दिल दा मामला..! 

संदीप प्रभाकर कुलकर्णी 
Sunday, 4 October 2020

जीवनाच्या पहिल्या श्‍वासापासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत अखंड आपली साथ-सोबत करणारा हा आपला मित्र. ‘तेरी मेरी यारी’ या न्यायानं आपण सर्वच जण जीवनशैलीत बदल करूयात. थोडं संयमानं वागूयात. असल्या-नसल्या सगळ्याच व्यसनांना टाटा - बाय बाय करून निरोगी दीर्घायुष्याची वाट जपूयात. सकाळच्या स्वच्छ हवेत, झाडाझुडपांच्या सान्निध्यात आपल्या मित्रालाही सक्षम - सबल करूयात. ये बात आखिर दिलसे जुडी है भाई...! 

आपण जेव्हा चालत-फिरत असतो, तेव्हा तर याची ड्युटी सुरू असतेच पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, तेव्हाही हा पठ्ठ्या तेवढ्याच तत्परतेनं काम करीत असतो. हो... मी आपल्या हृदयाबद्दल बोलतोय. मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा हा अवयव त्यामुळंच निर्मिकानं कडेकोट बंदोबस्तात ठेवलाय. हा ‘दिल दा मामला’ संपला की सगळेच संपले म्हणून समजा तुमच्यासाठी. नुकताच जागतिक हृदय दिन साजरा झाला. अखिल मानवजातीच्या हार्ट सिस्टीमला कार्यरत ठेवणाऱ्या त्या ईश्‍वराला आणि त्याचेच ‘मदतगार’ म्हणून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्डिओलॉजिस्ट वर्गाला शतशः धन्यवाद. 

वाऱ्याबरोबर सळसळ आवाज करीत अखंड आॅक्सिजन देणाऱ्या पिंपळवृक्षाचे पर्यावरण संतुलनात खूप महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे पिंपळवृक्षांची अधिकाधिक लागवड करण्याचा सल्ला अभ्यासकही देतात. या पिंपळाचं पान आणि हृदय म्हणजेच ‘दिल’ यांचा आकार सारखाच. हा एक योगायोगच. माणसाच्या जन्मापासून ‘हे’ बरोबर असते; पण त्याची ओळख आणि जाणीव तारुण्यात नक्की होते. तारुण्यापासूनच खरेतर हा ‘दिल दा मामला’ सुरू होतो. हिंदी सिनेमा आणि त्यांतील गाणी ऐकली तर ‘दिल’ सर्च केल्यानंतर लाखो गाणी नक्कीच स्क्रीनवर झळकतील. दिलाच्या आकारातल्या या पिंपळपानानं अगदी प्रत्येक पिढीवर वर्चस्व गाजवलं आहे. ‘आज भी, कल भी और परसो भी...’ असा हा प्रेमाचा प्रवास अंतापर्यंत निरंतर सुरूच असतो. 

हृदयाचे आरोग्य अबाधित राखण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांचीच. या हृदयाला छानसं आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी कोणी सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जातात. कुणाला गावाभोवतालच्या टेकड्या, डोंगर खुणावतात. कुणी सकाळी सकाळी सायकल घेऊन निघतो, तो थेट आठ-दहा किलोमीटर फिरून दमल्यावरच विश्रांती घेतो. नव्या दमाचे तरुण जीममध्ये जाऊन घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघतात. हे सगळे परिश्रम कशासाठी, तर हृदयाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून. हृदयाला नीटनेटकं ठेवण्यासाठी एकीकडे आपली धडपड सुरू असते, तर त्याचे श्रेय घेण्यासाठी तेलाचे डबेही पुढे सरसावलेले असतात. टीव्हीवर आपण हे पाहतोच की! इनके जवाँ दिल का राज... वगैरे वगैरे. हृदयाशी संबंधित आजारांवर नुसती नजर फिरवली तरी धस्स होतं. या छोट्याशा मित्रावर किती ही मोठी संकटं, असा विचार मनात नक्कीच येतो. 

जीवनाच्या पहिल्या श्‍वासापासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत अखंड आपली साथ-सोबत करणारा हा आपला मित्र. ‘तेरी मेरी यारी’ या न्यायानं आपण सर्वच जण जीवनशैलीत बदल करूयात. थोडं संयमानं वागूयात. असल्या-नसल्या सगळ्याच व्यसनांना टाटा - बाय बाय करून निरोगी दीर्घायुष्याची वाट जपूयात. सकाळच्या स्वच्छ हवेत, झाडाझुडपांच्या सान्निध्यात आपल्या मित्रालाही सक्षम - सबल करूयात. ये बात आखिर दिलसे जुडी है भाई...! 
 

इतर ब्लॉग्स