अष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व

images.jpg
images.jpg

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे.

अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू:

“योगाची आठ अंगे”
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यारणा, ध्यान आणि समाधी. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत.या सर्व अंगांमागील सार समजून घेण्यासाठी आपण थोडे खोलात जाऊन बघूया.

1. यम
यम म्हणजे योगसाधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे. यम पाच आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.

अहिंसा : अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. दुसऱ्या कोणाप्रती किंवा स्वत:प्रती केलेले कोणतेही हानी पोहोचवणारे, टीकात्मक ठरणारे, चीड आणणारे, राग आणणारे किंवा शिक्का मारणारे शारीरिक, भावनिक किंवा मानसिक कृत्य म्हणजे हिंसा. या खोल रुजलेल्या संकल्पनेची जाणीव साधकाला असली पाहिजे, त्याने ती समजून घेतली पाहिजे आणि सकारात्मक तसेच योगाभ्यास व समाजाच्या विकासात
भर घालणारे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सत्य : सत्य म्हणजे खरेपणा. योगसाधकाने कायम स्वत:प्रती तसेच इतरांप्रती खरे राहिले पाहिजे. सत्यतापूर्ण आयुष्य जगणे अनेकांना बरेचदा कठीण वाटते. मात्र, सत्याच्या पथावर चालत राहिल्यास मानाचे, आदराचे, संवेदनशील वर्तनाचे आयुष्य उभे राहते. असे आयुष्य योगसाधकासाठी अत्यावश्यक आहे.

अस्तेय : अस्तेय म्हणजे चोरी न करणे. याचा अर्थ आपल्या मालकीचे नाही ते आपण घेऊ नये. यात केवळ भौतिक स्वरूपाच्या चोरीचा समावेश होत नाही, तर मानसिक स्तरावरील चोरीही यात येते. म्हणजेच चोरीचा विचारही मनातून काढून टाकला पाहिजे. याचा अर्थ आपण आपल्या लाभासाठी कोणाची मन:शांती किंवा आनंद हिरावू नये असाही होतो.

ब्रह्मचर्य : ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम. याची मदत होते ती आपली व्यसने व टोकाच्या सवयींचे बंध तोडण्यामध्ये. यासाठी धैर्य आणि इच्छाशक्तीची गरज भासते. मनात दाटलेल्या ऊर्मीवर प्रत्येक वेळी मात करताना, आपण अधिक बळकट, अधिक निरोगी आणि अधिक शहाणे होत जातो.

अपरिग्रह : अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे. याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे. यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.

2. नियम
नियम हा रुपांतरणाच्या साधनांचा एक शक्तीशाली संच आहे, स्वत:चे निरीक्षण करून स्वत:बद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा आहे. नियमाच्या पाच शाखा आहेत- सौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि इश्वरप्रणिधान

सौच : सौच हे वातावरणाचे अंतर्गत व बाह्य शुद्धीकरण आहे. आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूला कशामुळे अशुद्धी निर्माण होते ते शोधून त्याचा नाश करण्याचा हा मार्ग आहे. यामध्ये अन्नपदार्थ, पेये, मित्र, मनोरंजन, घरातले सामान, वाहतुकीची साधने या सर्वांचा समावेश होतो.

संतोष : संतोष यामध्ये समाधान, आत्मविश्वास आणि आयुष्यातील स्थैर्याची भावना दाखवली जाते. समाधानी राहता आले तर आपली हाव कमी होते, आपल्या लालसा आणि गरजा कमी होतात. याऐवजी हा नियम आपल्यात कृतज्ञतेची भावना निर्माण करतो, आपल्याला आयुष्यात ज्याची देणगी मिळालेली आहे ते प्रेम व आनंद जागवतो.

तापस : तापस हा स्वयंशिस्तीचा आणि हिंमतीचा सराव आहे. यामुळे आपल्याला आपल्या हानीकारक ठरू शकेल अशा भावनावश वर्तनावर नियंत्रण ठेवता येते आणि विजय मिळवता येतो तसे जागृतावस्था साध्य करण्यात मदत होते.

स्वाध्याय : स्वाध्याय म्हणजे स्वत:चा अभ्यास करणे. यामध्ये आपण या क्षणात आणि त्या पलीकडे कोण आहोत हे बघण्याची गरज भासते. हा स्वत:चा, स्वत:च्या कृतींचा आणि विचारांचा अभ्यास आपल्याला स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यात तसेच स्वत:चे अधिक चांगले स्वरूप साध्य करण्यात मदत करतो.

