माझी "हमसफर...' 

-धोंडप्पा मलकप्पा नंदे  वानवडी, पुणे 
Sunday, 4 August 2019


कधी-कधी माणसांसोबत काही निर्जीव गोष्टीही आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान निर्माण करतात. त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व मोलाचं असतं. किंबहुना अनेकदा आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात त्यांची मोलाची साथ असते; पण आपण कधीच त्या निर्जीव वस्तूंचे आभार मानत नाही. माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्व असणारी एक गोष्ट म्हणजे- माझी सायकल..! 

कधी-कधी माणसांसोबत काही निर्जीव गोष्टीही आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान निर्माण करतात. त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व मोलाचं असतं. किंबहुना अनेकदा आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात त्यांची मोलाची साथ असते; पण आपण कधीच त्या निर्जीव वस्तूंचे आभार मानत नाही. माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्व असणारी एक गोष्ट म्हणजे- माझी सायकल..! 

 

- मी गेल्या 20 वर्षांपासून सायकलनं प्रवास करत आहे. यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे सायकलमुळे व्यायाम होतो, जो आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अत्यंत गरजेचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे परवडणारा प्रवास. गाडीला लागणाऱ्या पेट्रोलचे भाव सध्या गगनाला भिडताहेत. सायकल चालवल्यानं पेट्रोलचे पैसेही वाचतात आणि प्रदूषणही टाळले जाते. सायकलने फिरण्याची मजा काही औरच. 
वाहतूक कोंडीतूनही मी सायकलनं इच्छित स्थळी लवकर पोचतो. सायकल हा निरोगी राहण्याचा मजेदार पर्याय आहे, असं मला तर वाटतं. 

मी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या अक्कलकोट तालुक्‍यातील वागदरीचा. माझं शालेय शिक्षण 1997 मध्ये पूर्ण झालं. घरच्या परिस्थितीमुळे दहावीची परीक्षा देऊन मी कामानिमित्ताने पुणे शहरात आलो. काम करून बी.ए.पर्यंतचे शिक्षण बाहेरून पूर्ण केले. शहरात मी त्यावेळी नवीन होतो. माझे मामा व आत्यांकडे जवळपास सात वर्षे राहिलो. 
मागील वीस वर्षांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात काम करीत आहे. कामाच्या ठिकाणी तेव्हापासून आतापर्यंत रोज सायकलनेच प्रवास करत आहे. 
या दरम्यान सायकली बदलल्या, मात्र माझ्याकडून सायकल चालवणे सुटले नाही. सायकल आणि माझं अतुट नाते बनले आहे. काही अडचणींमुळे, तसेच इच्छा असूनही सायकल सोडून दुसरे वाहन घेणे झालं नाही. 

एकेकाळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे आता मात्र परिस्थिती खूपच बदलली असून, रस्त्यावर सायकल चालवणारी माणसं अतिशय दुर्मीळ झाली आहेत. सायकल चालवत असताना अनेक अनुभव आले, अनेक अडचणी आल्या. ऐनवेळी सायकल खराब होणे, घाईत असतानाच सायकल चालवण्यासाठी मन तयार नसणे. अशावेळी मनस्तापही झाला. 
सायकल हे फक्त वाहन नाही, तर तो एक विचार आहे. मानवी जीवन व्यवहाराशी निगडित अशी उन्नत संकल्पना आहे. सायकल उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन माणसाला प्रवासमग्न करते; त्याला निखळ आनंद देते. 
माझं आणि सायकलीचे नातं म्हणजे गुरूसारखे आहे. माझ्या सुख- दुःखात हमसफर, माझी सोबती. मला सायकल चालवताना कमीपणा वाटत नाही, उलट आंनद होतो. मी माझ्या मुलीला सायकलवरून शाळेत सोडत असतो. माझी मुलगी नेहमीच म्हणते की "बाबा, मी मोठी झाल्यावर तुम्हाला गाडी घेऊन देते.' या वेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू टपकतात...! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle : My friend