esakal | रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे सामाजिक-शैक्षणिक विचार 
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे सामाजिक-शैक्षणिक विचार 

 २३ डिसेंबर हा रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा १९ वा स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे दर्शन घडविणारा विशेष लेख...

रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे सामाजिक-शैक्षणिक विचार 

sakal_logo
By
डाॅ. अरूण शिंदे

रत्नाप्पाण्णा कुंभार हे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक आघाडीचे शिलेदार. स्वातंत्र्य चळवळ, संविधान सभा, राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नेतृत्व केले तसेच रचनात्मक, विधायक कामांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण लोकजीवन व लोकसंस्कृतीचा जन्मसिद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी होता. ग्रामीण भागाचे प्रश्‍न, समस्या यांचे नेमके आकलन होते. त्यांची भाषणे, लेखन वगैरेंमधून ग्रामीण जनसमूहांविषयी अपार आस्था, ग्रामजीवनाला व्यापून टाकणाऱ्या प्रश्‍नांचे मूलभूत आकलन व ग्रामीण विकासाचा शास्त्रीय आराखडा प्रकट होतो. म्हणून त्यांच्या अभ्यासू, चिंतनशील, समाजनिष्ट विचारांचे विविध पैलू समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 

ग्रामीण कृषिअर्थकारण 
भारत हा कृषिप्रधान असल्याने आपल्या देशातील उद्योगांचा मूलाधार शेती आहे. शेतीतून निर्माण होणाऱ्या कच्च्या मालाच्या सुबत्तेवरच अनेक उद्योगांचे भवितव्य अवलंबून असते. परंतु आपल्या धोरणकर्त्यांनी पाश्‍चात्य उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे आकर्षित होऊन शेतीकडे दुर्लक्ष केल्याची फळे, विविध रूपात समोर आल्याचे रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी निदर्शनास आणले आहे. त्यांच्या मते, ग्रामीण अर्थव्यवस्थेत कृषी उद्योगधंद्यांचे जाळे विकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या धर्तीवर विणल्याशिवाय भारताची समृद्धी होणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था पायाभूत मानल्याशिवाय विकास साधता येणार नाही. सुधारित शेती ही या देशाची निकडीची गरज आहे. शेतीच्या धंद्याला स्थिरता प्राप्त होण्यासाठी साधनसामग्री, पाणी, खते, अवजारे आणि सुधारित बी-बियाणे यांची मुबलकता निर्माण करणे, तसेच कसणाऱ्याकडे जमिनीचे मालकी तत्त्व येणे या गोष्टींची आवश्‍यकता आहे. शेतमालाला किफायतशीर किंमत देण्याचा कायदा केला पाहिजे. तसेच शेतीच्या कच्च्या मालाचे पक्‍क्‍या मालात रूपांतर करण्याचे प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर उभारले गेले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मालकीच्या प्रक्रिया उद्योगांमुळे त्यांचा आर्थिक विकास होईल, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगार प्राप्त होईल. बेकारी कमी होईल, शेतीला जोडधंद्याचे साहाय्य लाभल्यामुळे शेतीवरील बोजा काही अंशी कमी होईल तसेच प्रक्रिया केलेल्या मालाच्या किंमतीचा काही एक लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. विकेंद्रित स्वरूपात प्रक्रियात्मक उद्योगधंदे ग्रामीण भागात वाढले तर अल्पभूधारक, शेतमजूर, भूमीहीन जनसमूहांच्या उपजीविकेसाठी शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचा ओघ कमी होऊन शहरीकरणाच्या भेडसावणाऱ्या प्रश्‍नाची तीव्रता काहीशी कमी होऊ शकेल. असा कृषि औद्योगिकीकरणाचा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडला आहे. 