इश्वरप्रणिधान : इश्वरप्रणिधान याचा अर्थ आहे एकनिष्ठता आणि दिव्यत्वाला शरण जाणे. आपण आपला अहंकेंद्री स्वभाव विरघळवून टाकला पाहिजे आणि स्वत:शीच सतत तादात्म्य पावणेही सोडून दिले पाहिजे.

3. आसन
आसने म्हणजे आपले शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि कणखर राखण्यात मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती. शरीर आणि मनातील समायोजन व समतोल समजून घेण्याच्या तसेच त्याचा सराव करण्याच्या या पद्धती आहेत. या स्थितींमुळे साधकाला आयुष्यातील कसोटीच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात तसेच आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघण्यात मदत होते.

4. प्राणायाम
प्राणायाम हा शब्द दोन शब्दांचा संधी आहे. प्राण आणि आयाम. हा श्वासांना स्थिर हालचालींशी जोडण्याचा सराव आहे किंवा थोडक्यात श्वासावर नियंत्रण ठेवणे आहे. योगाच्या आठ अंगांपैकी हे चौथे अंग आहे. प्राणायामाच्या अभ्यासाला शास्त्रीय संशोधनांचा आधार आहे.

ताण, चिंता आणि अन्य वेदनांचा प्रतिकार करणाऱ्या प्रतिक्रियांना उद्दिपीत करणाऱ्या पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्थेला कार्यान्वित करण्यासाठी तसेच शरीराला आराम देण्यासाठी प्राणायाम प्रभावी ठरतो. श्वासावर नियंत्रण ठेवण्यास शिकल्यामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यातही मदत मिळते आणि यातून तुम्हाला स्वत:ला आणि या अभ्यासाला अधिक चांगले समजून घेता येते.

5. प्रत्याहार
प्रत्याहार म्हणजे अनावश्यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत. मनाची प्रतिकारशक्ती बळकट कण्यात याचा उपयोग होतो. हे अंग ध्यानाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे. आपल्या आतील अस्तित्वाकडे जाण्यास ते व्यक्तीला मदत करते.

6. धारणा
धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. धारणा म्हणजे व्यक्तीने तिचे लक्ष एका बिंदूवर, अविचलितपणे एकाग्र करणे. यामुळे वर्तमानातील क्षणावर नियंत्रण मिळवणे आणि त्याप्रती अधिक सक्रिय होण्यात व्यक्तीला मदत मिळते. यासाठी खूप सरावाची गरज आहे पण एकदा यात प्रावीण्य संपादन झाले की मनाला निश्चित उद्दिष्टाकडे वळवण्यात खूप मदत होते.

7. ध्यान
ध्यान म्हणजेच मेडिटेशन. ध्यान आणि धारणा यांची अनेकदा गल्लत केली जाते, पण ते तसे नाही. यातील प्रमुख फरक समजून घेऊ. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर एका वेळी अधूनमधून केंद्रित केलेले लक्ष. यामध्ये काहीतरी क्रिया घडत असते. ध्यान म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जेव्हा ध्यान करत असते, तेव्हा ती आपण ध्यान करत आहोत असाविचारही करत नाही. ही जागृतावस्थेतील विश्रांतीची अवस्था आहे. यात शरीर विश्रांती घेत असेल पण मन मात्र सावध आणि एकाग्र असते, अगदी बारीक तपशीलही नोंदवून घेत असते. ही अवस्था आयुष्याच्या सर्व प्रमुख पैलूंमध्ये- आर्थिक, भावनिक, मानसिक- सामर्थ्य आणि स्थैर्य देते.

8. समाधी
समाधी ही अवस्था आहे. धन्यता आणि आनंदाची. ही अखेरची अवस्था आणि योगाभ्यासातील अखेरचा टप्पा आहे. याचा अर्थ कायमस्वरूपी अत्यानंदाची अवस्था असा नाही. खरे तर ही परिपूर्तीची अवस्था आहे. यामध्ये व्यक्ती कोणत्याही भौतिक गोष्टींच्या आणि विश्वासांच्या बंधांपासून मुक्त असते, मतांपासून मुक्त असते आणि तिचे विचारांवर व कृतींवर नियंत्रण असते. खरोखर धन्यतेची अवस्था.

योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com