एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला सक्षमीकरणास बळ...

महेश गावडे
मंगळवार, 23 जून 2020

भारतात गेल्या 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून विविध पातळ्यांवर एचआयव्ही जनजागृती केली जातेय; मात्र आजही समाजात वावरताना, काम करताना संसर्ग झालेल्यांना भेदांना सामोरे जावे लागते. मिश्र बचतगटाच्या माध्यमातून हा भेद कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मिश्र बचतगटाच्या माध्यमातून याबाबतची जनजागृती प्रभावीपणे होईल याची खात्री आहे, असे मत येरळा प्रोजेक्‍टचे प्रकल्प संचालक श्रीपाल सप्तसागर यांनी मांडले.

सांगली जिल्ह्यातील येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी ही 2002 पासून एचआयव्ही जनजागृती क्षेत्रात कार्यरत आहे. 1972 मध्ये सोसायटी स्थापना झाली. संस्थेच्यावतीने शाश्‍वत ग्रामीण विकास, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण क्षेत्रातही कामे केली जातात. सोसायटीने समुपदेशन व चाचणी केंद्र सुरू केले आहे. ग्रामीण भागातील युवक व युवतींना जीवन विकास कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासह कलंक व भेदभावाची भावना नाहीशी करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सोसायटीच्यावतीने आता मिश्र बचतगटाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातही राबवण्यात येणार आहे. या बचतगटाच्या माध्यमातून एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याबरोबरच सर्वसामान्य व आर्थिक मागासवर्गातील महिलांच्याही सक्षमीकरणास बळ मिळणार आहे.

मिश्र बचतगट म्हणजे एचआयव्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह महिलांचा समूह, यात 60 टक्के पॉझिटिव्ह व 40 टक्के निगेटिव्ह महिलांचा समावेश असेल. समाजात अजूनही एचआयव्हीसह जगणाऱ्यांप्रति भेदभावाची भावना दिसते. ती कमी करण्यासह या माध्यमातून एचआयव्ही जनजागृतीअंतर्गत विविध विषय हाताळण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची संकल्पना येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने सर्वांत प्रथम भारतातील एचआयव्ही जनजागृती क्षेत्राशी संबंधित गिलीड सायन्सेस या कंपनीसमोर मांडली आणि या कंपनीने ती संकल्पना उचलून धरली.

मिश्र बचतगटाच्या प्रकल्पासाठी त्यांनी अर्थसाहाय्य देऊ केले आहे. या प्रकल्पाशी नेटवर्क ऑफ महाराष्ट्र- पुणे ही संस्था आता जोडली गेली असून त्यांच्या साहाय्याने हा उपक्रम राबवण्यात येईल. मिश्र बचतगटाचा प्रकल्प कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यांत राबवला जाणार आहे. नेटवर्क ऑफ महाराष्ट्र (एनएमपी) या संस्थेचेही विविध जिल्ह्यांत एचआयव्ही जनजागृतीसंबंधित प्रकल्प सुरू आहेत. एनकेपीच्या स्टाफला या प्रकल्पाबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांनी त्यांच्या परिसरातील एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांची स्वयंसेवक म्हणून निवड करायची आहे. त्यांची निवड झाल्यानंतर या स्वयंसेवकांना मिश्र बचतगट स्थापन करण्यासाठी येरळा प्रोजेक्‍टतर्फे मार्गदर्शन केले जाईल. दरम्यान, येरळा प्रोजक्‍ट समन्वयक यशवंती होनमाने म्हणाल्या, "सध्या सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील एनकेपीच्या स्टाफला याबाबतचे प्रशिक्षण दिले असून बचतगट स्थापण्यासाठी निवडलेल्या महिला स्वयंसेवकांचे लवकरच प्रशिक्षण घेणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा होणार आहे. या माध्यमातून चार ते पाच हजार महिला बचतगटाशी जोडल्या जातील, त्यांचे आर्थिक सक्षमीकरणही होईल.''

 

 

 

 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या