विचार करायला काय हरकत आहे ? 

विचार करायला काय हरकत आहे ? 

आजकाल आजुबाजुला नात्यात शेजारी मुलांचे व मुलींचे अरेंज मॅरेज म्हणजे आईवडीलांसाठी थोडी चिंतेची बाब झालेली दिसते. त्या निमित्ताने मनात आलेले विचार. लव मॅरेज काही सगळे करु शकत नाहीत. कारण प्रेम काही ठरवुन करण्याची गोष्ट नाही. बर कांदे-पोहे आता कुणालाच आवडत नाहीत. पुर्वी कसे कुणा नातेवाईकाचा पुतण्या भाचा भाची कुणीतरी लग्नाचे स्थळ सुचवायचे. घरच्यांना ते लोक माहितीतले असायचे. पत्रिका जुळली की मुलगी बघणे व पसंत असेल तर त्याच बैठकीत कुंकू लावणे उरकल्या जायचे.

अर्थात तेव्हाही चुकीची माहिती सांगणे व फसवाफसवी प्रकार व्हायचेच. पण कमी प्रमाणात. आणि लग्न झाल्यावर आहे ते स्विकार करुन संसार व्हायचा. आता मात्र मुली पण मुलांच्या बरोबरीने शिकतात नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या पण अपेक्षा असतात. हुंडा वगैरे नको असतो पण लग्न मात्र दणक्यात करून हवच असते. म्हणजे खर्च काही सुटत नाही. 

आमच्या नगरातच ओळखीच्या ग्रुहस्थांचे एक विवाह मंडळ आहे. ते त्यांचा अनुभव सांगत होते. मुलगी अगदी दहावी बारावी असेल तरी तिला शहरातला किमान पन्नास हजार तरी पगारवाला नवरा हवा. अगदी ती खेड्यातच लहानाची मोठी झाली असली तरी. तीच नाही तर तिच्या आईवडिलांचेही म्हणणे असते. तसेच तिच एकत्र कुटुंब असेल माहेरी तरी सासरी मात्र स्वतंत्र असले तर फार बरे. 

मुलांचे पण आपण कसेही असलो अगदी लठ्ठ किंवा काळे किंवा टक्कल पडलेले तरी मुलगी गोरी सुरेख हवी. नोकरी असेल तर अजुनच छान वगैरे. विवाह मंडळात फक्तं नाव गाव पत्ता शिक्षण आईवडील काय करतात जुजबी माहिती कळते. त्या व्यक्तीच्या स्वभावाचा व्यसनांचा अंदाज येत नाही. अनोळखी फॅमिली असल्याने घरातले वातावरण पण कळत नाही. 
मुलीला त्या घरात राहायचे असते तेव्हा योग्य माहिती कळल्याशिवाय काही पुढे जाता येत नाही. त्यात मजा म्हणजे घरी सगळे सणवार आवडीने करणाऱ्या मुलीला सासरी मात्र त्यात देवाच प्रस्थ फारच वाटत. तसेच मुलांना पण नोकरदार हवी पण घरातही सगळे व्यवस्थित करून आईवडीलांकडे बघणारी हवी.

होम मिनिस्टर बघतांना मी मार्क केलाय हा पाॅईंट. बरीच मुले म्हणतात तिने फॅमिलीला नीट बघितले पाहिजे. अरे तुझी पण आहे ना. काही जबाबदारी का तिची एकटीचीच फॅमिली आहे? मुलांकडे नीट लक्ष द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करतात. 
तेव्हा या सगळ्या गोष्टी लग्न करायच्या आधीच मुलगा आणि मुलगी दोघांनाही समजावून दिल्या पाहिजेत. दोन्ही घरी काही अडचण असेल तर दोघांनीही ती एकत्र येऊन त्याचे निवारण करायचे आहे. 

यात अजुन म्हणजे वयात दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त अंतर नको. बर समानतेच्या गप्पा मारणाऱ्या मुलींना पण नवरा त्यांच्या पेक्षा जास्त पगार असणाराच हवा. मी म्हणते जर जास्त कमावणारा मुलगा जसे म्हणतो मला घरात राहुन घर सांभाळणारी बायको हवी. तस मुलींनी पण करायला काय हरकत आहे?

शिवाय मनासारखे मिळाल्याशिवाय लग्न नाही करायच. लग्न नाही झाले तरी चालेल असाही काही मुला-मुलींचा विचार आजकाल दिसतो. पण एखाद्याच्या मनासारखी दुसरी व्यक्ती मिळेल अस फार क्वचितच घडत. काही ना काही कमीजास्त असणारच. रोज पार्टीला नेणारा नवरा हवा तर पिणारा चालवुनच घ्यायला हवा. किंवा अगदी फॅशनेबल अपडेट राहणारी सुंदरच हवी तर घरात काही करण्याची अपेक्षा ठेवू नये. सगळे गुण एका व्यक्तीत कसे असणार? आणि आपण सुद्धा सर्वगुणसंपन्न सुंदर श्रीमंत वगैरे आहोत का? याचा विचार प्रत्येक मुलाने आणि मुलीने करायला हवा. अन असा विचार ते पाल्य  करत नसतील तर मग पालकांनी ते आपल्या मुलामुलींच्या लक्षात आणुन द्यायला हवे. अन्यथा आपल्या अपत्याच्या दुःखाने पालकही सुखी होत नाहीत.

शेवटी निकोप समाजव्यवस्था हवी तर लग्नसंस्था मजबुत हवीच. कुणा एकाने टिकवुन ठेवणे अवघड आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवा. मुलामुलींना आपण वाढवताना स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. कारण आपल्याला ते मिळाले नसते. पण इथे त्यांनी काय शिकावे याचे स्वातंत्र्य अपेक्षित असते. पुर्वी मुलाने किंवा मुलीने काय शिकावे काय नाही हे पालकच ठरवायचे. आता मात्र एखाद्या डाॅक्टरच्या मुलाने अगदी गाण्यात किंवा नृत्यात जरी करियर करायचं म्हटल तरी कुणी आईवडील त्याला जबरदस्तीने डॉ च हो म्हणत नाही. पण लग्न ही गोष्ट फक्त त्या दोघाशी निगडित नसते तर दोन घरांशी निगडित आहे. सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या तर जास्त चांगले नाही का? पालकांनी आणि मुलामुलींनी याचा एकत्रित विचार करायला काय हरकत आहे? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com