World Mental Health Day : सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

कोरोनामुळे बाधितांचे रोजचे आकडे वाचून उरात धडकी भरली. धंद्यात मंदी आल्याने पैशांची चणचण भासू लागली. या सर्व कारणांनी मानसिक आरोग्य बिघडले.

रत्नागिरी : कोरोना काळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले. त्याला कारणे अनेक होती. काही जणांचे नातेवाईक कोरोनात मृत्युमुखी पडले, घरातून जो गेला तो पुन्हा दृष्टीस पडला नाही. काहींनी गावात प्राण गमावल्याने नातेवाइकांना धक्का बसला. कोरोनामुळे बाधितांचे रोजचे आकडे वाचून उरात धडकी भरली. धंद्यात मंदी आल्याने पैशांची चणचण भासू लागली. या सर्व कारणांनी मानसिक आरोग्य बिघडले.

काहींची झोप उडाली, नैराश्‍य आले, भयगंड निर्माण झाला; तर काहींच्या मनाचे संतुलन पारच बिघडले. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालाच आहे, भोवती सर्व रुग्ण पसरले असून, ते छुपेपणाने संसर्ग वाढवत आहेत, असे भास त्यांना होऊ लागले. घटलेले उत्पन्न, घरात डांबून ठेवल्याची भावना, भरपूर रिकामा वेळ या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक जण दु:खी झाले. प्रत्यक्ष भेटी बंद झाल्याने मोबाईलवर चॅट करण्याचा वेळ वाढला. पण, त्यातून भय वाढवणारी आणि परस्परविरोधी अशी माहिती आढळली. खरं काय, खोटं काय हेही समजेना. त्याचाही डोक्‍याला तापच झाला.

काहींनी टी.व्ही., ओ.टी.टी. याच्यावर चित्रपट पाहायचा सपाटा लावला. पण, थोड्या दिवसांत त्याचाही कंटाळा आला. देशी-परदेशी भटकायला जाणं थांबलं, वेगवेगळ्या हॉटेलांत जाऊन खाणं बंद झालं आणि दु:ख बुडवायला सुरवातीला मद्यही मिळेना.
सुख म्हणजे नक्की काय असतं? आपण आपलं सुख या सर्व बाह्य गोष्टींवर अवलंबून ठेवलं तर त्याचा अभाव आपल्याला दु:खी करणारच. खरंतर सुख ही आपल्या मनाची एक अवस्था आहे. आपण सुखी राहायचं ठरवलं तर आपण कोणत्याही परिस्थितीत सुखी राहू शकतो.

आपल्याच घरातील माणसांनी एकमेकांशी भरपूर बोलायला सुरवात केली तर आजवर मनात साचून राहिलेल्या अनेक भावना, अनेक विचार यांना मोकळीक मिळेल. अनेक गैरसमज दूर होतील. परिसरातल्या पानाफुलांत, झाडाझुडपांत निसर्गाचे अनेक आकार, रंग, गंध आपल्याला आनंद देतील. मनातल्या सृजनाला वाव देण्यासाठी चित्रकला, रंगकला, संगीत, साहित्य, पाककला अशा अनेक कलांचे प्रयोग करायला ही नामी संधी आहे. आपल्या मनात डोकावून पाहिले तर सुख निर्माण करणं सहज शक्‍य आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनी सुखाचा शोध बाह्य गोष्टींपेक्षा आत वळून घ्यायला शिकूया, किमान त्या दृष्टीने पावले टाकूया.

"गेल्या सहा महिन्यांत माझ्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये ‘कोरोना’ हा मानसिक तणाव वाढवणारा खूप मोठा घटक होता. आजवर थोड्याशा औषधांच्या सहाय्याने सुखी जीवन जगणारे रुग्ण लॉकडाउनमुळे औषध न मिळाल्याने व्यथित झाले. या रुग्णांच्या मनाला वास्तवात आणणारी औषधे, नैराश्‍य घालवणारी औषधे, चिंता दूर करणारी औषधे अशांचा वापर करून आणि जोडीला समुपदेशन करून त्यांचे आजार बरे झाले. आपल्या मनातल्या भावना, विचार समजून घेणे आणि त्यातील परस्पर संबंध जाणून स्वभावातील दोषांचे निराकरण करणे यासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्या आयुष्यात सुख निर्माण करणे आपल्याच हातात आहे."

- डॉ. शाश्‍वत शेरे, रत्नागिरी

 

संपादन - स्नेहल कदम 

इतर ब्लॉग्स