ग्रामोद्योगांचा विकास 
ग्रामीण भागाच्या अंतरंगांची संपूर्ण माहिती रत्नाप्पाण्णा कुंभार यांना होती. गावगाड्यातील बारा बलुतेदारांचे स्थान, त्यांची बहुसंख्या, त्यांच्या पारंपरिक व्यवसायांची दुरवस्था, त्यांचे सामाजिक, आर्थिक वास्तव यांचे ज्ञान त्यांना होते. बारा बलुतेदार हा ग्रामीण समाजजीवनाचा कणा असून ग्रामोद्योगाच्या विकासावरच ग्रामीण समाजाचे भवितव्य अवलंबून आहे, अशी त्यांची धारणा होती. ग्रामीण समाज हा परस्परावलंबी असून समूहभाव, सहकार्य, सहजीवन यांमधून ग्रामीण जीवन आकार घेते. ग्रामीण समाजाच्या अखंड बांधणीत बारा बलुतेदारांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण समाजाच्या उन्नतीचा मार्ग बलुतेदारांच्या ग्रामोद्योगांच्या विकासावर अवलंबून आहे, असे त्यांचे मत होते. यांत्रिकीकरणानंतर पारंपरिक ग्रामोद्योगांचा झालेला ऱ्हास व बलुतेदारांच्या व्यवसायावर व उपजीविकेवर आलेली अरिष्टे यांचा वेध त्यांनी घेतला आहे. बदलत्या काळामध्ये ग्रामोद्योगांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाचे उपायही त्यांनी सुचविले आहेत. कालानुरूप ग्रामोद्योगांचा चेहरामोहरा बदलून "समाजविकासासाठी ग्रामोद्योग' हे तत्त्व उराशी बाळगून कृती केली पाहिजे. गावोगावी सहकारी तत्त्वावर सहकारी संस्थांची उभारणी करून नवनव्या वस्तूंची व वास्तूंची निर्मिती केली पाहिजे. आधुनिक पद्धतीने व्यवसाय-उद्योग केले पाहिजेत. ग्रामोद्योगांपुढील समस्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन करून उपाययोजना केल्या पाहिजेत. व्यक्‍ती, समाज व शासन अशा सर्व घटकांनी ग्रामोद्योगांची उपयुक्‍तता लक्षात घेऊन त्यांचे कालानुरूप आधुनिकीकरण केले तर ग्रामीण आर्थिक पाया बळकट होईल, असे त्यांचे मत होते. 
28 नोव्हेंबर 1965 रोजी जळगाव येथे केलेल्या भाषणामध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी ग्रामोद्योगांना "गावच्या रक्‍तवाहिन्या' असे संबोधले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने मोठ्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करून लघु व ग्रामोद्योगांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पारंपरिक कुटिरोद्योग, ग्रामोद्योग मोडकळीस आले. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून लोक चरितार्थासाठी शहराकडे धाव घेत आहेत. हे थांबविण्यासाठी ग्रामीण औद्योगीकरणाचे नियोजनबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत, असा आग्रह धरून त्यांनी या संदर्भातील आराखडा मांडला आहे. भारत सरकारने व राज्य सरकारने ग्रामोद्योगांच्या विकासासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करावे. जिल्हास्तरावर औद्योगिक सहकारी सेवा केंद्रे, गावपातळीवर औद्योगिक सहकारी सोसायट्या स्थापन कराव्यात. मध्यवर्ती सहकारी बॅंक व क्रेडिट सोसायट्यांनी ग्रामोद्योगांना वित्तपुरवठा करावा. ग्रामोद्योगांचे उत्पादन, संशोधन व विकासाची गावपातळीपासून केंद्रसरकारपर्यंत एक योजनाबद्ध, सुसूत्र व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, अशी मागणी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी केली आहे. "कसेल त्याची जमीन' या धर्तीवर "मळणाऱ्याला माती' व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाच्या विकासाचा व ग्रामीण समाजाच्या सक्षमीकरणाचा मूलभूत विचार रत्नाप्पाण्णांनी सातत्याने आग्रहपूर्वक मांडला आहे. 

सहकार चळवळ 
सहकार चळवळीतून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे कृतिशील कार्य रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी केले. अनेक सहकारी संस्थांची स्थापना करून त्यांनी "सहकारातून समृद्धीकडे' हे तत्त्व प्रत्यक्षात आणले. सहकारी संस्थांनी आपल्या पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. या संदर्भात ते म्हणतात, ""प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे... साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे. साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे. प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.'' 
लोकशाहीत नियोजनबद्ध समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे कार्य सहकारी चळवळीद्वारे होऊ शकेल, अशी रत्नाप्पाणांची ठाम धारणा होती. त्यांच्या मते, सहकार चळवळ यशस्वी होण्यासाठी चारित्र्यवान, विचारशील कार्यकर्त्यांची नितांत आवश्‍यकता आहे. संस्कार हाच सहकार युगाचा मूलमंत्र आहे. चारित्र्य आणि प्रामाणिकपणा हेच सहकाराचे खरेखुरे भांडवल आहे. 

