World Cancer Day : आधी मनातील कॅन्सर बरा करूया

world cancer day special story by dr pramod farande health news
world cancer day special story by dr pramod farande health news

कोल्हापूर :  मन आणि शरीर याचा जवळचा संबंध आहे. आपले विचार, भावभावना याचा शरीरावर परिणाम होत असतो. आपल्या मनातील विचाराद्वारे आपल्या शरीरातील पेशी कार्य करीत असतात. त्यामुळे आपल्या भावनांचे, विचारांचे प्रतिबिंब आपले शरीर, व्यक्तिमत्त्वात असते. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बर्नी सिगेल यांनी "जो जगावर प्रेम करतो मात्र स्वतः वर अन्याय करतो, अशा व्यक्तीला कॅन्सर होतो' असे म्हटले आहे. याचा अर्थ काय, तर कॅन्सर झालेली व्यक्ती ती ही स्वतःला नेहमी दुसऱ्याच्या चष्म्यातून बघत असते. स्वतःला काय हवे नव्हे किंवा स्वतःला काय आवडते, याच्यापेक्षा ती व्यक्ती इतरांचा जास्त विचार करत असते. सतत स्वतःला कमी लेखणे, स्वतःची इतरांशी तुलना करणे, एखादी गोष्ट साध्य झाली नाही, तर स्वतःला शिक्षा करणे, स्वतःची टीका, अवहेलना करणे, असे प्रकार आपण करत असतो, इतरांच्या मतावर आपण स्वत:ला चांगले किंवा वाईट आहोत, हे ठरवत असतो.

वास्तविक आपण इतरांवर किंवा कुटुंबावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं. इतरांची काळजी करताना किंवा इतरांची काळजी घेताना आपणही स्वतःच्या आयुष्याकडे बघावे. आपली काळजी घ्यावी, हे विसरून जातो. आपले जगणे समृद्ध आनंदी बनवण्याऐवजी आपण आपले जगणे भूतकाळातील कटू अनुभव आणि भविष्याची चिंता यात व्यतीत करतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा आहे  त्या क्षणात आपल्याला जगता आले पाहिजे मात्र आपण तसे न करता भूतकाळातील कटू अनुभवांना प्रसंगाना धरून ठेवतो. तो कटू अनुभव; दुख:द प्रसंग आपले दुःख नैराश्‍य अगतिकता चिडचिडेपणा वाढवतो त्यातून आपली नकारात्मक मानसिकता अधिक वाढीस लागते ही नकारात्मकता आपला कॅन्सर बरा करण्यास सर्वात मोठा अडथळा अथवा आपल शत्रु ठरतो. 


वस्तुस्थिती स्विकारा: 
आपण आपल्या नकारात्मक विचाराचे जागी सकारात्मक विचाराची पेरणी केल्यास आपल्या आजारा बरोबरच आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याचा निश्‍चित उपयोग होतो. कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये पहिला विचार येतो मलाच का ? मी कोणाचे वाईट केले ? माझ्याच वाट्याला हे का यावे ? या अनेक प्रश्नाने व्यक्ती चिंतित होते, दुःखी होते. आपल्याला कॅन्सर झालाय वस्तुथिती स्वीकारण्यास ती व्यक्ती तयार नसते किंवा त्याच्या मनातील भीती ही ती स्वीकारण्यास तयार नसते वास्तविक आपण प्रथमता वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे व यातून कसा मार्ग काढता येईल याचा सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण जी काही ही उपचार पद्धती घेणार आहोत त्याच्या चांगला परिणाम होण्यासाठी याचा सकारात्मक मानसिकतेचा उपयोग होतो. 


जगण्याचे मोटिव्ह शोधा: 
कॅन्सर रुग्णाने आपल्या जगण्याचे मोटिव्ह शोधले पाहिजे त्याची सतत उजळणी केली पाहिजे. हे मोटिव्ह आपल्याला जगण्याला अथवा आपल्या उपचार पद्धतीला मदत करेल. 


सेल्फ टॉक बदला 
कॅन्सर रुग्णाने स्वतःचा सेल्फ टॉक कडे लक्ष द्यायला हवे. सेल्फ टॉक हा नकरात्मक किंवा तणाव निर्माण करणारा असेल. तर आपण आनंददायी, प्रेरणादायी विचार विचाराकडे लक्ष नेले पाहिजे. कोणतेही यश-अपयश हे आधी मनामध्ये तयार होते. त्यामुळे सर्व सिध्दीचे कारण आधी मना करा रे प्रसन्न या उक्तीप्रमाणे मनाची ताकद ओळखून आपला आजार बरा करण्यासाठी अथवा आपल्या उपचार पद्धतीला साहाय्य करण्यासाठी आपली मानसिकता उपयुक्त ठरते. जगण्याची मानसिकता नसेल किंवा आपल्या आता सगळे संपले ही भावना आपल्या उपचार पद्धतीतील सर्वात मोठा अडथळा ठरते. 


