कुस्तीतील लाईव्ह कॉमेंट्री कशी करतात तुम्हाला माहित आहे का ? जाणुन घ्या...

मतीन शेख, कोल्हापूर
बुधवार, 10 जून 2020

कुस्ती सारख्या रांगड्या खेळात कुस्ती समालोचन म्हणजेच निवेदनाचे सध्या खुप महत्त्व आहे, निवेदकांनी केलेल्या कॉमेंट्री मुळे कुस्तीला खुप चांगला बहर येतो.कुस्ती निवेदन हे एक भाषिक कौशल्य आहे, तसेच निवेदनाकडे करिअर म्हणून पाहिले जात आहे…

संवादाची विविध माध्यमे आहेत. मुख्यतः ती दृश्‍य व श्राव्य स्वरुपाची असतात. ज्ञान, माहिती, विचार आणि संवादाचे संप्रेषण विविध माध्यमातून वेगवेगळया अंगाने व साधनांनी होत असते. भाषण, सूत्रसंचालन, कथाकथन या संवाद संप्रेषणासारख्या मौखिक प्रकारासारखा प्रकार म्हणजे निवेदन होय.संवादाच्या मौखिक परंपरेत निवेदक व श्रोता यांचा थेट संबंध असतो. कोणत्याही व्यक्तीमधील सर्वात प्रभावी व आकर्षून घेणारा गुण म्हणजे त्याचं बोलणं असतं.ती व्यक्ती कोणते विचार, माहिती आपल्या बोलण्यातुन कशा पद्धतीने मांडते आहे यावर त्या विषयाचे महत्त्व अवलंबून असते. विविध कार्यक्रमात कलाकार आणि रसिक, राजकीय सभांमध्ये नेता आणि जनता यांच्यातील दुवा अत्यंत खुमासदार शैलीत साधणारा व्यक्ती हा निवेदक असतो. अगदी अशाच प्रकारे खेळ, खेळाडू आणि क्रिडा रसिक यांच्यातला मुख्य दुवा हा क्रिडा निवेदक असतो. श्रोत्याला, दर्शकाला खिळवून ठेवण्याच काम निवेदक करत असतो.विविध खेळाच्या चालु सामनांच्या धावते वर्णन हे क्रिडा निवेदक करत असतात. त्यांना क्रिडा समालोचक असे ही संबोधले जाते.

क्रिकेट, फुटबॉल यासारख्या जगात प्रसिद्ध असणार्‍या खेळांच्या यशामागे व प्रसिध्दीमागे निवेदन हा घटक महत्त्वाची भुमिका बजावतो.या खेळातील चालू सामन्यांची वर्णने, तांत्रिक बाजु तसेच या खेळांचे यथार्थ व रंजक विश्लेषण हे निवेदनाद्वारे / समालोचनाद्वारे होत गेले.यामुळे हा खेळ सर्व क्रिडा रसिकांना समजू व आवडू लागला. जेव्हा एखाद्या खेळाच वर्णन व विश्लेषण क्रिडा रसिकांना समजते तेव्हा त्या खेळाची प्रसिद्धी वाढते.

महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीवर पुत्रवत प्रेम केले. त्यांनी कुस्ती या खेळाला राजाश्रय प्राप्त करुन दिला. कोल्हापूरात आशिया खंडातील प्रसिद्ध खासबाग मैदानाची तसेच अनेक तालमींची स्थापना त्यांनी केली. कुस्ती या खेळाचा इतिहास तसा खूप जुना आहे. पूर्वी कुस्ती या खेळाचे समालोचन होत नव्हते परंतु अलीकडील दोन-तीन दशकात त्यांची सुरवात झाली आहे. कुस्तीच्या सामन्याचे निवेदन हे विविध निवेदकांकडुन होत आहेत. अनेक निवेदकांनी कुस्ती निवेदक म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रात शंकरआण्णा पुजारी,राजाराम चौगुले, प्रशांत भागवत, अमोल बुचूडे, राजाभाऊ देवकाते, ईश्वरा पाटील, धनाजी मदने, हे आघाडीचे कुस्ती निवेदक मानले जातात. कुस्ती खेळाला पुन्हा भरभराटीचे दिवस प्राप्त होत आहेत. अशावेळी कुस्ती निवेदनाकडे एक करिअर संधी म्हणून पाहता येईल.