सहकाराची यशस्विता तीन बाबींवर अवलंबून आहे. 
1. उद्योगधंद्यातील शास्त्र जूाणन घेऊन तो उद्योग शंभर टक्‍के कार्यक्षमतेने चालविणे. 
2. समाजातील दुर्बल, दलित व गरीब घटकांना मदत करून त्यांना समर्थ करणे. 
3. माणसांचा सांस्कृतिक व वैचारिक विकास करणे. 

सहकार चळवळीद्वारेच आपण समाजाला सुखी, समृद्ध व संपन्न करू शकू, असा त्यांचा दृढविश्‍वास होता. सहकारातील दोष, उणिवा यांची रत्नाप्पाण्णांना पुरेपूर जाणीव होती. सहकारी संस्थेत काम करताना पुढील पथ्ये काटेकोरपणे पाळण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. संस्थेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, सहकारी चळवळीतून गरिबांचा किती उद्धार होतो, हे पाहणे, व्यक्‍तिविशेषांला महत्त्व न देता सामान्य माणसांच्या उद्धाराची "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' दृष्टी राखणे. अशा प्रकारचा समाजाभिमुख दृष्टिकोनच सहकारी संस्थांच्या उज्ज्वल भवितव्याला कारणीभूत ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे. 

चळवळीमध्ये कार्यकर्ता हा सर्वांत महत्त्वाचा घटक 
कोणत्याही चळवळीमध्ये, संस्थेमध्ये कार्यकर्ता हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. आज कार्यकर्ता हा शब्द परवलीचा झाला आहे. परंतु खरा कार्यकर्ता कोण? "जो सामान्यांची दुःखे दूर करतो व त्यांचे अश्रू पुसतो, तोच श्रेष्ठ कार्यकर्ता होय', असे रत्नाप्पाण्णांचे मत होते. समाजाची वर्गवारी जातीय पायावर न करता सच्चे आणि लुच्चे अशी केली पाहिजे. कोणाचा व्यवहार आडपडद्याचा आहे व कोणाचा व्यवहार धुतल्या तांदळासारखा आहे, हे पडताळून पाहण्याची गरज आहे. सच्च्या माणसांची संघटना करून लुच्च्यांची उचलबांगडी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजवाद व लोकशाही नांदणार नाही. संधीसाधूंचे सत्यशोधन करून त्यांच्या कृष्ण कारवायांना पायबंद केला पाहिजे, असे परखड मत त्यांनी मांडले आहे. गावागावांतील दुभंगलेली मने सांधून सद्‌भावनेची साखळी कार्यकर्त्यांनी निर्माण केली पाहिजे. जात, वंश, वर्ण, वयोमान वगैरेंचा विचार न करता गावागावांत साचलेली प्रतिगामी शक्‍तींची कीड नष्ट केली पाहिजे. तरच ग्रामीण स्वास्थ्याची जोपासना केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहेकार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावच्या प्रश्‍नांचे, समस्यांचे व त्यावरील उपायांचे आकलन केले पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांना सबल बनविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. लोकांमधील सुप्त शक्‍ती जागृत करून श्रमपरायणतेतून जीवनमान उन्नत केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

अस्पृश्‍यता निर्मूलन 
दलित जनसमूह हा ग्रामीण भागाचा मोठा भाग आहे. दलित जनसमूह सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे. दलित समाजाच्या विविध प्रश्‍नांचा, मागासलेपणाचा रत्नाप्पा कुंभार यांनी नेमका वेध घेतला आहे. दलित समाजाचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यास अग्रक्रम देण्यावर त्यांनी भर दिला आहे. दलित समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास सामाजिक अत्याचारांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य व धैर्य त्यांना प्राप्त होईल. दलित समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले पाहिजे. शेतजमिनीची मालकी हक्‍काने उपलब्धता करून दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते. दलित-हरिजनांना शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनींपैकी बऱ्याच जमिनी निकृष्ट प्रतीच्या होत्या. शेतीच्या लागवडीसाठीचे भांडवल व साहित्य साधने दलितांकडे नसल्याने बहुतांश जमिनी लागवडीखाली न येता त्या पडीक राहिल्या आहेत. त्यामुळे जमीन वाटपामुळे दलितांच्या स्थितीमध्ये काहीही फरक पडला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. दलितांना देण्यात आलेल्या जमिनीची फेरतपासणी झाली पाहिजे. दलितांना लागवडीयोग्य जमिनीचे वाटप आणि भांडवल व इतर साधनांचा पुनवठा करण्याचा अग्रक्रमाने विचार झाला पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. 

