत्येक कोरा कागद समोर आला... की तानपुऱ्याच्या तारा जुळविणारी बोटे दिसू लागतात... चुलीखालच्या निखाऱ्याला फुंकणीतून फुंकर घालणारी आई दिसते, फांदीच्या टोकाशी येऊन अचंबित झालेलं चिमणीचं पिलू दिसतं, रेल्वेच्या फलाटावर अंग मुडपून झोपलेले, तळपायाच्या भेगांनी दुःख जागे ठेवलेले अश्राप जीव दिसतात... 
कशी उतरेल या साऱ्यांची जगण्याची जिद्द? वेदना? कारुण्य? 
कागदावर उमटत जातं ते प्रत्येक स्पंदन- मनात कोण रुजवून जातं? 
कागदाच्या अंगावरचे शब्द. म्हणजे गोंदण. सुईच्या वेदनांचे. 
पापण्यांत डोकावणारे. टच्‌कन थेंब आणणारे. नक्षीदार नंतर. पण आधी? 
तो तर अंतःस्थ वेदनेचा प्रवास. 
नांगरून ठेवलेल्या जमिनीवर अजूनही, भेगा दिसत जातात... 
तळपायाच्या वेड्यावाकड्या खोल भेगा या नांगरटीमागे दडून असतात. 
कागद- मुकेपणाने टिपत जातो... अक्षरांचे गोंदण मिरवतो नंतर... 
लिहिणाऱ्या हातातून झरझर उतरणारी शब्दांची रांग... 
न दिसणाऱ्या भेगांमध्ये हरवून जाते... कधीतरी आभाळ गच्च भरून, 
उमलून येईल नवं काही... ही जिद्द कागद स्वीकारतो. केवळ स्वीकारतो... त्याचं काहीच म्हणणं नसतं! 
बोटांमध्ये फक्त लेखणी धरून लिहिता येते?
आठवलेल्या, साठवलेल्या बियांना कधी लपवता येते? 
आभाळाच्या तुकड्यातून येणाऱ्या थेंबांना आपले मार्ग सापडतच जातात. 
एकापाठोपाठ येणारे हे उमाळे. आडव्या आडव्या ओळींनी, 
नांगरलेल्या जमिनीवर स्वतःला, आपणहून पेरून घेतात...
कागद तरीही ओला होत नाही. 
कागद म्हणजे वाळवंट. कशाचाही ठिपका नसतो. अमर्याद आव्हान बनून पसरलेला. स्तब्ध. आकार फक्त. 
कसं पेलणार हे वाळवंट? प्रवास तर करायचाच. अनेक वाळवंटं, 
सामोरी आहेत. पाऊल टाकताना दिशाही नसते नेमकी. 
चटके नसतात... पण तहान असते... पावलापावलांवर तळपाय भाजू लागतात... पुढं... आणि पुढं सरकत जातो प्रवास. उमटलेली पावलं वळून बघण्याचंही भान शिल्लक राहतं का? 
कुठं होतो? कोणत्या दिशेला? आलो कुठं? कुठंपर्यंत जायचं? 
या प्रश्‍नचिन्हांच्या सोबतीनं शब्दांचा काफिला सरकत जातो. 
वाळवंटावर एक पावलांची लय क्षितिजाआड होते एवढेच! 
अशा कठीण- अवघड प्रवासात हिरवं भान जपणाऱ्या प्रवाशांची हमखास याद येते. शब्दांचे झुंबर अशाच वाळवंटात चमकावे त्यांनी? 
ते कवी, लेखक वाळवंटात साथीला येतात... 
काहींचे ठसे वाळूच्या पापुद्य्राखाली. तर काहींचे मनाच्या वादळातही. 
मग लक्षात येतं. तहान नेमकी कशाची असते? हे वाळवंट नव्हेच. 
ही तर जमीन. ओलाव्याची तहान असलेली. पांढरी शुभ्र. उत्सुक. 
तिला स्पर्श हवाय. तिला शब्दांचं-भावनांचं-जगण्याचं शिंपण हवंय. 
ते विरून जाईल या प्रचंड पसाऱ्यात. पण तेच त्या जमिनीचं नांगरणं असेल. 
नांगरणं, माहेरपण. बालपण. तारुण्य आणि जगणं. 
कागदावरचं सगळं काल्पनिक नसतंच. कधीतरी- केव्हातरी या अक्षरांतून कोवळी पालवी हळुवार उमलते. वृक्षांचे स्वप्न बनून लिहिणारे हात, या पालवीचे जन्मदाते ठरतात. या प्रवासाची कहाणी उशिरा समजते इतरांना. 
हे असेच लिहिणे, असेच असते गाणे 
जरी नसले अश्रू असेच आहे रडणे 
का असे, तसे का, नका विचारू आता 
तो निघून गेला उत्तर देता देता ।। - रॉय किणीकर 
हा कागदावरचा वाळवंटी प्रवास - प्रश्‍नचिन्हांच्या सावल्यांतून असतो... 
सावली आहे, म्हणून रेंगाळूनही चालत नाही. उत्तर द्यावे लागते- थांबलात का? 
या प्रश्‍नाला! उत्तर न देताच, वाट तुडवावी लागते. 
मुठीतून सांडलेल्या बिया, सांडलेले आकाश हेच भविष्यात उत्तर देत असतात. 
कागद संवेदना टिपतो. शब्दांचे गोंदण वागवतो. 
मुठीतल्या बियांतून काय उगवेल किंवा उगवलं काय? याचा हिशोब 
कागद, जमीन, वाळवंट, प्रवासी कधीच करत नसतात... 
उतरलेल्या शब्दांनी, भावनांना रुजविलं असतच. शाई वाळून रंग बदलते, कदाचित हा कागदही जीर्ण-वृद्धत्वाकडे झुकतो... 
ज्यानं भावनांची वादळं, वेदनेचे उन्हाळे, आशेचे चार पावसाळे बघितलेले असतात... 
कागद तसाच शुभ्र-रिकामा नसतो. 
तो जगलेला. जागलेला. तळपाय असतो... गोंदवलेला. 
आनंदी. कृतार्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com