स्वयंम प्रेरणा बना 
स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला काय वाटते याचा विचार करून उच्चार पद्धतीचा स्वीकार करावा. कॅन्सर ची लढाई ही स्वतः स्वतःला लढायची आहे, इतर फक्त आपल्याला फार तर मदत करू शकतात. त्यामुळे ही लढाई लढताना आपला आत्मविश्वास डळमळीत करू नका स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. आपण आपल्या जीवनाचे भविष्याचे निर्माते आहोत त्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारा स्वतः निर्णय घ्या. स्वत:च स्वत:ची प्रेरण बना. या आजारातून आपण बाहेर पडू हा विश्वास सतत स्वतःला देत चला. 


जीवनात आनंद पेरा: 
आनंददायी विचार, प्रेरणा या या आपल्याला जगण्यास उद्युक्त करतात. त्यामुळे आपल्या जगन आनंदी बनविले पाहिजे आनंदी जगणं हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे जीवना आनंद पेरला पाहिजे.त्यासाठी आपले बालपण आठवा.संगीत ऐकताना आपण नाच करायचो. याचा आपले वडीलधारे कौतुक करायाचे. आंनद मिळविण्याचा तो संगीत आणि नाचणे हे आपल्या आनंदाची नैसर्गिक पध्दत आहे.पण जसे जसे आपण मोठे होत जातो तसे नाचणे आपण विसरुन जातो. छंद किंवा ज्याद्वारे आपल्याला निखळ आनंद मिळतो. ते करा. जीवनाचा आनंदोत्सव करता आला पाहिजे. 


त्रास संपणार आहे : 
उपचार घेत असताना अनेकदा वेगवेगळे त्रास होतात. त्यामुळे आपण त्रस्त होते. हा त्रास आपला आत्मविश्वास कमी करतो. मात्र हा त्रास, वेदना कायमच्या आपल्या सोबत राहणारा नसतात. ते कधी ना कधी संपणार आहेत किबहुना संपत असतात. त्यामुळे उपचार घेताना होणाऱ्या त्रासाने विचलित होऊ नका त्रास हा संपणार आहे ही मानसिकता बाळगा 


स्वप्न बघा 
स्वप्न हे माणसाच्या जगण्याचे मोठे औषध आहे. त्यामुळे आजारावर उपचार घेताना आपण बरे झाल्यानंतर आपल्याला कसे वाटेल किती आनंद होईल याची अनुभूती उपचार घेत असताना घेत चला. ही अनुभूती आपल्याला उपचाराला मदत व जगण्याला प्रेरणा देत जाईल. 


भीती दूर करा : 
कॅन्सर म्हणजे मरण हा विचार आपली भीती वाढवतो. भीती, अगतिकता, ताण- तनाव, नैराश्‍य, चिडचिडेपणा, एकटेपणा स्वतः विषयीची चीड, भावनांचा कोंडमारा आपल्या कॅन्सर वाढीस कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या भावना आपल्या जीवनातून मनातून हद्दपार करणे आपल्या उपचारासाठी अधिक फायदेशीर ठरते 


योग्य आहार: 
योग्य सकस आहार आपण काय खातो आणि आपल्या भावना काय आहेत यावर मुख्यता आपले आरोग्य अवलंबून असते त्यामुळे कॅन्सर रुग्णांनी सकस आहाराबाबत दक्ष राहायला हवे. प्राणायाम, योगासने, ध्यान, योग्य व्यायमाची जोड द्यायला हवी. व्यायाम हा आपल्यातील सकारात्मक वाढवितो शिवाय आजार 40 टक्के बरा करतो. 


स्वतःवर प्रेम करा : 
आपण इतरांची काळजी घेताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो हे स्वतःवर प्रेम नसल्याचे लक्षण आहे. दुसऱ्याचं विचार करताना स्वतःचाही विचार केला पाहिजे. स्वतःवरत प्रेम केले पाहिज.आपला शरीराशी संवाद साधला पाहिजे. हा संवाद जिव्हाळ्याचा प्रेमाचा अस्थेचा वात्सल्याचा असावा. ज्या शरीराच्या सहाय्याने आपण मार्गक्रमण करत असतो त्या शरीराकडे मनाकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो. शरीराला प्रेमाची, वात्सल्याची भाषा समजते जी आपण लहानपणी आपल्याला कुठे इजा झाल्यास आईच्या कुशीत शिरल्यानंतर अनुभवलेली असते. त्यामुळे शरीरात ज्या भागात इजा झाली असेल किबहुना वेदना होत असतील त्या भागाकडे तिरस्काराने न पाहता प्रेमाने आईच्या मायेने पहा जगामध्ये अशक्‍य असं काही नसतं अशक्‍य हे आपल्या विचारात असतं त्यामुळे विचाराची ताकद, महत्व ओळखा.

जीवनात नकारात्मक विचार टाकून सकारात्मक विचार स्वीकारण्यात अशक्‍य किंवा अवघड वाटणारा कॅन्सर सारखा आजारही आपल्याला बरा होताना दिसेल. त्यासाठी गरज आहे ती आपल्या विचारांना जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याचा प्रवृत्त करण्याची. आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिल्यास आपल्या जगण्याचा अर्थ, जीवनाचे उद्दिष्ट सापडेल. त्यामुळे कॅन्सर म्हणजे मरण नव्हे, तर नवे जीवन जे आपल्या जीवनाचा स्तर उंचावणारे, जीवनाला अर्थ देणारे, जीवन कसे जगावे हे शिकवणारे असेल. त्यासाठी आधी मनातील कॅन्सर बरा करणे आवश्‍यक आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com