गरीबी निर्मूलन 
भारतातील गरीबीचे मूळ हे मानवनिर्मित आहे. देशातील संपत्ती ही सर्व नागरिकांची संपत्ती आहे. गरजेपेक्षा जास्त संपत्ती जवळ ठेवण्याचा अधिकार या देशात कोणालाही नाही. सरकारच्या मदतीने समाजवादी समाजरचना येईल, हे भाबडे स्वप्नरंजन सोडून लोकशक्‍तीच्या कृतिप्रबळतेवर खरा समाजवाद निर्माण होईल, असे रत्नाप्पाण्णा कुंभार यांना वाटते. स्वतःची परिस्थिती दुसऱ्यांच्या मध्यस्थीने न सुधारता स्वतःच्या हिमतीवर सुधारा. मध्यस्थ / दलालापासून सावध राहा. आपल्या शक्‍तीचा, बुद्धीचा व कल्पकतेचा आपल्या सुखासाठी उपयोग करा. "हा माझा मार्ग एकला' म्हणून मार्गक्रमण करा, असे महत्त्वपूर्ण चिंतन त्यांनी व्यक्‍त केले आहे. 

दुष्काळ निवारण 
महाराष्ट्रात दर दोन-चार वर्षांनी कुठे ना कुठे दुष्काळ पडत असतो. जयसिंगपूर येथे 1 ऑगस्ट 1973 रोजी केलेल्या भाषणामध्ये रत्नाप्पाण्णांनी दुष्काळाची कारणमीमांसा करण्याबरोबरच दुष्काळ निर्मूलनाच्या शाश्‍वत उपायांचे सूचनही रत्नाप्पाण्णांनी केले आहे. दुष्काळ पडल्यावर सरकारी पैसा ओतून त्यावर मात करण्याची रीत साधारणतः पडलेली दिसते. महाराष्ट्र शासनाने 1972 च्या दुष्काळात लोकांना उत्पादक श्रमाची कामे व त्याचा मोबदला देऊन एक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारल्याचे रत्नाप्पाण्णा नमूद करतात. त्यांच्या मते, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने व समाजाने हातात हात घालून चालले पाहिजे. विशेषतः दुष्काळाच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती वाढू न देणे, मालाची विशेष वितरण व्यवस्था करणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे व गरजूला काम उपलब्ध करून देणे अशी कामे प्राधान्याने केली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून न राहता लोकांनी सामूहिकपणे कामे केली पाहिजेत. ग्रामपंचायती व सोसायटी यांच्या साहाय्याने विहिरी खोदल्या पाहिजेत. दुष्काळात प्रत्येकाने कामाचा वाटा उचलला पाहिजे तसेच इतरांच्या मदतीसाठीही पुढे आले पाहिजे. "एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या भावनेने कामाला लागले तर दुष्काळात केलेली कामे ही सामाजिक देणगी ठरेल, असे अत्यंत महत्त्वाचे विचार रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी मांडले आहेत. 

रस्ते 
15 जानेवारी 1973 रोजी शिरोळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी रस्त्यांना "भारताच्या भाग्यरेषा' म्हणून संबोधले. शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांचा प्रश्‍न त्यांनी प्रथमच जाहीरपणे ऐरणीवर आणला. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी ज्या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते. रत्नाप्पाण्णांच्या मते, शेतकऱ्यांचा दैनंदिन व्यवसाय व दळणवळण प्रामुख्याने शेतामध्ये होत असतो. गावागावांना जोडणाऱ्या रस्त्याप्रमाणेच प्रत्येक गावामधून त्या त्या गावाच्या शेतीवाडीत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची दुरुस्ती अग्रहक्‍काने केली पाहिजे. कारण शेतात न्यावयाचा माल व शेतातून गावात आणावयाचा माल यासाठी पाणंद रस्त्यांना फार मोठे महत्त्व असते. गावोगावचे पाणंद रस्ते, दुर्घट झालेले असतात व जाण्यायेण्याच्या लायकीचे नसतात. पाणंद रस्त्यांची भयानक परिस्थिती पाहिल्यावर अंगावर शहारे येतात. शेती व शेतकऱ्यांची खरीखुरी प्रगती व्हावी, असे वाटत असेल तर पाणंद रस्त्यांची बांधणी सरकारने प्राधान्याने केली पाहिजे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील रस्ते बांधणीच्या नियोजनामध्ये पाणंद रस्त्यांचा समावेश खास योजना म्हणून करण्यात यावा व त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. प्रसंगी लोकसहभागही घेण्यात यावा, अशी मागणी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या निकडीच्या सूक्ष्म गोष्टीचा किती खोलवर विचार त्यांनी केला होता, हे प्रकर्षाने जाणवते. 

