एक माणूस म्हणून स्त्रीच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी!

प्रा. पूनम गायकवाड (स्री चळवळीच्या अभ्यासक)
Sunday, 11 October 2020

कोरोना पॅनडॅमिकचा सर्व स्तरातील लोकांवर परिणाम झालेला आहे. सर्वत्रच भीतीचे सावट पसरले असून सर्वप्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये स्त्री वर्गाची पुरती वाट लागत असून असुरक्षितता, भीती, नैराश्य, अवस्थता या आणि अशा कारणामुळे झोपही लागत नाही. स्वाभाविकपणे मग स्त्रीला अकल्पनीय मानसिक आजाराच्या आव्हानांना तोंड देण्याशिवाय पर्याय उरत नाही.

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे सारेच कसे बदलून गेले आहे. जीवनशैलीपासून ते दैनंदिन व्यवहार पध्दतीतही बदल झालेत. या सर्व बदलाला सामोरे जाताना स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम झालाय किंवा होतो आहे तो फार भयानक आहे, असे म्हटले तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. लॉकडाउनमुळे सारे कुटुंब चारभिंतीत बंद झाले हे जरी काही दिवसांपुरतं आनंददायी होतं, परंतु कालातरांने चारभिंतीत बंद असणं हे अवघडल्यासारखे होऊन गेले. यात स्त्रियांची कमालीची मानसिक घुसमट झाली. 

लिंग समानता आणि महिला सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या 'यु एन वूमन'ने लॉकडाउनच्या काळातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना 'Shadow Pandemic' असे म्हटले आहे. म्हणजे या घटनांना साथरोग निर्बंधाच्या परिणामांची एक दृष्ट छाया, असे नक्कीच म्हणता येईल. WHO नुसार 'मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती- ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरित्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल. 'खरंतर या समर्पक व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभाव दिसून येतो. या व्याख्येतले घटक व प्रक्रियांकडे लक्षपूर्वक पाहता असे जाणवते, की यावर आनुवंशिक व परिस्थितीजन्य बाबींचा प्रभाव स्वाभाविकच असणार. याबरोबरच व्यक्तिमत्त्वाचे विशिष्ट पैलूही आपली छाप पाडत असतात. त्यातील विचार, भावना व वर्तन या त्रिसूत्रीची भलीमोठी कसरत होत असते. या तिन्ही घटकांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. किंबहुना, हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. एका घटकाचा इतर दोन्हीवर नियमित परिणाम होत असतो. हे त्रिसूत्री चक्र सतत कार्यरत असते आणि आपले मानसिक आरोग्य व त्याची सुदृढता ठरवीत असते. 

कोरोना पॅनडॅमिकचा स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जागतिक स्तरावर असेही निदर्शनास आले आहे की, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये याच कालखंडात भरमसाठ वाढ झाली आहे. हिंसाचाराची लाटच आली असे म्हटले तरी त्यात काही गैर होणार नाही. प्राची मराठे यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले आहे,  इटलीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते या काळात हेल्पलाइनवर मदतीसाठी येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण अचानकच घटले असून इमेल्सचे प्रमाण मात्र वाढले आहे. त्यामध्ये स्त्रीला होणारा त्रास घरात मुक्तपणे बोलताही येत नव्हते. युके मधील सामाजिक कार्यकर्तीशी मी स्वतः बोलल्यानंतर असे समजले की, तिकडे ९९% तरी कौटुंबिक मारहाणीचे प्रकार नक्कीच नाहीत. पण, आपत्तीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसत आहे. परस्पर नातेसंबंधही याला अपवाद राहिले नाही. त्यावरही अपरिहार्य असा परिणाम झाला आहे. जसे तिकडे विभक्त कुटुंब पद्धती आहे. पती-पत्नी दोघेही जॉब करणारे आहेत. आपल्या मुलांना नॉर्मली ते डे केअर सेंटरमध्ये ठेवत असत. ह्या आपत्तीच्या काळात दोघांनाही वर्क फ्रोम होम असल्यामुळे मुलांना सांभाळून सगळे काम करणे कठीण होते आहे.

महिलांनीच मुलांना पाहिले पाहिजे, असा सूर पुरुष मंडळींकडून येत आहे. खरं सांगायचे तर पालकत्वाची जबाबदारी ही स्त्री आणि पुरुष दोघांची असते, असे असताना त्या घरातील स्त्रीलाच ती जबाबदारी पेलावी लागते. घरातील काम करून आपला वर्क परफोर्मस तितका चांगला देता येत नाही. अमेरिकेत या संदर्भातील एका संशोधनात असे समोर आले आहे की, ह्या लॉकडाउनच्या काळात १० लाख विवाहित महिलांचे जॉब गेले, तर या काळात जे पुरुष एकटे आहेत अशा १२ लाख पुरुषांना नवीन जॉब मिळालेत. म्हणजेच ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्यांना आपल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे घरात सतत कार्यमग्न राहावे लागत आहे. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणत बदल झाला असल्याने जी मुले शाळेत जायची त्यांना पूर्णवेळ घर सांभाळणे याचबरोबर मुलांचा ऑनलाइन अभ्यास करून घेणे हेही काम त्या स्त्रीलाच करावे लागत आहे. पती-पत्नीच्या नात्यावर ह्या सर्व गोष्टीचा नक्कीच परिणाम झाला आहे. शिवाय या आपत्तीचा दोघांच्या मानसिक आरोग्यालाही मोठा फटका बसला आहे.

