
अनेरी ही दस्तूर स्कूल मधील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी असून, तिने दोन दिवसांमध्ये 140 कि.मी. अंतर सायकल वरून पार केले.
5 जुलैला रात्रभर चालू असलेल्या पावसाने 6 जुलैला सकाळी सायकलिंग चालू करता येणार की नाही ही मनात शंका होती. मात्र, पहाटे 5.15 च्या सुमारास पावसाने थोडी उघडीप दिली आणि अंदाजे 6 च्या सुमारास, घरचे सदस्य आणि आमच्या लिव्ह लाइफ विधाउट मेडिसीन मित्र परिवाराच्या उपस्थितीत, गणेशचहा, सिटीप्राईड, मार्केटयार्ड येथून आमच्या सायकलवारीस सुरुवात झाली.
अनेरी राहुल शहा (वय 9) ही सायकलवारी मधील सगळ्यात लहान सायकलिस्ट होती. (कदाचित पुणे-पंढरपूर आतापर्यंत झालेल्या सायकलवारी मधील हि सर्वांत लहान सायकलिस्ट असावी.) बाकी सभासद विराज राहुल शहा (वय 13), सुजन नहार (वय 15), डॉ. सौ. किरणवाडीवाला, उत्तम धोका, दिनेश शहा आणि राहुल शहा हे होते.
अनेरी ही दस्तूर स्कूल मधील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी असून, तिने दोन दिवसांमध्ये 140 कि.मी. अंतर सायकल वरून पार केले. सासवड, जेजुरी, वाल्हा येथील जोरदार वाऱ्याचा सामना करत, संतत पावसात तिने वारी चालूच ठेवली. हेल्मेट, ग्लोव्हस, जेलसीट, जेलपॅन्ट आणि ट्रॅफिकचे नियम सांभाळत तिची हि वारी चालू होती. दुसऱ्या दिवशी नातेपुते जवळ आम्हाला पालखी बरोबर जावे लागले. अंदाजे 6 कि.मी. चा हा दुतर्फा गर्दीतील रस्ता अनेरीने अतिशय लिलया पार केला.
"प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे" हा सामाजिक संदेश घेऊन निघालेल्या या सायकलवारीचा पुढचा टप्पा होता, पंढरपूरनजीक घालमे-पवारवस्ती येथील अक्षरांगण शाळा. 50 स्कूल बॅग्स, ई-लर्निंगसाठी 3 टॅब, इजल फळा स्टॅन्ड, फुलांची रोपे या सर्व वस्तू शाळेला भेटस्वरूपात दिल्या. त्यावेळी अनेरीचा खास सत्कार करण्यात आला. अनेरीने विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाने सायकलवारीची सांगता केली. अनेरीने प्रथमच एवढे सायककिंग या वारीच्या निमित्ताने केले आहे. मोबाईल आणि टीव्हीमध्ये अडकलेल्या बालकांसाठी अनेरीची हि सायकलवारी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. सायकलींगशिवाय अनेरी भरतनाट्यम तसेच योगामध्ये पण माहिर आहे.