शिक्षण 
ग्रामीण समाजपरिवर्तनामध्ये शिक्षणाचे अनन्यसाधारण स्थान आहे, हे रत्नाप्पाण्णा कुंभार यांना ज्ञात होते. "गाव तेथे शाळा', "गाव तेथे ग्रंथालय', "गाव तेथे मैदान' असलेच पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. प्रत्येक माणसाला वाचता आले पाहिजे, वाचलेले समजले पाहिजे. प्रत्येक खेडेगावातील अज्ञानाचे माळ फोडून तेथे ज्ञानाचे नंदनवन निर्माण केले पाहिजे, असे विचार त्यांनी नाइट कॉलेजमध्ये 24 सप्टेंबर 1973 रोजी केलेल्या व्याख्यानात व्यक्‍त केले आहेत. बलशाली माणूस घडविणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला आहे. शिक्षणाबरोबरच बलसंवर्धनासाठी जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर तालमी व क्रीडांगणे तयार केली पाहिजेत. सद्‌गुण, ऐक्‍य, बल आणि प्रेम यांचा पाठ क्रीडांगणावर मिळतो. परस्पर द्वेषभावनेच्या भिंती ढासळून धर्म, जात, वंश व वर्ण विसरून "आपण सारे एक आहोत' ही भावना क्रीडांगणावर वाढीस लागते. राष्ट्रीय ऐक्‍याचे संवर्धन करण्याचे पहिले ठिकाण म्हणजे क्रीडांगण, असे त्यांचे मत होते. बालवाडी हा शिक्षणाचा पाया असून प्रत्येक वस्तीत बालवाडी सुरू केली पाहिजे. बालमनावर योग्य संस्कार व माणूस म्हणून जडणघडण बालवाडीमध्ये केली जाते, अशा शब्दांत पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या नागपूर परिषदेच्या समारोप प्रसंगी सांगितले होते. ग्रामीण भागामध्ये बालवाड्यांची नितांत आवश्‍यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. शिक्षणातून श्रमनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा, आत्मविश्‍वास वृद्धिंगत झाला पाहिजे, भारतासारख्या गरिबीने वेढलेल्या देशात श्रमाधिष्ठित समाजवादाचा पुरस्कार केला पाहिजे, असे त्यांना वाटते. 
रत्नाप्पाण्णांच्या मते, शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे. जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व समजावून देणे म्हणजे शिक्षण. लोकजीवनात आमूलाग्र बदल घडविणारे माध्यम म्हणजे शिक्षण. निकोप, स्वावलंबी, स्वातंत्र्यप्रिय व श्रमप्रतिष्ठेवर विश्‍वास ठेवणारा समाजवादी समाज निर्माण करण्याचे साधनही शिक्षणच आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक बनण्यासाठी त्याला गतिमान जीवनाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे व गतिमान जीवनाचा अर्थ समजण्याची पात्रताही त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आजच्या पिढीमध्ये जिद्द, प्रेरणा, देशभक्‍ती व चिरंतन काम करीत राहण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी लोकशिक्षणाची नितांत गरज आहे. लोकशाहीत प्रत्येक माणूस सुशिक्षित व सुसंस्कृत झाला पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास योग्य दृष्टिकोन ठेवून आजच्या पिढीस शिकवला पाहिजे. आज देशात जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद वाढत असून फुटिरतेची भावना बळावत आहे. स्वातंत्र्याच्या प्रेरणा व स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन राष्ट्रीय एकता व बंधुता निर्माण केली पाहिजे. 
शिक्षक हा नव्या पिढीचा शिल्पकार असतो. म्हणून शिक्षकांच्याकडून त्यांनी विशेष अपेक्षा व्यक्‍त केल्या आहेत. अण्णांच्या मते, आपल्या उक्‍तीवर व कृतीवर एकवाक्‍यतेचा अंकुश ठेवून शिक्षक नव्या पिढीची घडण करीत असतो. छात्रनिष्ठ, समाजनिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि आत्मनिष्ठ शिक्षक हवे आहेत. शिक्षणातून सामान्य माणसांना परंपरेच्या जिवघेण्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी, लाचार जीवनाबद्दल तिटकारा निर्माण करण्यासाठी, स्वार्थी दबावाला भीक न घालण्यासाठी, स्वाभिमानाने आपली मान उंच ठेवण्यासाठी, स्वतःच्या भाग्याचा स्वतःच शिल्पकार होण्यासाठी आणि शिक्षणातून एक सिद्ध व समर्थ माणूस निर्माण करण्यासाठी शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. शिक्षकांनी आपला दर्जा स्वतः उंचवावा व विद्यार्थ्यांपुढे वैचारिक, नैतिक आदर्श उभा करावा. 
वर्तमान शिक्षणपद्धती सदोष असल्याचे अण्णांचे मत होते. भारतीय म्हणून एक स्वतंत्र देशी शिक्षणपद्धती आपण विकसित करू शकलो नसल्याची खंत त्यांना प्राप्त होती. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे आपले शिक्षण वाळूत चोच खुपसून बसलेल्या शहामृगासारखे झाले आहे. बलशाही माणूस घडवण्यात शिक्षणपद्धती निरुपयोगी ठरली आहे. शिक्षण क्षेत्रातील सेवाभाव संपुष्टात आला आहे. हे विदारक वास्तव अण्णांनी निदर्शनास आणले आहे. 
शिक्षणाचे उद्दिष्ट व स्वरूप यांबाबत अण्णांची सुस्पष्ट भूमिका होती. स्वातंत्र्यलढ्याचा वारसा व देशकाल परिस्थितीचे आकलन यांमधून त्यांची मते तयार झाली होती. शीलसंपन्न, चारित्र्यवान, सुसंस्कृत आणि समाजोपयोगी नागरिक तयार करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे; परंतु आज सुशिक्षित बेकारांची फौज तयार होत आहे. यास्तव श्रमप्रतिष्ठा आणि श्रममूल्य हा शिक्षणाचा गाभाभूत घटक झाला पाहिजे असे अण्णांचे मत होते. व्यक्‍तिगत करिअरवादापेक्षा सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करणाऱ्या शिक्षणाची गरज त्यांनी सातत्याने मांडली. 

