
वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे चार महिन्यांपूर्वी थाटात उद्घाटन झाले. परंतु, येथे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील ठराविक विभाग स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पुणे : वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे चार महिन्यांपूर्वी थाटात उद्घाटन झाले. परंतु, येथे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील ठराविक विभाग स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालकमंत्री, स्थानिक आमदार, नगरसेवक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन थाटात झाले. प्रत्यक्षात मात्र या इमारतीत क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार सुरू झालेला नाही.
अतिक्रमण विभाग, आरोग्य विभागातील काही भाग व स्थापत्य विभाग सिंहगड रस्ता येथील कार्यालयात स्थलांतरित झाले आहे. परंतु आस्थापना विभाग, आरोग्य विभाग व टेंडर विभागाचे कामकाज हे अजूनही टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातूनच होत आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही अधिकारी येथे बसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथे विविध सुविधांचा अभाव असल्याने अधिकारी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बसत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना आपल्या विविध तक्रारी व कामांसाठी सात ते आठ किलोमीटर लांब टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात जावे लागते. याचा प्रचंड मनस्ताप नागरिकांना होत आहे. एखाद्या कामाकरिता प्रत्यक्ष भेटण्यासाठी वडगाव, धायरी येथील नागरिकांना थेट टिळक रस्ता गाठावा लागतो. त्यामुळे नवीन इमारतीत त्वरित सर्व विभाग स्थलांतरित करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
''प्रभाग समितीची पहिली बैठक झाली. परंतु प्रत्यक्षात कामास सुरवात होण्यासाठी आणखी आठ दिवस लागतील. कारण, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात इंटरनेट आणि फोन सुविधा बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच टेंडर, इनवर्ड व आउटवर्ड कामासाठी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बसावे लागते.''
- संतोष तांदळे, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
"सिंहगडरस्ता क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नसतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्यासाठी टिळक रस्ता क्षेत्रीय कायार्लयात जावे लागते."
- संदीप चव्हाण, नागरिक, धायरी गाव