
जीवन अनेक टप्प्यांवरचे, हसून-रुसून जगायचे।
मौजमजा अनुभवायचे, निवांत असे जगायचे।।
----
जीवन अनेक टप्प्यांवरचे, हसून-रुसून जगायचे।
मौजमजा अनुभवायचे, निवांत असे जगायचे।।
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध अनुभव येत असतात. काही प्रसंग हसवतात, तर काही रडवतात. सुखे सर्वत्र दिसतात आणि हळुवार दुःखे एकामागून एक जीवनात प्रवेशतात. तेव्हा अनुभव हा गुरू प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सुलभ मार्ग दाखवून मार्गस्थ करतो. दुःखद समयी मात्र लोकांकडून कधी खरी, तर कधी खोटी सहानुभूती मिळते. त्यामुळे कधी आशा तर कधी निराशा पदरी येते. दुःखातही युक्तीने मार्ग निघतात.
अनेकदा तरुण पिढीला समजून घेण्यात खूप अडचणी येतात. याला कारण म्हणजे दोन पिढ्यांतील अंतर. यात एकमेकांना समजून घेत नसल्यामुळे जीवनात एकमेकांपासून दूर राहावेसे वाटते. आपल्या जीवनाला अर्थच नाही, या काटेरी जीवनात कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच असल्याचे निदर्शनास येते आणि गैरसमजाने दोन व्यक्तींमध्ये भांडण लागते. मध्यस्थी करण्यासाठी काही लोक मदतही करतात, तर काही फक्त बघ्याची भूमिका घेऊन मजा बघतात. तेव्हा वाईट प्रसंगातून सोडविण्यास गेलेल्या सज्जन व्यक्तीची मात्र फार त्रेधातिरपीट होते. सज्जनांचा चांगुलपणा कधी कधी नडतोसुद्धा.
समाजातील अनेकांचा असा समज असतो, की मीच या जगात खूप शहाणा, माझ्यासारखा दुजा नाही. येथे असा विचार मनात येतो, की "जो तो म्हणे शहाणा, पर किडका जणू दाणा.' अशा वागण्याने पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होतात. घरसंसार विस्कटला जातो आणि तोपर्यंत वृद्धत्व येते. "जमले तर ठीक, नाहीतर सारेच विक'. त्यासाठी आपल्या जीवनात स्वयंशिस्त असायलाच पाहिजे. त्यामुळे सर्वांना समजून घेणे शक्य होते. आयुष्याची सायंकाळही आल्हाददायक बनून जाते.