योगायोग नव्हे योग.. 

सुनेत्रा विजय जोशी
गुरुवार, 21 जून 2018

आज योग दिन. सर्वत्र शुभेच्छांचे मेसेज. कुठे कुठे मैदानावर किंवा हाॅलवर योग दिन साजरा करून फोटो काढून अपलोड करण्याची चढाओढ सुरू आहे. ते फेसबुकवर व व्हाटस् अपवर टाकणे सुरू आहे. पण मग उद्या काय? 

आज योग दिन. सर्वत्र शुभेच्छांचे मेसेज. कुठे कुठे मैदानावर किंवा हाॅलवर योग दिन साजरा करून फोटो काढून अपलोड करण्याची चढाओढ सुरू आहे. ते फेसबुकवर व व्हाटस् अपवर टाकणे सुरू आहे. पण मग उद्या काय? 

हा योग दिन फक्त आजच नाही तर रोजच जीवनात यायला हवा. श्री गजानन महाराजांनी पोथीतही सांगितले आहे की. प्रथम संपत्ती ती शरीर दुसरे ते घरदार आणि तिसरा तो प्रकार आहे धनमानाचा. एवढेच सांगुन ते थांबले नाहीत तर पुढे असेही म्हणतात कि पौष्टिक पदार्थांनी शक्ती येते ती कायम टिकते.

सशक्त करण्या राष्ट्राते योग शिका. कारण योगाच्या सहाय्याने नुसते शरीरच नाही तर मनही सशक्त बनते. सशक्‍त शरीरातले सशक्त मनच मग अशक्य ते शक्य करून दाखवु शकते. आज विदेशात सगळे योगाचे महत्त्व जाणतात. अन आपण मात्र आपल्या पुराणात ऋषि मुनींनी सांगितले ते योगाचे महत्त्व विसरले आहोत.

योगाचे महत्त्व पटण्यासाठी योगदिन तरी निदान साजरे होत आहेत. हातात नुसते शस्त्र असुन चालत नाही तर ते पेलण्याची ताकद शरीरात लागते. अन चालवायला सशक्त मन न मनाची एकाग्रता. योगाने मनाची एकाग्रता साधते. व आपल्या लक्ष्यावर अचुक मन केंद्रित करता येते. 

आज धकाधकीच्या धावपळीच्या आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात जो तो तणावाखाली धावतोय. कधी मग नैराश्यातून आत्महत्या वगैरे प्रकार देखील घडतात. तेव्हा वेळीच सावध व्हा. संगणकाच्या युगात योग सोबत असेल तर तुम्ही मन आणि शरीर परत ताजेतवाने करून घेऊ शकता. 

सतत मान खाली करून संगणकावर, मोबाईलवर काम केल्यास मान पाठ लागुन येते. मग तुम्ही डॉक्टरकडे धावता त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतोच ना. शिवाय पैसाही खर्च होतो ते वेगळेच. त्यापेक्षा सकाळी अर्धा तास काढलात तर मानेचे पाठीचे व्यायाम करा. प्राणायाम करुन श्वासात चैतन्य भरून घ्या. काम करता करता चालता बोलता अगदी दोन मिनिटात सुद्धा काही गोष्टी करुन स्वतःला तंदुरुस्त ठेऊ शकता. काम उत्तम तर्‍हेने होईलच पैसेही वाचतील. 

शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी पाच पाच मिनिटे व्यायामाला दिली तरी पुरे. एकदा महिनाभर प्रयत्न करून तर बघा. 
मग तुम्हीच इतरांना योगाचे महत्व सांगायला लागाल. 

सुदृढ मन आणि शरीर
म्हणजे नाही योगायोग 
त्यासाठीच आजच नव्हे 
तर रोजच हवा "योग". 

सुज्ञास अधिक सांगणे नलगे. मग आजपासूनच करा सुरवात. योगासाठी योगही जुळून आलाय "योगदिनाचा". 

Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article