गणित सुलभीकरण हवे

जयश्री काळे
Tuesday, 25 June 2019

शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत. 
 

शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत. 
मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही केले. गेली वीस वर्षे जागृती सेवा संस्था या वस्तीपातळीवर काम करणाऱ्या संस्थेत मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी पुण्याच्या विविध झोपडपट्ट्यांतून राहणाऱ्या आणि जवळपासच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी बालवाड्या, पहिली ते दहावीचे अभ्यासवर्ग चालवतो. यात प्रामुख्याने गणित, विज्ञान आणि भाषा शिकवल्या जातात.

आम्हा सगळ्या शिक्षकांना या मुलांमध्ये एक समान धागा दिसला. तो म्हणजे गणित किंवा "गणोबा' याचा त्यांच्या मनावरील भीतीचा पगडा. हा काहीतरी अगम्य विषय आहे. जरी रोजच्या व्यवहारातले हिशेब जमत असले तरी शाळेत शिकवलं जाणारं गणित हे काहीतरी वेगळंच, अशी भावना. मग गणिताचा तास सुरू झाल्यावर मुलांची पोटं दुखायची, उलटी आली अस वाटायचं अशी एक ना अनेक कारणे देऊन ती पळ काढायची. जी काही मुलं तग धरून बसायची, ती गणितातल्या मूलभूत संकल्पना, प्राथमिक गणिती क्रिया याबाबत भरपूर गोंधळलेली असायची. नववीतल्या सुनीताला एकोणपन्नास झाडे म्हणजे एकूण पन्नास झाडे वाटायची, तर चौऱ्याऐंशी लिहिताना गोपाळला घाम फुटायचा. या सगळ्या परिस्थितीत आम्हा शिक्षकही या मुलांना गणित शिकवायला सुरवात कुठून करायची, या संभ्रमात पडायचो. 
एक दिवस अचानक पुस्तकाच्या दुकानात डॉ. मंगला नारळीकरांनी लिहिलेले "गणितातील सोप्या वाटा' हे पुस्तक आलं. ते पुस्तक सर्वच शिक्षकांना उपयुक्त वाटलं आणि याबाबत लेखिकेशी एकदा चर्चा करून मार्गदर्शन घ्यावं, असही ठरलं. मंगलाताईही आनंदाने आल्या आणि आमच्या मुलांमध्ये रमल्या. काही वर्ग त्यांनी स्वतः घेऊन दाखवले. जनवाडीतल्या मुलांनाही त्या आवर्जून वेळ देत. परिणामी, मुलांची गणिताची भीती हळूहळू कमी झाली. या सगळ्यातून सहज निष्कर्ष असा निघाला की, अगदी पहिली, दुसरीपासून गणित हे अधिक सुलभ आणि तर्कनिष्ठ पद्धतीत शिकवलं गेल तर ते सर्वसामान्य, गोरगरीब, अशिक्षित आईवडिलांच्या घरून शिक्षणासाठी फारसं प्रोस्ताहन न मिळणाऱ्या मुलांनाही आपलसं करू शकेल. 
गणित शिकवणं ही एक कला, शास्त्र आणि परंपरादेखील आहे हे खरं असलं तरी, परंपरेत आवश्‍यकतेनुसार नवता आणणे जरुरीचे आहे. कोणताही बदल सुरवातीला जरा नकोसा आणि त्रासदायक वाटतो; परंतु आपल्या भवितव्यासाठी त्याला मोकळ्या मनाने सामोरे जायला पाहिजे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need math facilitation