कुस्ती निवेदनासाठी आवश्यक कौशल्य :

१) कुस्ती खेळाविषयीची आधारभूत माहिती

मुख्यतः कोणत्याही कार्यक्रमाचे अगर स्पर्धेचे निवेदन करताना त्या घटका विषयी आधारभूत माहिती निवेदकाकडे असणे आवश्यक असते.निवेदक हा त्याच क्षेत्रात काम करणारा, त्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्‍त केलेला असेल तर त्याच्याकडे चांगली माहिती असते. कुस्तीतील निवेदक हा मुलतः आजी अगर माजी पैलवानच असेल तर त्याच्याकडे कुस्ती या खेळाची आधारभूत माहिती असते. प्रत्यक्ष कुस्तीच्या फडात लढण्याचा त्याच्याकडे चांगला अनुभव असेल तर त्याच्याकडील अनुभववादी माहितीच्या आधारे तो उत्तम प्रकारे निवेदन करु शकतो.
कुस्तीचा इतिहास, कुस्ती परंपरा, पैलवानाची ओळख,मैदान,काळानुरूप कुस्तीत झालेले बदल अशी आधारभूत माहिती निवेदकाकडे असावी लागते.

२) कुस्तीचे प्रकार, डाव-प्रतिडाव व नियमावलींची माहिती

प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम, तंत्र असतात. कुस्ती या खेळाचेही वेगवेगळे प्रकार, नियम, डावपेच व तंत्रे आहेत. मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शास्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे.या मुलभूत तत्वाची जाण निवेदकाकडे असणे आवश्यक असते.
भिमसेनी, जरासंधी, जाबुवंती हे कुस्ती प्राचीन प्रकार होत परंतु हे प्रकार लोप पावले व हनुमंती हा कुस्ती प्रकार सध्या अस्तित्वात आहे त्याच बरोबर फ्री स्टाईल व ग्रीको रोमन हा आधुनिक कुुस्तीचा प्रकार सध्या प्रचलित आहे. प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे हे खेळाडूंचे कर्तव्य आहे अशी ताकीद निवेदकाने करने जरुरीचे असते. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे जरी असले. तरी निवेदकाला चालु लढतीवर लक्ष ठेवावे लागते. स्पर्धक जखमी होईल असे प्रतिबंधित डाव, चुकीच्या पकडी टाळण्याचे आवाहन निवेदकाला करावे लागते. मल्लांनी मारलेल्या डावपेचांचे विश्लेषण निवेदकाला करावे लागते.

३) निवेदकाचा आवाज व भाषा ज्ञान

कुस्ती निवेदकाचा आवाज हा स्पष्ट आणि पहाडी स्वरुपाचा असावा लागतो. त्याच्या निवेदनातुन प्रेक्षक रोमांचित तसेच कुस्ती खेळणार्‍या खेळाडूंना स्फुर्ती येणे आवश्यक असते. कुस्ती हा खेळ बहुधा ग्रामीण भागात खेळला जात असल्याने निवेदन हे ग्रामीण भाषेत झाले तर ते प्रेक्षकांना भावते. मल्लांच्या नावाचा पुकार तसेच त्याच्या तालमीच्या व गुरू वस्तादांच्या नावाचा अचुक पुकार करावा लागतो. लढतीत जिंकलेल्या मल्लाचे कौतुक व हरलेल्या मल्लाचे योग्य सांत्वन करणे हे कसब निवेदकाकडे असणे आवश्यक असते.
गावोगावच्या जत्रा- यात्रा मधील कुस्तीच्या आखाड्यांमध्ये कुस्त्या सुरू होताच, आखाड्यात निवेदक ध्वनिक्षेपकावरुन बोलू लागतो….
''मन, मनगट आणि मेंदू यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती होय.बलाशिवाय बुद्धी लुळी पांगळी आहे आणि बुद्धीशिवाय बल हे थिटे आहे; मात्र या दोन्हींचा संयोग म्हणजे कुस्ती होय. घरातलं दूध डेअरीला घालू नका. पोराला पाजा आणि घरात एक तरी पैलवान तयार करा. अहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स…?''
''कोण इचारतं तुमची इस्टेट; पण… तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा…? एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा…!''
असं कुस्तीप्रेमींना त्यांच्याच अस्सल ग्रामीण भाषेत भावनिक आवाहन निवेदक करतो.संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण होते. प्रेक्षकांच्याच बोली भाषेत निवेदन केल्याने निवेदनाचा परिणाम पडतो.

