रमजान परिचय : अणुचाचणी युगातील हिशेब तपासणी 

- अनीस चिश्‍ती 
Saturday, 11 May 2019

, प्रलयाच्या दिवशी कुणी कुणाचे ओझे उचलणार नाही. तुला एकट्यालाच तुझे ओझे उचलावे लागणार आहे. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले ओझे उचलण्यासाठी हाक देईल, तर त्याच्या ओझ्याचा क्षुल्लक भारही उचलण्यासाठी कोणी येणार नाही; मग तो अतिजवळचा नातेवाईक का असेना?''

अनेकदा कारण नसताना आपण इतरांची सुधारणा करायला लागतो, उपदेश करतो. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, "वला तजिरू वाजिरतुन विजरा उखरा.'' म्हणजे, प्रलयाच्या दिवशी कुणी कुणाचे ओझे उचलणार नाही. तुला एकट्यालाच तुझे ओझे उचलावे लागणार आहे. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले ओझे उचलण्यासाठी हाक देईल, तर त्याच्या ओझ्याचा क्षुल्लक भारही उचलण्यासाठी कोणी येणार नाही; मग तो अतिजवळचा नातेवाईक का असेना?'' (फातिर- 35ः18) 

या विधानावरून आपणास कल्पना येईल, की परलोकची (आखिरत) सफर किती भयानक व त्रासदायक आहे ! तिथे कुणी कुणाला विचारणार नाही. सख्खी आई आपल्या पोटाच्या गोळ्याला विसरून जाईल आणि आपल्या मुलाला म्हणेल की, तू तुझे बघून घे. माझे ओझे मलाच आवरत नाहीये. येथे "ओझे' म्हणजे काही सामान-सुमानाचे गाठुडे नसून, ते गाठुडे माणसाच्या पापांचे असेल, ज्याचा उलगडा अंतिम दिवशी होईल. 

अल्लाहसमोर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वाचा हिशेब द्यावा लागणार आहे. हा हिशेब इतक्‍या संतप्त आणि गंभीर अवस्थेत द्यावा लागणार आहे, की याची कल्पनाही आपण इहलोकात करू शकत नाही. प्रत्यक्ष जमीन हिशेब देणाऱ्याचे पाय जखडून धरेल आणि तोपर्यंत उत्तरदात्याचे पाय सुटणार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून कणाकणाचा हिशेब घेतला जाणार नाही. हा कण किती सूक्ष्म असू शकतो, आजच्या वैज्ञानिक आणि अणुबॉम्बशास्त्राच्या युगात त्याची कल्पना करणे कठीण नाही. 

तात्पर्य असे की, सावध राहा ! अल्लाह कितीही दयाळू आणि कृपाळू असला, तरी तो आपल्या दासाचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही. तो स्वतः पवित्र कुरआनात म्हणत आहे,  "जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हालवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील आणि मानव म्हणेल की, ''हिला हे काय होत आहे? त्या दिवशी ती आपले (वरील घडलेले) अहवाल निवेदन करील. कारण, तुझ्या पालनकर्त्याने तिला (असे करण्याची) आज्ञा दिली असेल. त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील; जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने कणमात्र पुण्य केले असेल, ते तो पाहील आणि ज्याने कणमात्र पाप केले असेल, तेही तो पाहील.'' (अल्‌जिलजाल-99-1ः8) 

अशी आहे अंतिम दिवसाची गाथा. इतरांची सुधारणा करीत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पापांचे डोंगर नाहीसे केलेले जास्त बरे. 

सोमवार, ता. 13 मे 
- सहेरी : पहाटे 4.38 
- इफ्तार : सायंकाळी 7.03 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anis Chisti Writes About Ramzan Introduction