भारतातील सर्व स्तरांतील स्त्रिया ह्यासुध्दा यातून सुटल्या नाहीत. त्यांनाही पॅनडॅमिकचा खूप मोठा फटका बसलाय. या आपत्तीमध्ये विशेषतः शहरातील स्त्रियांवर मोठा ताणतणाव असल्याचे आढळू आले आहे. वर्क फ्रोम होम करणाऱ्या स्त्रियांना या काळात कौटुंबिक हिंसाचाराला जास्तच प्रमाणात सामोरे जावे लागले आहे, लागत आहे. अवाघं कुटुंब एकत्रितपणे लॉकडाउन असताना कुटुंबातील कर्त्या स्त्रीवर कामाचा अतिरिक्त भार पडला. तिला सर्व घरातील लोकांच्या मग ती मुले असू, नवरा किंवा सासू-सासरे असू यांच्या इच्छेनुसार तिला तिथे कार्यरत रहावे लागले. किंबहुना ती तिची अपरिहार्यताही होय. यातूनही काही संबंधित स्त्रीकडून जर कशात कुचराई वा दिरंगाई झाली तर त्यातून मग तिला मारहाण अशाप्रकारच्या प्रसंगांना तिला सामोरे जावे लागलेय. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शारीरिक मारहाणीपेक्षा मानसिक होणारा त्रास हा फार भयंकर असतो. कारण, फिजीकल वेदना या काही वेळानंतर शमतात. मात्र, मनावर जे आघात झालेले असतात ते स्वास्थ्य बिघडवून टाकतात. 

ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नाही. या आपत्तीने तिलाही हतबल केलंय. ग्रामीण भागातील बहुतांश स्त्रिया या भाजी किंवा मासे विकण्याचा व्यवसाय करतात. या महिला असंघटित क्षेत्रात मोडतात. त्यांनी जर व्यवसाय केला तरच त्यांना रोजी रोटी मिळू शकते, अन्यथा त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येते. कोरोना लॉकडाउनमध्ये या स्त्रियांची मोठीच हेळसांड झाली. त्यांना आपला व्यवसाय करता आला नाही. अत्यावश्यक सेवा सुरू असे जरी जाहीर केले होते तरी या स्त्रियांना आपला भाजीपाला वा मासे व तत्सम वस्तू तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरापर्यंत पोहचवता आल्या नाहीत. कारण, खासगी अन् सरकारी दळणवळण ठप्प. परिणामी, या स्त्रियांवर आर्थिक संकट ओढवले गेले. मुळातच या असंघटित क्षेत्रातील स्त्रिया. त्यामुळे आवाज तरी किती आणि कुठे उठवणार. आपत्तीच अशी जीवघेणी असल्यामुळे घरी बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. हे झाले किरकोळ छोटे व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे. पण, ह्या आपत्तीचा खूप मोठा फटका ज्या भूमिहीन शेतमजूर स्त्रियांनाही बसला. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

ह्या स्त्रिया मोलमजुरी करायला जायच्या त्यांचेही काम थांबले. कारण जेथे ते काम करायला जायच्या तेथील शेतमालकाकांडे शहरात असणारे त्यांचे कुटुंबीय आलेले. त्यामुळे तेच लोक शेतात राबत राहिले. या आणि अशा घडामोडीमुळे भूमिहीन शेतमजूर स्त्रियांची रोजगार नसल्याने आर्थिक ससेहोलपट झाली. सरकारने जनधन योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला ५०० रु देणार असे जाहीर केले. पण, ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांचे जनधन खातेच अस्तिवात नव्हते. त्यामुळे जी मदत जाहीर झाली तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचलीच नाही. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर झालेला आपल्या दिसून येतो. खरंतर भारतीय समाज व्यवस्थेत स्त्री प्रश्नांवर फार कमी बोलले जाते. स्त्रीला सुध्दा भावभावना असतात हे मान्यच केले जात नाही. पर्यायाने तिच्या मानसिक आरोग्याचाही विचार केला जात नाही. या कोरोना  पॅनडॅमिकच्या पार्श्वभूमीवर एक माणूस म्हणून स्त्रीच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तरच स्त्रीची वाटचाल योग्य दिशेने होईल.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

इतर ब्लॉग्स