४) कुस्ती परंपरेतील संदर्भ व किस्से यांची माहिती

कुस्ती निवेदन करताना कुस्तीच्या प्राचीन कालखंडा पासुन ते आधुनिक कालखंडा पर्यंतचे अखंड वर्णन निवेदकाला करावे लागते. महाराष्ट्राला कुस्ती या खेळाची परंपरा मोठी आहे. रामायण, महाभारत व इतर महाकाव्यात साहित्यात सुद्धा कुस्तीची वर्णने आहेत. निवेदनात याचे संदर्भ दिले जातात. आदर्शवत व नैतिक प्रबोधनपर निवेदन कुस्तीत केलं जातं.
आखाड्यातील एखाद्या पैलवानानं कुस्ती मारताच मैदानात निवेदक पुकारतात,''शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, लिंबोळ्या नाहीत. घरचा संस्कार चांगला पाहिजे, मुलं आकाशातून पडलेली नाहीत, आपले संस्कार कुठं कमी पडतात ते बघा…''
''मुलं आपलीच असतात, संस्कार महत्त्वाचे आहेत'' अशा खड्या आवाजात निवेदक बोलतात. यासारख्या विविध गोष्टींचे संदर्भ निवेदक आपल्या शैलीतुन देत प्रबोधनपर निवेदन ही करतात.

जुन्या गाजलेल्या प्रसिद्ध मल्लांच्या लढतींची वर्णने निवेदकाला करावी लागतात . कोणी, कोणत्या डावावर, कोणाला चितपट केलं याचा रंजक इतिहास आपल्या शेलक्या वर्णात्मक शैलीत निवेदकाला कुस्तीशौकीनापुढे मांडाला लागतो.

५) सुचकता व हजरजबाबीपणा

एखाद्या रंगानं सावळ्या असलेल्या पैलवानाची आखाड्यात एंट्री होताच, निवेदक पुकार करू लागतात, ''ब्लॅक टायगर मैदान पे आ गया..!
त्याला काही जण हसतात. त्यांना ते सांगतात,'' हसू नका, अहो प्रभू रामचंद्रही काळेच होते. काले कमलियावाला वो कृष्ण कालाही था, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी किंवा सावळे ते सुंदर रूप मनोहर जगाला वेड लावणारे ते परब्रह्म अनादी अनंत ते जन्म-मृत्युरहित तेही काळेच होते. आषाढी कार्तिकीला जाता का नाही…? लाखोंच्या मिठ्या पडतात काळ्याला…! त्यामुळं काळ्याला फार महत्त्व आहे. आकाशातील काळ्या ढगानं तोंड काळं केलं, तर आपली तोंडं बघण्यासारखी होतात. एखाद्या सुवासिनीच्या अंगावर किलोभर सोनं आहे; पण काळा पोतच नाही; काय करायचं त्या सोन्याला…?
म्हणून काळ्या रंगाला फार महत्त्व आहे. त्याला कमी लेखू नका…'

विनोदी बुद्धीनी असे हजरजबाबीपणाने निवेदन करुन निवेदकाला कुस्ती शौकिनांना मैदानात खिळवत ठेवावे लागते.
स्पर्धेच्या ठिकाणी येणारे पाहुणे, वस्ताद मंडळी यांची नावे पुकारत त्यांचे स्वागत आपल्या निवेदनातुन निवेदकाला करावे लागते. त्यासाठी निवेदकाला त्या व्यक्तींची अचुक ओळख असणे गरजेचे असते. मैदानातल्या प्रेक्षकांच्या गर्दीवर लक्ष ठेवत, गोंधळ सदृश्य परिस्थितीत प्रेक्षकांना शांततेचे आवाहन करुन मैदानाच्या नियोजनावर व शिस्तीवर नियंत्रण ठेवण्याचे कसब निवेदकाकडे असणे आवश्यक असते.

निवेदन खेळाची अभिव्यक्ती

कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. जत्रा, यात्रा, उरुसातुन कुस्तीचे फड भरत राहिले. पुढे - पुढे कुस्ती वेळ-काळा नुसार बदलत गेली, ती विविध नियमांनी बांधली गेली, मातीतून थेट मॅट वर गेली आणि जागतिक झाली.
आंतराष्ट्रीय नियमांनुसार चालणारी आधुनिक कुस्तीच्या लढतीची पद्धत बर्‍याच लोकांना ध्यानी येत नाही ती नकोशी वाटते कारण कुस्तीच अचुक विश्लेषण, निवेदन समजेल अशा शब्दांत त्याच्यापर्यंत पोहचवण्याची कमतरता असते. परंतु कुस्तीचं चांगलं निवेदन कौशल्य अंगीकारलं तर प्रेक्षकांना बर्‍याच अंशी कुस्तीच्या लढती, त्यातील डावपेच व गुणांकन याचं आकलन होतं. निवेदन ही एक प्रकारची खेळाची अभिव्यक्ती आहे. तेव्हा वरील कौशल्य एक यशस्वी कुस्ती निवेदक होण्यासाठी आवश्यक आहेत.

इतर ब्लॉग्स