मूल्यमापन 
रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने ग्रामीण समाजवास्तव, लोकमानस व ग्रामसंस्कृतीच्या प्रश्‍नांचे तळामुळासकट आकलन त्यांना होते. आपला अनुभव, अभ्यास, चिंतन, निरीक्षण, प्रयोग वगैरेंच्याद्वारे त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाचा मूलभूत दृष्टिकोन मांडला. ग्रामीण विकासाचे अनेक विधायक उपक्रम राबविले. शेती हा ग्रामीण भागाचा कणा असल्याने कृषिअर्थकारणावर त्यांनी सर्वाधिक भर दिला. शेतीचे आधुनिकीकरण, पाणी, खते, अवजारे, साधनसामग्री, बी-बियाणे, शेतीमालाला हमीभाव यांबरोबरच कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग ग्रामीण भागात उभारले गेले पाहिजेत तसेच पारंपरिक ग्रामोद्योगांचे आधुनिकीकरण व व्यावसायिकीकरण करून त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा देश पातळीवर निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. ग्रामीण भागात सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांत स्वावलंबन, सहकार्य, सक्षमीकरण, आर्थिक विकास यांचे समृद्धीचे नवे पर्व सुरू केले पाहिजे, असे त्यांनी सातत्याने प्रतिपादन निःस्वार्थी, त्यागी व तत्त्वनिष्ठ, समाजनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी व त्यांनी समाजवादी समाजरचना प्रत्यक्षात आणावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दारिद्रयनिर्मूलन, अस्पृश्‍यता निर्मूलन, दुष्काळ निवारण, शिक्षण, रस्ते यांसारख्या ग्रामीण विभागांतील कळीच्या प्रश्‍नांचा सूक्ष्म वेध घेऊन त्यावर मूलभूत विचार मांडले आहेत. प्रश्‍नांची सूक्ष्म सखोल जाण, सूत्रबद्ध, मुद्देसूद मांडणी, वैचारिकता, तत्त्वचिंतनात्मकता, प्रौढ व गंभीर भाषा, आवाहकता, व्यापक दृष्टिकोन, आधुनिकता, मूल्यात्मकता, जनसामान्यांच्या उद्धाराची आस अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी रत्नाप्पाण्णांचे लेखन समृद्ध आहे. ग्रामीण भागाच्या मूलभूत विकासाची बिजे त्यांच्या विचारांमध्ये आहेत. 

(लेखक कोल्हापूर येथील नाईट कॉलेजमध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत) 


 

loading image
go to top