'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही!

'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही!

लोकशाहीचेच दुसरे नाव बंधुभाव आहे. लोकशाही हा शासनसंस्थेचा प्रकार नसून प्राथमिक दृष्टिने एकत्रित जीवनाची ती पद्धती आहे. आपल्या बांधवांबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्त्वतः स्वरूप असते. डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत. समाज बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्या लोकशाही कल्पनेत दिसून येते. लोकशाही हा जीवनाचा मार्ग असतो, असेच ते समजत असत. काही घटनात्मक हक्क मिळाल्याने लोकशाहीचा पाया तयार होत नसतो, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या लोकशाहीच्या कल्पनेमध्ये सामाजिकता आणि नीतिमत्ता हे दोन प्रमुख घटक होते.

२००७ सालच्या राष्ट्रकुलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली होती. त्यामागे, एक पार्श्वभूमी होती. फनिर्नंड माकोर्स या फिलीपिनमधल्या हुकूमशहाची २० वर्षांची सत्ता तिथल्या जनशक्ती क्रांतीदलाने उलथवून लावली, तेव्हा तिथल्या नव्या राष्ट्राध्यक्ष कोसाझोन अक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली १९८८ साली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. अस्तित्वात असलेल्या व नव्याने उदयास आलेल्या प्रजासत्ताक राज्याच्या तत्त्वपूर्ण नियमावलीची प्रतिष्ठना करणे हा या परिषदेचा हेतू होता. या परिषदेच्या कतार, दोहा येथे भरलेल्या सभेत लोकशाहीच्या हितार्थ राष्ट्रकुलाने पुढाकार घ्यावा याचा पुनरुच्चार झाला. पुढे १९९७ च्या सप्टेंबरमध्ये आंतर-लोकसभा संघटनेने लोकशाही मूल्याचा उद्घोष केला नि राष्ट्रकुलाला जागतिक लोकशाही दिन जाहीर करावा लागला.

लोकशाही हे एक सार्वत्रिक मूल्य आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होते व तो सार्वजनिक बंधने पाळीत मुक्तपणे आपले जीवन जगू शकतो. आपल्या हक्काची मागणी करीत असताना, नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले तर लोकशाही अखिल मानवतेला हितकारक ठरते. लोकसत्ताक राज्याला इंग्रजीत 'डेमोक्रसी' हा प्रतिशब्द आहे व तो ग्रीक शब्द 'डेमोज' म्हणजे लोकं आणि 'क्रेटीन' म्हणजे राज्य करणे, यावरून अप्रभ्रंशित झाला आहे. 

लोकांनीच राज्य करण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीकांनी सुरू केली होती. समानता आणि स्वातंत्र्याद्वारे सार्वजनिक जीवनात शांती पसरावी हा लोकशाहीचा हेतू असतो. त्यामुळे सार्वजनिक कामकाजात नागरिकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार लाभलेला असतो. मानवी हक्क अबाधित राखून, त्याचे संवर्धन करणे हे लोकशाहीचा तो मुख्य हेतू असतो. त्यासाठी लोकांना नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते. लिंग, जात, धर्म या सर्वापेक्षाही मानवता महान हेच लोकशाहीचे सूत्र असते. 

महिलांच्या सहभागाने तर लोकशाहीची शान वाढते. परंतु, लोकसंख्येत अर्धा वाटा असूनही जगातल्या लोकसभांत त्यांचा सहभाग अल्पसा आहे. तो वाढावा म्हणून देखील आजच्या दिवसाची जागृती आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे हा आजच्या दिवसाचा हेतू साध्य झाला तरच, अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे 'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, हे खरे ठरेल. लोकशाहीचे रूप सतत बदलत असते. तिची वाढ आपोआप होत नसते. लोकशाहीची वाढ योग्य दिशेने व योग्य पद्धतीने होण्यासाठी तिची मशागत करावी लागते. लोकशाही यशस्वी होणे आवश्यक असेल तर तिचा पाया चांगल्या सामाजिक संबंधावर अधारलेला पाहिजे. दारिद्र्य, निरक्षरता व जातिभेद लोकशाहीला धोकदायक असल्याचेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. 

आंतरराष्ट्रीय दिवस का साजरे केले जावेत?

लोकांना महत्वाच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती निर्माण करणे, जागतिक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्याचवेळी मानवतेने मिळवलेले यश त्यांच्या मनावर ठसवणे व ते साजरे करणे या सर्वांसाठी विशिष्ट आंतरराष्ट्रीय दिवस हे निमित्त ठरत असतात. हे आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र संघ स्थापन झाला त्याच्या आधीपासूनच साजरे होत आले आहेत. मात्र, जनजागृतीचे महत्वाचे साधन म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने या दिनविशेषांना आपलेसे केले आहे. आंतरराष्ट्रीय दिवसांच्या निमित्ताने, विशिष्ट थीम घेऊन तिच्याशी संबंधित कार्यक्रम व उपक्रम राबविण्याची संधी विविध कला क्षेत्रांतील लोकांना उपलब्ध होत असते. संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या विविध संस्था-संघटना यांच्याबरोबरच विविध देशांतील सरकारे व  नागरी संघटना, खासगी व सरकारी क्षेत्रे-शाळा-विद्यापीठे आणि सर्वसामान्य नागरिकही या दिवसांचा उपयोग जनजागृतीसाठी व त्यासंदर्भातील कृतिशीलता वाढविण्यासाठी करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com